पाकिस्तानच्या राजकारणात वादळ! असीम मुनीर राष्ट्रपतीपदावर? शाहबाज शरीफ यांची स्पष्टोक्ती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Storm in Pakistani politics Asim Munir : पाकिस्तानच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि लष्करी गोटात असलेले तणाव पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. विद्यमान राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हा दबाव कोणी सामान्य राजकीय विरोधकांनी नाही, तर थेट लष्कराच्या उच्च पातळीवरून येत असल्याची अटकळ वर्तवली जात आहे. त्यातही पाकिस्तानचे आर्मी चीफ फील्ड मार्शल असीम मुनीर स्वतः राष्ट्रपती होण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सध्या देशभर गाजते आहे.
या चर्चांनी जोर धरताच, पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी अशा सर्व वावड्यांना आणि राजकीय अटकळींना फेटाळून लावत म्हटले की, “फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी कधीही राष्ट्रपती होण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही आणि ना त्यांनी अशी कोणतीही योजना आखलेली आहे.”
शाहबाज शरीफ यांच्या या वक्तव्यानंतर एकीकडे राजकीय वर्तुळात काहीसा स्थैर्य आलं असलं, तरी अनेक तज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक या नकारात्मकतेच्या भूमिकेला संपूर्ण सत्य मानायला तयार नाहीत. कारण पाकिस्तानमध्ये लष्कराचा राजकारणात हस्तक्षेप ही काही नवी बाब नाही. अनेक वेळा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लष्करच महत्त्वाचे निर्णय घेत असल्याचा इतिहास देशाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मानवी इतिहासातील सर्वात मोठा साप कोणता? भारतातील ‘वासुकी’ की कोलंबियाचा ‘टायटानोबोआ’
असिफ अली झरदारी हे सध्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे वरिष्ठ नेते आणि विद्यमान राष्ट्रपती आहेत. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णयक्षमतेवर गेल्या काही महिन्यांपासून टीका केली जात होती. यामध्ये लष्कर आणि सत्ताधारी गटातील काही मंडळींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातं. त्यात आता असीम मुनीर यांचे नाव पुढे आल्याने चर्चेला अधिक तीव्रता मिळाली आहे.
पाकिस्तानमधील परिस्थिती पाहता, राष्ट्रपती हे केवळ नाममात्र पद नसून ते लष्करासाठीही एक महत्त्वाचे स्थान आहे. जर लष्कराचा प्रतिनिधी राष्ट्रपतीपदावर येतो, तर संपूर्ण राजकीय संतुलनच बदलू शकतो. त्यामुळे असीम मुनीर राष्ट्रपती होतील ही चर्चा काही एका वाक्याने थांबेल अशी शक्यता कमीच आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ हे लष्कराशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सरकारला लष्कराचे अनेकवेळा समर्थन मिळाले आहे. यामुळेच, असीम मुनीर यांच्याबद्दल ते कधीही नकारात्मक वक्तव्य करत नाहीत. उलटपक्षी, ते कायम त्यांचे कौतुक करताना दिसतात. त्यामुळे शाहबाज शरीफ यांनी असीम मुनीर राष्ट्रपती होतील या चर्चेवर “नाही” म्हणणे, हे राजकीय दृष्टिकोनातून साहजिकही मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनची ‘Super H-Bomb’ची चाचणी जगाला हादरवणारी; मॅग्नेशियम हायड्राइडने अणुबॉम्बलाही टाकले मागे
सध्याच्या घडामोडी पाहता, पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे. झरदारी यांच्यावरचा दबाव, असीम मुनीर यांची भूमिका आणि शाहबाज शरीफ यांचे विधान – या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदावर कोण विराजमान होईल, हे येणारा काळच ठरवेल. तथापि, पाकिस्तानसारख्या देशात राजकारण आणि लष्कर यांचे नाते खूपच गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे अटकळी, चर्चा आणि वाद हे कायमच सुरू राहणार. असीम मुनीर यांचे नाव चर्चेत आल्याने राजकीय भूकंपाची शक्यता काही केल्या नाकारता येत नाही.