सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या, ‘अज्ञात हल्लेखोरांनी’ झाडल्या गोळ्या!

पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात बंद असलेल्या भारतीय नागरिक सरबजीत सिंगची 2013 मध्ये गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरून सरफराजनेच हत्या केली होती. लाहोरमध्येच सरफराजची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

    पाकिस्तानातील लाहोर येथील तुरुंगात भारतीय नागरिक सरबजीत सिंगची (Sarabjit Singh) हत्या करणारा अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज (Aamir Sarfraz) याची रविवारी हत्या करण्यात आली. सर्फराजला ‘अज्ञात हल्लेखोरांनी’ गोळ्या घातल्या. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात बंद असलेल्या भारतीय नागरिक सरबजीत सिंगची 2013 मध्ये गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरून सरफराजनेच हत्या केली होती. सरफराज आणि काही जणांविरुद्ध पाकिस्तानमध्ये सरबजीत सिंगवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु पुराव्याअभावी 2018 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

    सरबजीतची पाकिस्तानमध्ये झाली होती हत्या

    पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावातील शेतकरी सरबजीत सिंग 30 ऑगस्ट 1990 रोजी चुकून पाकिस्तानात गेला होता. तेथे पाकिस्तानी लष्कराने त्यांना अटक करून तुरुंगात डांबले. पाकिस्तानने सरबजीतवर खोटे खटले लादले आणि लाहोर आणि फैसलाबादमधील बॉम्बस्फोटांमध्ये सरबजित सिंगचा हात असल्याचा आरोप केला. बॉम्बस्फोटात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आणि सरबजीतला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

    सरबजीतची बहीण दलबीर आणि पत्नी सुखप्रीत यांच्याशिवाय भारत सरकारनेही सरबजीतला भारतात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. यादरम्यान पाकिस्तानातील लाहोर येथील तुरुंगात सरबजीतवर हल्ला झाला, ज्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. तुरुंगात शिक्षा भोगत असताना सरबजीतच्या डोक्यावर विटांनी वार करण्यात आले. यानंतर त्यांना लाहोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.