इस्रायल-अमेरिकेचं युद्ध इराणसोबत, घाबरलाय मात्र तुर्कस्तान; एर्दोआन यांना नक्की कसली भीती सतावतेय?
इराण आणि इस्रायल यांच्यात तब्बल 12 दिवस सुरू असलेल्या युद्धाने संपूर्ण पश्चिम आशियाला हादरवून सोडलं. युध्द थांबले असले तरी त्याचे पडसाद अनेक देशांमध्ये उमटत आहेत. यामधून सर्वात महत्त्वाचा धडा जगभरातील देशांनी घेतला, तो म्हणजे हवाई संरक्षण यंत्रणेची गरज. इराणच्या जोरदार क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळण्यात इस्रायलला यश आलं आहे. त्यामुळे तुर्कस्तान आता हवाई संरक्षणाची भीती सतावत आहे.
तुर्कीमध्ये या युद्धानंतर एक नवं भीतीदायक वातावरण तयार झालं आहे. ‘अनादोलू’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाच्या ‘स्टील डोम’ हवाई संरक्षण प्रणालीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशभरात स्तरित वायु संरक्षण यंत्रणा विकसित केली जाणार असून, हवाई हल्ल्यांचा धोका कमी करण्यासाठी आधुनिक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
तुर्की सध्या आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, हायपरसोनिक आणि क्रूज क्षेपणास्त्रे, जेट, युद्धनौका, रणगाडे, UAV, पुढच्या पिढीचे विमानवाहू युद्धनौके आणि फ्रिगेट यासह बहुआयामी संरक्षण प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. संरक्षण खर्चाच्या बाबतीतही तुर्कीने नाटोचा 2 टक्के खर्चाचा टप्पा पार केला असून, हे सरकारच्या प्राधान्यक्रमात संरक्षण क्षेत्र किती वरच्या स्थानी आहे, याचे द्योतक आहे.
इस्राईलने युद्धाच्या काळात वापरलेली ‘आयर्न डोम’, ‘डेव्हिड्स स्लिंग’ आणि ‘अॅरो’ ही तीन टप्प्यांची हवाई संरक्षण प्रणाली जगासमोर एक उदाहरण ठरली आहे. हिजबुल्ला, हमास आणि हूतींसारख्या गटांकडून होणाऱ्या नियमित हल्ल्यांपासून संरक्षण करताना आणि विशेषतः इराणच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून नागरिकांचे प्राण वाचवताना या प्रणालींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मात्र, काही क्षेपणास्त्रे इस्राईलच्या शहरांवर पडली आणि यामुळे हवाई संरक्षण प्रणालीची मर्यादा स्पष्ट झाली. अशा हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर तुर्कीला आपलीही सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज वाटत आहे. कारण तुर्की पश्चिम आशियातील एका संवेदनशील भौगोलिक स्थानावर आहे, आणि अशा युद्धांचा अप्रत्यक्ष परिणाम तुर्कीवरही होऊ शकतो.
या साऱ्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोआन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हवाई संरक्षणावर भर देण्याचा निर्णय घेतला असून, देशाची सीमारेषा आणि अंतर्गत सुरक्षेसाठी अत्याधुनिक प्रणालींची उभारणी करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. इराण-इस्राईल युद्धाने संपूर्ण क्षेत्रात अस्थिरता निर्माण केली आहे, आणि या अस्थिरतेतून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुर्कीसारखा देशही युद्धाच्या सावटाखाली आपली ढाल मजबूत करत आहे.