भाजपच्या मिशन 125 समोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Pune Poliyics : पुणे : निखील सुक्रे : राज्यामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून आश्वासनांची खिरापत वाटली जात आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. याच पार्श्वभूमीवर, पुण्यामध्ये देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने ‘मिशन 125’ चा नारा दिला असला, तरी प्रत्यक्षात मात्र भाजपसमोर मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठे आव्हान उभे केले आहे. खासगी आणि शासकीय सर्वेक्षणांमधील प्रतिकूल अहवालांमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बड्या नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याची माहिती समोर येत आहे.
अजितदादांच्या ‘पॉवर’ गेममुळे भाजपची गणिते बिघडली?
पुणे महापालिकेत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी केलेली युती आणि पुण्यातील बदललेली राजकीय समीकरणे भाजपच्या मुळावर येण्याची शक्यता आहे. भाजपमधील तिकीट नाकारलेल्या नाराज इच्छुकांनी आणि बंडखोरांनी मोठ्या प्रमाणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे. यामुळे भाजपच्या हक्काच्या जागांवर आता मित्रपक्षच तगडे आव्हान देत आहे.
हे देखील वाचा : पुण्यात ठाकरेंच्या गडाला सुरूंग; अधिकृत उमेदवारांचाच भाजपमध्ये प्रवेश
मुख्यमंत्र्यांचा ‘एअरपोर्ट’वर नेत्यांना डोस!
सोमवारी (दि.05) रात्री कात्रज येथील जाहीर सभा संपल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाच गाडीतून विमानतळापर्यंत प्रवास केला. यावेळी विमानतळावर बंद दाराआड झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील १६५ जागांचा सविस्तर आढावा घेतला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या प्रभागांमध्ये भाजपची स्थिती कमकुवत आहे आणि जिथे सर्व्हेचे निकाल विरोधात गेले आहेत, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली. “गाफील राहू नका, कोणत्याही परिस्थितीत विजयाचा आकडा गाठा,” अशा कडक शब्दांत त्यांनी नेत्यांना तंबी दिल्याचे समजते.
हे देखीव वाचा : “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
डॅमेज कंट्रोलसाठी भाजपकडून तातडीने नव्या नियुक्त्या
मुख्यमंत्र्यांच्या या तडाख्यानंतर पुणे भाजपमध्ये तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वयासाठी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी तीन महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत:
1. रवींद्र साळेगांवकर: पुणे शहर निवडणूक संचलन समिती समन्वयक
2. राजेश येनपुरे: पुणे शहर सह-निवडणूक प्रमुख
3. दीपक पोटे: पुणे शहर सह-निवडणूक प्रमुख
या नियुक्त्यांच्या माध्यमातून बंडखोरी शमवणे आणि विस्कळीत झालेली यंत्रणा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. मात्र, अजित पवारांच्या चक्रव्यूहातून भाजप आपले ‘मिशन 125’ कसे यशस्वी करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, भाजपला शिंदे सेना आणि दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान असणार आहे.






