रशियात 8.7 तीव्रतेचा मोठा भूंकप; जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा (फोटो सौजन्य - iStock)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विविध देशांत तसेच भारतातील काही राज्यांतही भूकंप झाल्याचे पाहिला मिळत आहे. त्यातच आता रशियात मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.7 इतकी मोजण्यात आली. जपानच्या सुदूर पूर्व कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर हा भूकंप झाला. या भूकंपाने पॅसिफिक प्रदेशात खळबळ उडाली.
रशियात झालेला हा भूकंप इतका शक्तिशाली होता की, अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. अमेरिका, जपान, न्यूझीलंड, फिलीपिन्स, इक्वेडोर आणि हवाई सारख्या भागातील समुद्रकिनाऱ्यांवर धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, तेथील यंत्रणाही अलर्ट झाली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, १९५२ नंतरचा हा या प्रदेशातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. कमचटका किनाऱ्यावर किमान सहा भूकंप नोंदवले गेले, ज्यांची तीव्रता ५.४ ते ६.९ पर्यंत होती. मात्र, हे सर्व भूंकप ८.७ रिश्टर स्केलच्या भूकंपापेक्षा कमी शक्तिशाली होते.
पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने इशारा दिला आहे की, रशिया आणि इक्वेडोरच्या काही किनारी भागात ३ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळू शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी X वर पोस्ट केले की, ‘पॅसिफिक महासागरात झालेल्या मोठ्या भूकंपामुळे, किनारपट्टीवर राहणाऱ्यांसाटी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावर त्सुनामीचे निरीक्षण सुरू आहे. जपान देखील धोक्यात आहे. खंबीर राहा आणि सुरक्षित राहा’.
त्सुनामीच्या भीतीत अनेक देश
हवाईमध्ये त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर, होनोलुलुमध्ये सायरन वाजवण्यात आले आणि लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. 1 ते 3 मीटर उंच लाटा हवाई, चिली, जपान आणि सोलोमन बेटांवर येऊ शकतात. जपानने टोकियो खाडीसह अनेक भागात त्सुनामीचा इशारा देखील जारी केला आहे. न्यूझीलंडमधील आपत्ती व्यवस्थापन संस्थेने किनारी भागात असामान्य आणि तीव्र प्रवाह येण्याचा इशारा दिला आहे.