मोठी बातमी! इराणने अमेरिकेचं बी-२ बॉम्बर पाडलं? ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’मध्ये होतं सामील
अमेरिकेच्या लष्करी इतिहासात अत्यंत महत्त्वाचं आणि गुप्त ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ मिशन सध्या चर्चेत आहे. या मिशन अंतर्गत अमेरिकेने इराणच्या भूगर्गात असलेल्या अण्वस्त्र प्रकल्पांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकले होते. मात्र, या हल्ल्यानंतर एक खळबळजनक दावा समोर आला आहे. या मिशनदरम्यान अमेरिकेचं एक B-2 स्टेल्थ बॉम्बर अचानक गायब झालं आहे. त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.
अहवालानुसार, या ऑपरेशनसाठी दोन स्वतंत्र ग्रुप तयार करण्यात आले होते. एक ग्रुप इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देण्यासाठी पाठवण्यात आला होता, तर दुसऱ्या विमानांच्या ताफ्याकडे थेट बंकर बस्टर बॉम्ब टाकण्याची जबाबदारी होती. पण यातील एक B-2 बॉम्बर बेसवर परतला नाही, असा दावा केला जात आहे. अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडारला चकवा देणाऱ्या या बॉम्बर्सना ट्रॅक करणे अत्यंत अवघड असते. त्यामुळे इतकं सुरक्षित आणि अत्याधुनिक विमान गायब होणं, चिंतेची बाब ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओही समोर आला आहे. होनोलुलु विमानतळावर B-2 बॉम्बर उभं असल्याचा व्हिडीओ माजी वैमानिक डेव्हिड मार्टिन यांनी शेअर केला आहे. यामुळे काही माध्यमांनी दावा केला आहे की, हे बॉम्बर तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करताना दिसत आहे. मात्र, तेच विमान गायब आहे की दुसरं याबाबत ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अमेरिकेच्या लष्करी विभागाकडून या रिपोर्टवर अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. या संदर्भात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्टेल्थ मिशनदरम्यान बॉम्बर्सचे रेडिओ आणि लोकेशन ट्रान्समीटर बंद ठेवले जातात, त्यांमुळे त्यांना ट्रॅकिंग करणं अशक्य असतं. अशाही शक्यता आहेत की, हे विमान गुप्त ठिकाणी तैनात करण्यात आले असावे आणि लपवण्याचा हेतू असावा, असाही कयास बांधला जात आहे.
पण या दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर हे बॉम्बर खरंच गायब झालं असेल तर इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीने ट्रॅक करून पाडलं तर नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे. यामुळेच इराण अमेरिकेला वारंवार आव्हान देत आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न – या घटनेचा फायदा घेत इराणने आपल्या अणु कार्यक्रमाला गती दिली आहे का?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्या या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेने मौन पाळलं असून B-2 बॉम्बरचा ठावठिकाणा अद्याप गुलदस्त्यात आहे. अमेरिकेच्या संरक्षण धोरणाच्या गुप्ततेमुळे ही घटना अजूनच रहस्यमय बनली असून, जगभरात सामरिक क्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.