'दहशतवाद अन् ड्रग्ज...', पाकिस्तानचे 'हे' षड्यंत्र झाले उघड, नेमकं काय आहे प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काबूल: पाकिस्तान आणि तालिबानमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानवर गंभीर आरोप आहेत. तालिबानने पाकिस्तानच्या कटकारस्थानांचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानवर दहशतवाद्यांना आसरा देत असल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना तालिबानने दावा केला आहे की, पाकिस्तानच त्यांच्या राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी दहशतवादाला आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला प्रोत्साहन देत आहे.
इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या ‘सेंट्रल कमिशन फॉर सिक्युरिटी अँड क्लिअरन्स अफेयर्स’ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात पाकिस्तानवर गंभीर आरोप करत त्यांच्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून देशात अंमली पदार्थांची तस्करी वाढवत आहे. तसेच, अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी मोहिमेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाकिस्तानकडून अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाला पाठिंबा
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे रसायने अवैध मार्गाने अफगाणिस्तानात पोहोचवले जात आहेत. विशेषतः पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील अरनाई, लोरलई आणि गुलिस्तान या भागांत अफूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.
पाकिस्तान अफगाणिस्तानवर अंमली पदार्थांच्या व्यापाराचा आरोप करत असला तरी, प्रत्यक्षात या तस्करीत पाकिस्तानच मुख्य भूमिका बजावत आहे, असे तालिबानने स्पष्ट केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार घडवण्याचा पाकिस्तानचा कट
याशिवाय, पाकिस्तानकडून दहशतवादी गटांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा तालिबानने केला आहे. अहवालानुसार, पाकिस्तानच्या कबायली भागांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येते आणि त्यांना अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी पाठवले जाते.
बलुचिस्तानमधील काही भागांत या गटांना आसरा दिला जात आहे. तसेच, कराची आणि इस्लामाबादमधील विमानतळांच्या माध्यमातून पाकिस्तान या कारवाया राबवत असल्याचे तालिबानने म्हटले आहे.
अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार घडवणारे पाकिस्तानचे नागरिक?
तालिबानच्या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये बहुसंख्य पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग आहे. अफगाणिस्तानात अस्थिरता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी गट मिळून काम करत आहेत.
तालिबानने हेही नमूद केले आहे की, पाकिस्तान हा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवत असून, दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीद्वारे संपूर्ण प्रदेशातील शांतता धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे.