117 वर्षीय महिलेच्या डीएनएत दीर्घायुष्याचे रहस्य! शास्त्रज्ञांनी शोधला वृद्धत्वावर उपाय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बार्सिलोना : माणसाचे सरासरी आयुर्मान 70 ते 80 वर्षांचे मानले जाते, मात्र काही मोजक्या लोकांचे जीवन शंभर वर्षांहून अधिक टिकते. हे नक्की कसे शक्य होते, याचा शोध घेण्यासाठी स्पेनच्या बार्सिलोना युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी 117 वर्षीय मारिया ब्रोनियास मोरेरा यांच्या डीएनए आणि जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला आहे. यातून वृद्धत्व रोखण्यास मदत करणाऱ्या विशिष्ट जनुकांचा शोध लागला असून, हे संशोधन भविष्यात दीर्घायुष्य प्राप्त करण्याच्या दिशेने मोठी क्रांती ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
स्पेनच्या रहिवासी असलेल्या मारिया ब्रोनियास मोरेरा यांचे 117 व्या वर्षी, ऑगस्ट 2024 मध्ये निधन झाले. विशेष म्हणजे, त्यांनी पहिले महायुद्ध आणि स्पॅनिश गृहयुद्ध अनुभवले होते. दीर्घायुष्याच्या प्रवासात त्यांना मोठ्या आरोग्यविषयक अडचणी आल्या नाहीत. त्यांच्या मुलीनुसार, मारिया कधीच गंभीर आजारी पडल्या नाहीत, मात्र त्यांच्या मृत्यूपूर्वी दृष्टी, श्रवणशक्ती आणि स्मरणशक्ती थोडी मंदावली होती. शास्त्रज्ञांनी त्यांच्या मायक्रोबायोम आणि डीएनएचे विश्लेषण केले असता असे आढळले की त्यांचे जनुकीय स्वरूप सामान्य माणसांपेक्षा भिन्न होते. या विशेष जनुकांमुळे त्यांचे वय 17 वर्षांनी वाढले, म्हणजेच त्यांचे शरीर मृत्युसमयी 117 नव्हे, तर केवळ 100 वर्षांचे होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोहिनूर हिरा भारताला परत मिळणार? ब्रिटनच्या ‘या’ महत्त्वपूर्ण निर्णयानंतर चर्चेला उधान
संशोधनात असे दिसून आले की मारिया यांची जीवनशैली अत्यंत निरोगी आणि संतुलित होती, जी त्यांच्या दीर्घायुष्याचा मुख्य कारण ठरली. त्यांची रक्तातील साखरेची पातळी, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि शरीरातील चयापचय प्रक्रियेचे संतुलन अत्यंत योग्य होते.
त्यांनी हेल्दी डाएट फॉलो केला –
दही – त्यांचा आहार दह्याने समृद्ध होता, ज्यामुळे पचनसंस्था आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
नियमित व्यायाम – त्यांनी आपले दैनंदिन कार्य स्वतःच केले, त्यामुळे शरीर सक्रिय राहिले.
धूम्रपान आणि मद्यपान टाळले – त्यांनी कधीही सिगारेट किंवा दारूचे सेवन केले नाही.
कमी तेल आणि मसाले युक्त आहार – ते शुद्ध, घरगुती आणि पौष्टिक अन्न सेवन करत होत्या.
हे सर्व घटक त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी जबाबदार ठरले, ज्यामुळे त्यांच्या जनुकांतील नैसर्गिक दीर्घायुष्याच्या प्रवृत्तीला अधिक चालना मिळाली.
मारिया यांचे डीएनए अभ्यासल्यानंतर शास्त्रज्ञांना काही विशिष्ट जनुकांबद्दल माहिती मिळाली, जी मानवी शरीरातील वृद्धत्व प्रक्रिया संथ करण्यास मदत करू शकतात. वैज्ञानिकांनी या निष्कर्षांवर पुढे संशोधन सुरू केले असून, भविष्यात या शोधाच्या आधारे वृद्धत्व रोखणाऱ्या उपचार पद्धती विकसित केल्या जाऊ शकतात. जर वैज्ञानिक या विशिष्ट जनुकांवर अधिक संशोधन करून त्याचा मानवी आरोग्यावर प्रभाव निश्चित करू शकले, तर हे मानवी आयुर्मान वाढवण्याच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल ठरू शकते.
मारिया ब्रोनियास मोरेरा यांच्या जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन, आपले आयुष्य वाढवण्यासाठी खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे –
संतुलित आहार – शरीरासाठी आवश्यक असलेले पोषण मिळेल याकडे लक्ष द्या.
व्यायाम व शरीर सक्रिय ठेवा – रोज चालणे, हलका व्यायाम, योगासने करा.
धूम्रपान व मद्यपान टाळा – यामुळे शरीरावर घातक परिणाम होतो.
मानसिक आरोग्य जपा – तणावमुक्त जीवनशैली अवलंबा आणि आनंदी राहा.
झोपेची योग्य सवय ठेवा – चांगली झोप शरीराच्या पुनर्निर्मितीला मदत करते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तर कोरियाच्या ‘Sky Eye’ ने उडवली अमेरिकेची झोप; जाणून घ्या काय आहे भारताशी संबंध?
मारिया ब्रोनियास मोरेरा यांच्या जनुकांवर आणि जीवनशैलीवर केलेल्या संशोधनामुळे वृद्धत्वावरील उपाय शोधण्याच्या दिशेने वैज्ञानिकांना मोठे यश मिळाले आहे. हे संशोधन पुढे नेल्यास मानवी आयुर्मान वाढवण्यासाठी नवे मार्ग खुले होतील, आणि वृद्धत्वाची प्रक्रिया संथ करण्यासाठी उपाय शोधता येतील. त्यामुळे आता मरण्याचे टेन्शन कमी होण्याचा मार्ग वैज्ञानिकांनी दाखवला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही! 🚀