'भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही सोडवली...' ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर 'हे' धक्कादायक विधान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी घडवून आणल्याचा दावा करत जागतिक पटलावर चर्चेची लाट निर्माण केली आहे. इतकेच नव्हे तर ट्रम्प यांनी आर्मेनिया-अझरबैजानसह पाच मोठी युद्धे सोडवल्याचे सांगत स्वतःच्या नेतृत्वाची जोरदार प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर, वादग्रस्त ‘टॅरिफ वॉर’लाही त्यांनी समर्थन दिले असून, शुल्कांमुळे अमेरिकेला “शत्रूंवर अधिक शक्ती मिळाल्याचा” ठाम दावा केला आहे.
“शुल्कांनी(Tariff) केवळ आम्हाला आर्थिक लाभ दिला नाही, तर आमच्या शत्रूंवर अधिक अधिकार मिळवून दिला आहे. आम्ही पाच युद्धे सोडवली आहेत. पाकिस्तान आणि भारत, अझरबैजान आणि आर्मेनिया… हे संघर्ष ३७ वर्षांपासून सुरू होते. दोन्ही देशांचे नेते उभे राहून म्हणाले की, आम्हाला कधीच वाटले नव्हते की हे सोडवले जाईल. रशिया आणि इतरांनीही प्रयत्न केले, पण आम्हीच ते यशस्वीपणे सोडवले.“
#WATCH | US President Donald Trump says, “…The tariffs have helped, gives us not only the money, but it gives us great power over enemies. We solved five wars- Pakistan and India. Azerbaijan and Armenia- it was raging for 37 years, and the two leaders got up and they said, we… pic.twitter.com/8mT1MVCFmT
— ANI (@ANI) August 11, 2025
credit : social media
ट्रम्प यांचा हा दावा नवीन नाही. १० मे रोजी पहिल्यांदा ट्विट करत त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत स्वतःची भूमिका मांडली होती. त्यानंतर विविध व्यासपीठांवर त्यांनी हा दावा किमान ३२ वेळा केला आहे. मात्र, भारताने सुरुवातीपासूनच या दाव्याला ठाम नकार दिला आहे. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीत कोणत्याही बाहेरील देशाची मध्यस्थी नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेत हे विधान अधोरेखित करत म्हटले होते की, “पाकिस्तानवरील कारवाई थांबवण्यासाठी कोणत्याही नेत्याने किंवा राजकारण्याने मला सांगितले नाही. भारताचे निर्णय पूर्णपणे सार्वभौम आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : समुद्रातील थरार! फिलीपिन्सच्या बोटीचा पाठलाग करताना चिनी जहाजे एकमेकांवरच आदळली; पाहा धक्कादायक VIRAL VIDEO
भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त, ट्रम्प यांनी आपल्या नेतृत्वाखाली आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील संघर्ष थांबवण्याचा उल्लेखही केला. काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये या दोन देशांच्या नेत्यांनी शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. कॉकस प्रदेशातील या संघर्षात अनेक दशकांपासून तणाव सुरू होता. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, या युद्धांमध्ये रशिया, युरोपियन युनियन आणि इतर देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरले. “ही अत्यंत कठीण परिस्थिती होती, पण आम्ही ती सोडवली,” असे ट्रम्प ठामपणे म्हणाले.
ट्रम्प यांनी ‘टॅरिफ वॉर’चे समर्थन करत सांगितले की, उच्च आयात शुल्कामुळे अमेरिकेला केवळ मोठा आर्थिक फायदा झाला नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकेची पकड अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या मते, या धोरणामुळे विरोधी देशांवर दबाव आणणे अधिक सोपे झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऊर्जाक्षेत्रात रशियाची LNG झेप; जागतिक ऊर्जा खेळातील नवा मोहरा, अमेरिका–युरोपलाही नितांत गरज
ट्रम्प यांच्या अशा दाव्यांवर अमेरिकेत आणि बाहेरही मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. समर्थकांचा दावा आहे की ट्रम्प यांच्या कडक परराष्ट्र धोरणामुळे काही संघर्ष थांबले, तर टीकाकारांचे मत आहे की ट्रम्प हे अतिशयोक्तीपूर्ण विधान करून स्वतःच्या प्रतिमेला चालना देत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “भारत-पाकिस्तान प्रश्न हा द्विपक्षीय आहे आणि त्यात कोणत्याही तृतीय पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही.” जागतिक राजकारणातील ही चर्चा किती तथ्याधारित आहे, याचा निर्णय इतिहास घेईल. मात्र, ट्रम्प यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान प्रश्न चर्चेत आला आहे.