पाकिस्तानच्या अडचणीत वाढ; 'मोबाईल बॉम्ब'च्या वाढत्या धोक्यामुळे देशाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
PTA unregistered phones : एकीकडे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण कायम असताना, दुसरीकडे पाकिस्तानला आता आपल्या देशातीलच एका नव्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे बनावट व क्लोन मोबाईल फोनचा स्फोटक प्रसार. भारताच्या राफेल लढाऊ विमानं आणि रशियन S-400 हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांना तोंड देताना अतुलनीय भूमिका बजावली. मात्र याचवेळी पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला नोंदणीकृत नसलेल्या आणि क्लोन मोबाईल फोनमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.
पाकिस्तान टेलिकॉम अथॉरिटी (PTA) ने नुकताच इशारा दिला की, देशात मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत नसलेले आणि क्लोन केलेले मोबाईल फोन विकले जात आहेत. हे फोन्स केवळ तांत्रिक नियमांचे उल्लंघन करत नाहीत, तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीही मोठा धोका ठरू शकतात, असे PTA चे म्हणणे आहे.
सायबर गुन्हेगारी, आर्थिक फसवणूक आणि दहशतवादी संवाद यासाठी अशा मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती PTA आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या बनावट फोन्सवर कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
PTA ने स्पष्टपणे सांगितले आहे की बनावट किंवा क्लोन मोबाईल विकणाऱ्या व्यक्तीवर तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, त्याच्यावर फौजदारी खटला चालवला जाईल, आणि संबंधित मोबाईल ताब्यात घेण्यात येईल. PTA ने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही प्रकारचे मोबाईल विक्रीचे प्रकार आढळल्यास तात्काळ FIA कडे तक्रार करावी. त्याचप्रमाणे, DIRBS (Device Identification Registration and Blocking System) मध्ये नोंदणी नसलेले मोबाईल फोन स्वयंचलितपणे ब्लॉक केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.
८ मे रोजी पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरात सीमेवरून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. याआधी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके व पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्याला उत्तर देताना भारताने राफेल लढाऊ विमानं आणि S-400 हवाई संरक्षण प्रणाली यांचा वापर केला. विशेषतः S-400 ने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवाईतच उधळून लावली, आणि भारताच्या हवाई सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या राजकारणात वाहणार बदलाचे वारे; तुरुंगातूनही इम्रान खानने खेळली तिरपी चाल
S-400 ही रशियन बनावटीची एक आधुनिक आणि प्रभावी हवाई संरक्षण प्रणाली आहे. ती शत्रूच्या ड्रोन, क्षेपणास्त्रे, रॉकेट लाँचर आणि लढाऊ विमानांपासून संरक्षण करते. भारताने २०१८ मध्ये रशियाशी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा करार करत S-400 ची ५ युनिट्स खरेदी केली होती. या प्रणालीच्या मदतीने भारताने सीमारेषेवर झालेल्या हल्ल्यांना अचूक प्रत्युत्तर दिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पुन्हा दहशतवादी छावण्या उभारणार…’ शाहबाज शरीफ यांनी खुली केली देशाची तिजोरी
भारताकडून मिळालेल्या तांत्रिक आणि सामरिक दबावामधून वाचण्यासाठी झगडत असलेल्या पाकिस्तानसाठी आता अंतर्गत सुरक्षेचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे. बनावट मोबाईल फोन्सचा वाढता स्फोट आणि त्यामुळे होणारे सायबर गुन्हे यामुळे देशाची अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे. PTA ने घेतलेल्या कडक भूमिकेचा प्रभाव कितपत पडतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण सध्या तरी पाकिस्तानसाठी राफेल किंवा S-400 नव्हे, तर मोबाईलच ‘महाभयंकर’ ठरू शकतो, हे निश्चित.