SCO Tianjin Summit 2025 : PM मोदींचे चीनमध्ये ग्रँड वेलकम; जिनपिंग-पुतिन यांच्याशी होणार महत्त्वपूर्ण चर्चा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
SCO Tianjin Summit 2025 : सात वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चीनच्या भूमीवर पोहोचले आहेत. तियानजिन विमानतळावर त्यांचे रेड कार्पेटवर स्वागत करण्यात आले. पारंपरिक भारतीय नृत्य ‘कथक’द्वारे झालेले हे स्वागत विशेष ठरले. भारतीय समुदायाच्या उत्साही उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भारतमय झाले होते. हा दौरा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नसून, भारत-चीन संबंधांच्या नव्या अध्यायाचा संकेत देणारा मानला जात आहे.
पंतप्रधान मोदी नुकतेच जपानच्या दोन दिवसांच्या दौर्यावरून थेट चीनमध्ये पोहोचले. जपानमध्ये त्यांनी सेन्डाई येथील सेमीकंडक्टर प्लांटला भेट दिली, स्थानिक राज्यपालांशी चर्चा केली तसेच भारत-जपान सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन केले. उत्पादन, स्टार्ट-अप्स, लघु व मध्यम उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील सहकार्य या भेटीत केंद्रस्थानी होते. त्या अनुषंगाने आता चीन भेटीद्वारे ते आशियातील प्रादेशिक सहकार्याच्या समीकरणांना गती देण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL: ट्रम्प मरणार? ‘सिम्पसन’चे भाकित आणि राष्ट्राध्यक्ष बेपत्ता, सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ, व्हाईट हाऊस चिंतेत
चीनमधील तियानजिन येथे मोदींचे स्वागत अत्यंत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. ‘सचित’ म्हणून भारतात प्रसिद्ध असलेल्या कथक नृत्यांगना डू जुआन यांनी खास सादरीकरण केले. मोदींसाठी हा नृत्यप्रयोग करण्यासाठी त्यांनी तब्बल १२ वर्ष साधना केली असल्याचे सांगून ती अभिमानाची गोष्ट असल्याचे स्पष्ट केले. भारतीय प्रवासी समुदायातील अनेक सदस्यही मोदींचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. “२०१५ मध्ये आम्ही शांघायमध्ये मोदींना भेटलो होतो. आता पुन्हा त्यांना भेटण्याची संधी मिळणे रोमांचक आहे,” असे प्रवासी भारतीय मकरांत ठक्कर यांनी सांगितले.
Landed in Tianjin, China. Looking forward to deliberations at the SCO Summit and meeting various world leaders. pic.twitter.com/gBcEYYNMFO
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2025
credit : social media
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणारी शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) शिखर परिषद या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या व्यासपीठावर मोदी आशियातील प्रमुख नेत्यांसोबत विविध सुरक्षाविषयक, व्यापारिक आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करतील. जागतिक राजकारणात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपली संतुलित भूमिका मांडेल, अशी अपेक्षा आहे.
या दौऱ्याचे सर्वांत महत्त्वाचे अंग म्हणजे पंतप्रधान मोदींच्या द्विपक्षीय बैठका. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी स्वतंत्र बैठकांची योजना आखण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार, टॅरिफ वाद, सुरक्षा आणि प्रादेशिक सहकार्य यांसारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, या भेटींतून भारत आपले हितसंबंध ठामपणे मांडेल तसेच आर्थिक सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले करण्याचा प्रयत्न करेल.
भारत-चीन संबंध गेल्या काही वर्षांत तणावपूर्ण राहिले आहेत. सीमा विवाद, व्यापार संतुलन आणि जागतिक राजकीय समीकरणे या अनेक कारणांमुळे संबंधांमध्ये अनेकदा चढउतार झाले. मात्र, मोदींचा हा दौरा द्विपक्षीय संवाद पुन्हा सक्रिय करण्याचा एक प्रयत्न मानला जात आहे. भारतीय तज्ज्ञांच्या मते, या भेटीद्वारे भारत आशियातील सहकार्य वाढवण्याचा संदेश देईल आणि अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर संतुलित रणनीती अवलंबत असल्याचे दाखवून देईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पच्या टॅरिफमुळे बदलली जगाची राजनीती… रशिया, चीन आणि भारतानंतर आता ‘हे’ 3 देश करणार महायुती
जगभरातील नेत्यांचे लक्ष या दौर्याकडे लागले आहे. भारत आशियाई सहकार्याचा केंद्रबिंदू बनत असताना, मोदींच्या उपस्थितीमुळे एससीओ परिषदेत भारताची भूमिका अधिक ठळक होईल. जागतिक सुरक्षेचे प्रश्न, व्यापारातील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणाव या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींचा चीन दौरा ऐतिहासिक मानला जात आहे.