फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कीव: सध्या रशिया युक्रेनमध्ये तीव्र युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. याच दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी ‘विजय योजना’ सादर केली आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, या योजनेद्वारे युक्रेन रशियावर विजय मिळवू शकतो. मात्र, युक्रेनच्या मित्र राष्ट्रांमध्ये या योजनेबाबत मतभेद निर्माण झालेले आहेत. काही देशांनी त्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पश्चिमेकडून झेलेन्स्कींच्या या योजनेला अद्याप ठोस पाठिंबा मिळालेला नाही.
झेलेन्स्कीच्या या प्रस्तावांवर युक्रेनच्या अनेक सहयोगी देशांनी विरोध दर्शवला
मिळालेल्या माहितीनुसार, झेलेन्स्कीच्या या योजनेत युक्रेनला नाटोमध्ये औपचारिकरित्या आमंत्रित करायचे आणि रशियन लष्करी लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठी पश्चिमेकडून मिळालेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी मिळवायची असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु या प्रस्तावांवर युक्रेनच्या अनेक सहयोगी देशांनी विरोध दर्शवला आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांना वाटते की युक्रेनची सध्याची परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि हे युद्ध धांबवणे आवश्यक आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या योजनेचे मूल्यांकन करण्यास नकार दिला आहे. पण तरीही अमेरिकेने युक्रेनसाठी 425 दशलक्ष डॉलर्सच्या नवीन सुरक्षा सहाय्य पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाकडून 5 नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा नाही. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या म्हणण्यानुसार, सध्या शांतता चर्चेसाठी आधार तयार करणे अधिक महत्त्वाचे आहे.
रशियाने या योजनेची खिल्ली उडवली
युरोपातील अनेक देशांमध्येही या योजनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. परंतु, फ्रान्सने झेलेन्स्कीच्या या योजनेला पाठिंबा दिला आहे. तर जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी युक्रेनला लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र पुरविण्यास नकार दिला आहे. त्यांनी नाटोने युद्धात थेट सहभागी होऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, रशियाने या योजनेची खिल्ली उडवली असून क्रेमलिनने तिला ‘तात्कालिक’ म्हणून हिणवले आहे.
जागतिक पातळीवर चिंता व्यक्त
युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या अहवालांमुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. कारण उत्तर कोरियाच्या सहभागाने युद्धाचे स्वरूप आणखी गंभीर होऊ शकते. दरम्यान, रशियानेही अणुशक्तीचा पुन्हा एकदा उल्लेख करून पश्चिमेकडील देशांना युक्रेनला मदत करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाने आपल्या स्ट्रॅटेजिक न्यूक्लियर फोर्सेसच्या क्षेपणास्त्र युनिटच्या तयारीची चाचणी केली आहे.