झेलेन्स्कींना मोठा झटका! कीवमध्ये युक्रेनियन सुरक्षा सेवेच्या कर्नलची हत्या; रशिया सामील असल्याचा संशय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War : कीव : सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. रशिया युक्रेनवर एकामागून एक हल्ले करत आहे. दोन दिवसांपूर्वीचे रशियाने युक्रेनच्या पश्चिम भागांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान सुरु झाले होते. दरम्यान युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या कर्नलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून यामध्ये रशियाचा हात असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या घटनेने युक्रेनमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
युक्रेनच्या आरबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या होलोसिएव्हस्की जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात क्रेनच्या सुरक्षा सेवेच्या कर्नलची हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला रशियाने केला असल्याचे मानले जात आहे, परंतु अद्याप रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या कर्नलची गोळी झाडून हत्या झाल्याची पुष्टी युक्रेनने केली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असल्याचे युक्रेनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सध्या परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी चौकशी सुरु आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
इराणशी युद्धादरम्यान इस्रायलने टारगेट किलिंग पद्धतीचा वापर केला होता. इस्रायलने इराणच्या अधिकाऱ्यांना एक-एक करुन ठार केले होते. दरम्यान रशिया देखील याच पद्धतीचा वापर करत असल्याचे मानले जात आहे. शिवाय यापूर्वी देखील रशियाने असेच युक्रेनच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचा खात्मा केला होता.
युक्रेनच्या लष्कर आण गुप्तचर अधिकाऱ्यांवर रशियाने ड्रोन आणि कार बॉम्बने लक्ष्य केले होते. २०२३ मध्ये युक्रेनच्या गुप्तचर प्रमुख किरिलो बुडानोव्ह यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यांचा जीव थोडक्यात बचावला. रशियाने यामध्ये क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. दरम्यान पुन्हा एकदा रशिया हीच पद्धत अवलंबवत असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या रशिया युक्रेनवर गेल्या काही दिवसांपासून सतत तीव्र हल्ले करत आहे. विशेष करुन युक्रेनची राजधानी कीववर रशियाने तीव्र हल्ले केले आहे. रशियाने काही दिवसांपूर्वीच कीववर सर्वात मोठा हल्ला केला होता. जवळपास ७०० ड्रोन्स रशियाने कीववर डागले होते. तसेच रशियाने युक्रेनच्या पश्चिमी भागातील शहरांनाही लक्ष्य केले आहे. यामध्ये लुत्स्क, ल्विव्ह, खमेलनित्स्की आणि टेर्नोपिल या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली.