Turkey‑Bangladesh defense ties : दक्षिण आशियातील कोंडीत अडकलेल्या भौगोलिक समीकरणांना आता आणखी एक धक्का बसला आहे. तुर्की आणि बांगलादेशमधील नव्याने उगम पावलेली संरक्षण भागीदारी भारतासाठी मोठे धोरणात्मक आव्हान बनू शकते. तुर्कीचे अधिकारी बांगलादेशच्या दौऱ्यावर असून, चितगाव व नारायणगंज येथे शस्त्रनिर्मिती केंद्रे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, हे सगळं बांगलादेशच्या अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली भारतविरोधी मानसिकतेतून घडते आहे, असा आरोप भारतीय धोरणविश्लेषक करत आहेत.
तुर्कीच्या भारतविरोधी धोरणात बांगलादेशचा सहभाग?
तुर्कीने याआधीही काश्मीर, पाकिस्तान, इस्लामिक राष्ट्रांबाबत भारतविरोधी भूमिका घेतली होती. आता त्याच तुर्कीने बांगलादेशसारख्या शेजारी देशाशी संरक्षण क्षेत्रात हातमिळवणी केली आहे. तुर्कीच्या एसएसबी (संरक्षण उद्योग संस्थे) चे प्रमुख हालुक गोर्गन हे ८ जुलै रोजी ढाका भेटीवर येणार आहेत. ही भेट केवळ सौजन्यविषयक नसून, धोरणात्मक आणि लष्करी दृष्टीने अत्यंत निर्णायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बांगलादेश गुंतवणूक विकास प्राधिकरण (BIDA) ने तुर्कीसोबत मिळून संरक्षण कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत ड्रोन, रडार, क्षेपणास्त्रे, उपग्रह, आणि इतर संरक्षण उपकरणांचे उत्पादन बांगलादेशात केले जाईल. यामुळे बांगलादेश आता केवळ ग्राहक देश न राहता, लष्करी उत्पादक देशाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Independence Day 2025: जगाला पुरून उरणाऱ्या अमेरिकेवरही केलं होतं कोणीतरी राज्य; ‘असा’ आहे यामागचा रंजक इतिहास
भारताच्या दृष्टिकोनातून गंभीर परिस्थिती
भारतासाठी ही घडामोड अतिशय चिंताजनक आहे. एकीकडे चीनने आधीच बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर लष्करी, आर्थिक आणि तांत्रिक गुंतवणूक केली आहे. त्यात तुर्कीचाही सहभाग झाल्यास, दक्षिण आशिया व हिंद महासागर क्षेत्रात भारताविरुद्ध एक नवीन शक्तीगट तयार होण्याची शक्यता आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध NRC (नागरिकत्व नोंदणी), CAA (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि रोहिंग्या प्रश्नांमुळे आधीच तणावपूर्ण आहेत. त्यात बांगलादेशने भारतविरोधी भूमिकेकडे कल दर्शवण्यास सुरुवात केल्यास, भारताच्या पूर्व सीमांवरील लष्करी सजगतेसाठी खर्च व दबाव वाढणार आहे.
तुर्कीच्या संरक्षण कंपन्या आता बांगलादेशात
तुर्कीच्या बायरक्तार TB2 ड्रोन जगभर प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ROKETSAN, ASELSAN, काळे ग्रुप यासारख्या कंपन्या क्षेपणास्त्र, रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रज्ञानात आघाडीवर आहेत. या कंपन्यांनी स्थानिक उत्पादन केंद्रे उघडण्याची योजना आखली असून, भारतीय शेजारीच अशी संरक्षण उद्योगांची गुंतवणूक हे भारताच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम करू शकते.
मोहम्मद युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांचे धोरणही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारताने बांगलादेशात अनेक विकास प्रकल्प आणि सामाजिक मदत केली असताना, युनूस सरकार भारतविरोधी शक्तींशी जवळीक साधते आहे, हे धक्कादायक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपाचे 13 धक्के, 10 स्फोट… रशियाने युक्रेनची राजधानी कीववर अचानक डागले विनाशकारी क्षेपणास्त्र
भारताने धोरण बदलण्याची गरज
तुर्की-बांगलादेश भागीदारी ही फक्त संरक्षण उद्योगापुरती मर्यादित नाही, तर ती भारताच्या भौगोलिक आणि सामरिक सुरक्षेला आव्हान देणारी आहे. अशा परिस्थितीत, भारताला पूर्वेतील शेजाऱ्यांसोबतच्या धोरणांची पुनर्तपासणी करून दक्षिण आशियातील सामरिक संतुलन टिकवण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. बांगलादेशात तुर्कीच्या उपस्थितीचा वाढता प्रभाव चीन-तुर्की-बांगलादेश त्रिकोण तयार करतोय का? हा प्रश्न आता अधिक गंभीरतेने विचारात घ्यावा लागेल.