फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प प्रशासनात अनेक पदांच्या नियुक्त्या केल्या. ट्रम्प यांच्या विजयानंतर संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. यामुळे पश्चिम आशियातील राजकीय स्थिरतेवर मोठा परिणाम झाला आहे. ट्रम्प यांच्या सभाव्य धोरणांमुळे इराणमध्ये सत्तापालटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.संपूर्ण मध्येपूर्वेत दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.
एकीकडे इस्त्रायल हमास हिजबुल्लाह आणि इराणवर कारवाई केली जात असून एक वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या शासनाला पाडण्याचा कट ट्रम्प यांनी रचला आहे. या अहवालानुसार, इराणचे अध्यक्ष मसूद पेजशाकियान हे खामेनेई यांची जागा घेतील असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांचे ध्येय इराणची ताकद कमी करून इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित करणे असल्याचा म्हटले जात आहे.
आर्थिक निर्बंध आणि राजकीय नियुक्त्या
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आधीच्या काळामध्ये इराणसोबतचा अणुकरार संपुष्टात आणला होता. यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्बंध लादले. आता, नव्या कार्यकाळातही त्यांनी इराणविरोधी धोरण अधिक आक्रमक बनवण्याची तयारी केली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात इराणविरोधी लोकांना प्रमुख पदांवर नेमले आहे. माईक वॉल्ट्ज यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून, माईक हुकाबी यांना इस्रायलमधील राजदूत म्हणून, तर पीट हेगसेथ यांना संरक्षण सचिव म्हणून नियुक्त केले आहे. हेगसेथ यांनी इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ल्याची शिफारस केली आहे.
इराणने ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता
इराणने ट्रम्प यांना कट्टर शत्रू मानले आहे. ट्रम्प यांच्या निवडणुक प्रचारादरम्यान, इराणने त्यांची हत्या करण्याचा कट रचल्याचे आरोप झाले होते. सप्टेंबरमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने एका भाडोत्री मारेकऱ्याला ट्रम्प यांना ठार मारण्याचे आदेश दिले होते इफ्राद शकेरी नावाच्या व्यक्तीवर ट्रम्प यांच्या हत्येची जबाबदारी सोपवण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर, इराणसाठी ट्रम्प यांचे अध्यक्षपद अधिक संकटे निर्माण करू शकते.
मात्र इराणने हे आरोप फेटाळून लावले होते. इराणचे प्रमुख खामेनेई यांनी म्हटले होते की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कोणताही हेतू इराणचा नाही. याउलट इराण अमेरिकेसोबत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात हा संदेश इराणने अमेरिकेला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
इराणवर ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचा काय परिणाम होईल
ट्रम्प यांच्या प्रशासनाचा इराणवर तेल निर्यातीसह कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचा विचार आहे. त्यामुळे इराणमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच, पश्चिम आशियातील राजकीय तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेच्या या धोरणामुळे इराणमध्ये सत्ता बदलाच्या हालचालींना चालना मिळू शकते.