काँगोमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केले रक्तरंजित हत्याकांड; महिलांसह ६६ जणांची निर्घृण हत्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ADF attack Congo : लोकशाही प्रजासत्ताक काँगोच्या (Democratic Republic of Congo) पूर्व भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी गटाने केलेल्या भयंकर हल्ल्याने पुन्हा एकदा संपूर्ण जग हादरले आहे. या हिंसक कारवाईत महिलांसह किमान ६६ निष्पाप नागरिकांचा निर्घृण खून करण्यात आला असून, यामागे अलाइड डेमोक्रॅटिक फोर्सेस (Allied Democratic Forces – ADF) या इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या हल्ल्याची अधिकृत माहिती स्थानिक प्रशासन आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी दिली आहे. हल्ला इरुमु (Irumu) प्रांतात घडला असून, हे ठिकाण युगांडाच्या सीमेलगत आहे. दहशतवाद्यांनी चाकू आणि अन्य धारदार शस्त्रांद्वारे लोकांवर हल्ला चढवला. विशेष म्हणजे, या अत्याचारात महिलांचाही समावेश होता.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) प्रवक्ते जीन टोबी ओकाला यांनी या घटनेचा उल्लेख “रक्तपात” असा करत सखोल दुःख व्यक्त केले. प्रारंभी मृतांचा आकडा ३० होता, मात्र नागरी समाजाकडून पुढे आलेल्या माहितीनुसार, तो आता ६६ वर पोहोचला आहे. गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान वॉल्से वोनकुटू (Walese Vonkutu) परिसरात ही भीषण घटना घडली.
या हल्ल्याला युगांडा आणि काँगो सैन्याने रविवारी सुरू केलेल्या हवाई बॉम्बहल्ल्यांचा प्रतिशोध मानले जात आहे. ADF हा दहशतवादी गट २०१९ पासून इस्लामिक स्टेटशी थेट संबंधित असून, तो काँगो आणि युगांडा सीमाभागात अत्यंत सक्रिय आहे. ADF च्या इतिहासात असे हल्ले नेहमीच अत्यंत हिंसक स्वरूपाचे राहिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मानवी इतिहासातील सर्वात मोठा साप कोणता? भारतातील ‘वासुकी’ की कोलंबियाचा ‘टायटानोबोआ’
इरुमु प्रांतातील नागरी समाजाचे प्रमुख मार्सेल पालुकु यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी कोणतीही दया न दाखवता महिलांचाही निर्दयपणे खून केला. अपहरणाच्या घटनाही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घडल्या असाव्यात, मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पूर्व काँगोमध्ये आधीच M23 या युगांडा समर्थित बंडखोर संघटनेमुळे तणाव आहे. अशात ADF कडून पुन्हा एकदा दहशत वाढवली जात आहे. मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, या गटाने अलिकडच्या काही वर्षांत शेकडो लोकांची हत्या केली आहे. विशेषतः मुलांच्या अपहरणाच्या घटनांत ADFचा सहभाग असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अहवालात नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात ADF ने उत्तर किवू (North Kivu) प्रांतातील एका गावावर हल्ला केला होता, ज्यात १० जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते.
काँगोच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १० टक्के मुस्लिम समुदाय आहे. यातील बहुतांश लोक देशाच्या पूर्व भागात स्थायिक आहेत. ADF सारख्या गटांच्या वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे या समुदायालाही संशयाच्या नजरेने पाहिले जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : असीम मुनीर राष्ट्रपती होणार? झरदारी यांना हटवण्याच्या चर्चांवर शाहबाज शरीफ यांचं ‘मोठं विधान’
पूर्व आफ्रिकेतील या भागात सुरू असलेल्या संघर्षात सामान्य नागरिकांचं जीवित धोक्यात आहे. ADF च्या वाढत्या हिंसेला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधित अशा संघटनांमुळे अफ्रिकेतील अनेक देश अस्थिरतेच्या विळख्यात अडकले आहेत. आता प्रश्न हा आहे की, हे रक्तपात थांबणार कधी?