शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशमध्ये खटला सुरु असून मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची शक्यता आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Sheikh Hasina resignation : बांगलादेशच्या राजकारणात खळबळ उडवणारा एक नवा खुलासा समोर आला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्याच्या घटनाक्रमात त्यांनी उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांपुढे ‘मला गोळ्या घाला आणि बंगभवनात गाडा’ असे धक्कादायक उद्गार काढल्याचे उघड झाले आहे. हे वक्तव्य त्यांनी राजीनामा देण्याआधी, प्राण संकटात असताना केले होते, असे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी न्यायालयीन सुनावणीदरम्यान सांगितले. हे विधान ५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या घटनांशी संबंधित आहे, जेव्हा बांगलादेशात लष्करी बंड घडले आणि शेख हसीनांचे सरकार उलथवून टाकण्यात आले. ‘प्रोथॉम आलो’ या बांगलादेशातील आघाडीच्या वृत्तपत्राने याविषयी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.
२०२४ हे वर्ष शेख हसीना यांच्यासाठी अत्यंत संकटमय ठरले. देशात सरकारविरोधी लाट उसळली होती. विद्यार्थी, तरुणवर्ग आणि विरोधकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनांचे सत्र सुरू केले. वाढती महागाई, भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जनतेचा रोष वाढत गेला. अखेर लष्कराने हस्तक्षेप करत सरकार पाडले. या दरम्यान शेख हसीनांना देश सोडावा लागला आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी सांगितल्याप्रमाणे, शेख हसीनांना राजीनाम्याचा दबाव आला तेव्हा त्यांनी मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘COVID-19’ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘Wuhan Lab Leak Theory’ पुन्हा चर्चेत; नवीन संशोधन आले समोर
शेख हसीनांच्या पदच्युतीनंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांच्याही नेतृत्वाखाली बांगलादेशात शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. विद्यार्थी आणि नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले असून युनूस सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या आंदोलनांनी पुन्हा देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले आहे.
शेख हसीनांच्या पदच्युतीनंतर, बांगलादेशाचे लष्कर सत्तेवर आले. तणावपूर्ण राजकीय परिस्थितीत लष्कराने आपत्कालीन बैठक घेतली, ज्यात पाच लेफ्टनंट जनरल, आठ मेजर जनरल (जीओसी), स्वतंत्र ब्रिगेडचे कमांडिंग अधिकारी आणि लष्कर मुख्यालयातील प्रमुख अधिकारी सहभागी झाले. यामध्ये निवडणुका लवकरात लवकर पार पाडाव्यात, जेणेकरून लष्कर पुन्हा त्यांच्या बॅरेकमध्ये परतू शकेल, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यामुळे पुढील काही महिन्यांत बांगलादेशात राजकीय पुनर्रचनेची प्रक्रिया वेग घेताना दिसणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन कधीपर्यंत बनवणार ‘1000’ Nuclear weapons? अमेरिकन गुप्तचर अहवालात सत्य आले समोर
शेख हसीना यांनी अनेक दशकांपासून बांगलादेशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. त्यांचे नेतृत्व, दृढ इच्छाशक्ती आणि संकटातही न झुकणारा स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांनी ‘मला गोळ्या घाला आणि बंगभवनात गाडा’ असे उद्गार काढणे, हे त्यांच्या संघर्षशील वृत्तीचे निदर्शक मानले जात आहे. आज, बांगलादेश एका निर्णायक वळणावर आहे. राजकीय अस्थिरता, लष्करी हस्तक्षेप आणि जनतेचा संताप यांमुळे पुढील काळात या देशाच्या भवितव्याची दिशा निश्चित होणार आहे. जगाच्या राजकीय नकाशावर बांगलादेश पुन्हा स्थिरतेकडे वाटचाल करेल का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.