संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. असातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याच्या गैरसमजातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी तत्पर कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.
प्रिन्स शैलेंद्र सिंग (वय २६, रा. भैरवनाथनगर, कोंढवे धावडे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी करण गणपत वाशिलकर (वय ३४), रोहित उर्फ ओजी गणेश मौर्य (वय २४), गणेश सिद्धराम कालदीप (वय २०), आदित्य गणेश पवार आणि बबलू शिवाजी कांबळे (वय २२, सर्व रा. उत्तमनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत प्रिन्स सिंग यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर परिसरातील कोंढवे गेट भागात प्रिन्स सिंग हे ५ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा गैरसमज आरोपी करण वाशिलकर याला झाला. या कारणावरून वाशिलकर आणि त्याचे साथीदार रोहित मौर्य, गणेश कालदीप, आदित्य पवार आणि बबलू कांबळे यांनी सिंग यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर संतापाच्या भरात आरोपींनी सिंग यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले.
दरम्यान घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र उत्तमनगर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत सर्व आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड करत आहेत.
हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार
वैमनस्यातून एकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड भागात शुक्रवारी रात्री घडली आहे. गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरातील दोन टोळ्यांमधील वर्चस्वातून गाेळीबार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी सराइतांसह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी गुलटेकडीत अल्पवयीनांनी पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत माजविल्याची घटना घडली होती. मोझेस शेकापुरे उर्फ मोझ्या (वय २२, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बालाजी उमाप, राम उमाप यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






