Bangladesh Crisis: मोहम्मद युनूस सरकारवर संकटाचे सावट; अमेरिकेने काढून घेतली 'ही' मोठी मदत(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: एकीकडे शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस सरकार स्थापन झाले असून सध्या देशात राजकीय उलथापालथ सुरु आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशच्या मोहम्मद यूनुस सरकारला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी बांगलादेशला अमेरिककडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर तातडीने बंदी घातली आहे. यामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या USAIDने पत्राद्वारे याबाबत अधिकृत माहिती दिली असून, ट्रम्प यांच्या नव्या कार्यकारी आदेशाचा हवाला देत तातडीने बांगलादेशचे सर्व आर्थिक सहाय्य थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
एकामागून एक कडक निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच एकामागून एक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यांनी बांगलादेशसोबतच इतर देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर देखील 90 दिवसांसाठी स्थगिती आणली आहे. याआधी त्यांनी युक्रेनला दिल्या जाणाऱ्या मदतीवरही बंदी घातली होती. तसेच त्यांनी मेक्सिको आणि कॅनडावर देखील 25 टक्के कर लादला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
मोहम्मद यूनुस सरकार संकटात
मोहम्मद यूनुस यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि जो बायडेन यांचे जवळचे होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाने मोहम्मद यूनुस यांना जो बायडेन समर्थक म्हणून लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांच्या मते, बांगलादेशच्या सध्याच्या सरकारने अमेरिकेच्या हिताला बाधा आणली आहे. यामुळे त्यांना सत्तेतून हटवण्यासाठी ट्रम्प प्रशासन पर्याय शोधत आहे. ट्रम्प प्रशासनाने येत्या महिन्यात होणाऱ्या नेशनल ब्रेकफास्ट प्रेयर्स कार्यक्रमात बांगलादेशच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. यामुळे बांगलादेशमध्ये लवकरात लवकर निवडणुकांचा दबाव वाढवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी देश सोडल्यानंतर मोहम्मद यूनुस यांनी बांग्लादेशची सत्ता हस्तगत केली होती.
आंतरराष्ट्रीय प्रभाव
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर मोठे परिणाम होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी नुकतेच जाहीर केले की, अमेरिकेने परदेशी आर्थिक सहाय्याचे संपूर्ण पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच बायडेन यांच्या अनेक निर्णयांवर पुनर्विचार करत ते पलटवले आहेत. या धोरणांमध्ये बेकायदेशीर प्रवासी, नागरिकत्वाचा मुद्दा आणि आर्थिक मदतीवर आंतरराष्ट्रीय निर्बंध यांचा समावेश आहे. त्यांच्या या निर्णयांमुळे जागतिक पातळीवर अमेरिकेच्या धोरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत.