जगभरातील देशांना अमेरिकेच्या मदतीचे दरवाजे बंद; पण 'या' दोन देशांना सुट का? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिका अनेक दशकांपासून जगभरातील सुमारे 180 देशांना आर्थिक मदत करत आला आहे. ही मदत लष्करी सहाय्य, मानवी मदत, किंवा आर्थिक विकास निधीच्या स्वरूपात दिली जाते. 2022 मध्ये अमेरिकेने सुमारे 6400 कोटी डॉलर्स आर्थिक मदतीसाठी खर्च केले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच जगभरातील देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. मात्र या निर्णयातून इस्त्रायल आणि इजिप्तला वगळण्यात आले आहे.
परंतु, या बंदीमधून इज्रायल आणि इजिप्त या दोन देशांना वगळण्यात आले आहे. या निर्णयामागील ट्रम्प यांचा नेमका हेतू काय आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खरंतर इस्त्रायल आणि अमेरिकेचे संबंध आजही घनिष्ठ आहेत, पण इजिप्तला मदत का केली जात आहे असा प्रश्न जागतिक स्तरावर विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इस्त्रायलवरील शस्त्र पुरवठ्याची बंदी उठवली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प प्रशासनाचा निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीर केले होते की, इस्त्रायल आणि इजिप्त वगळता इतर देशांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य थांबवले जाईल. इस्त्रायला दरवर्षी सुमारे 3.3 अब्ज डॉलर तर इजिप्तला 1.3 अब्ज डॉलर मदत दिली जाते.
इजिप्तला दिल्या जाणाऱ्या मदतीचा उपयोग त्यांच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि दहशतवादाविरोधातील लढाईसाठी केला जातो. ही मदत तणावग्रस्त परिस्थिती हाताळण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. तसेच ट्रम्प यांनी असेही म्हटले होते की, जो कोणी अमेरिकाविरोधात असेल त्याच्यावर कर लादण्यात येईल आणि कोणतीही मदत मिळणार नाही.
इस्त्रायल मदतीमागील कारणे
इस्त्रायल हे अमेरिकेचे मध्यपूर्वेतील सर्वात महत्त्वाचे सहयोगी राष्ट्र आहे. 1979 मध्ये झालेल्या इस्त्रायल-इजिप्त शांतता करारानंतर अमेरिकेचा या भागातील प्रभाव वाढला आहे. या करारानुसार इस्त्रायल आणि इजिप्त यांनी एकमेकांवर कोणत्याही प्रकारचे सैन्य किंवा राजकीय हल्ले न करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे या कराराला समर्थन देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची या देशांना मिळणारी मदत थांबवली नाही. याशिवाय, इस्त्रायलला दिलेले आर्थिक सहाय्य हे लष्करी मदतीशीदेखील संबंधित आहे.
इजिप्तला मदतीमागील कारणे
तर इजिप्तमध्ये दहशतवादी संघटनांविरोधात लढाईत अमेरिकेची मदत मोठी भूमिका बजावते. अमेरिकेची ही मदत देशातील स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि मध्यपूर्वेतील दहशतवादाविरोधात व्यापक मोहिमेसाठी महत्त्वाची मानली जाते. याशिवाय, अमेरिका आणि इजिप्तमधील संबंध 100 वर्षाहून जुने आहेत. 1922 मध्ये इजिप्तने ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अमेरिकेसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध अधिक बळकट होत गेले.
अमेरिकेचा धोरणात्मक दृष्टिकोन
इस्त्रायल आणि इजिप्तला मदत सुरू ठेवून अमेरिका मध्यपूर्वेतील आपली सामरिक घेराबंदी आणि प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे अमेरिकेचे जागतिक धोरण अधिक स्पष्ट होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात जोरदार पुनरागमन करुन संपूर्ण जगाला अमेरिकेची पुढील भूमिका काय असेल याचा एक छोटासा टेलर दिला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.