वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेल्या काही काळापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक असे निर्णय घेतले, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयावरुन तर जगभरात व्यापार युद्ध सुरु झाले होते. दरम्यान पुन्हा एकदा ट्रम्प वादाच्या भोवऱ्या अडकले आहेत. ट्रम्प यांनी एका मुलाखती दरम्यान पोप बनण्याची इच्छा जाहीर केली होती. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्यांनी एक AI जनरेटेड फोटो शेअर केला असून यामध्ये ट्रम्प पोपच्या वेषात आहेत. यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प चर्चेचा विषय बनले आहेत.
हा फोटो व्हाईट हाऊच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडवरुन देखील शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांना विचारण्यात आले होते की, पोपसाठी त्यांची पहिली पसंती कोण असेल? यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले होते की, “मला पोप व्हायला आवडेल.” त्यांच्या या व्यक्तव्यानंतर त्यांचे पोपच्या वेशभूषेत अनेक फोटो समोर आले. या फोटोमध्ये त्यांनी गळ्यात क्रॉस आणि पोपचा पोशाख घातलेला दिसत आहे. तथापि, ट्रम्प यांनी न्यू यॉर्कचे कार्डिनल टिमोथी डोलन यांना पुढील पोप होण्यासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.
From Donald Trump Truth Social 05/02/25 10:29 PM pic.twitter.com/6BmCkSY1Q8
— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) May 3, 2025
ट्रम्प यांच्या या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी म्हटले आहे की, ट्रम्प असंवेदनशील आहेत, त्यांनी कॅथलिक चर्चची थट्टा केली आहे. एका युजरने, हा पोपचा अपमान आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने ट्रम्प शैतान आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने हा पोप धर्मगुरुंचा अनादर आहे. अशा प्रकारच्या विवध संतप्त अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तर ट्रम्प यांच्या समर्थकांनी याचे कौतुक केले आहे. ट्रम्प विरोधक आणि समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरु आहे.
पहिले लॅटिन अमेरिकन पोप पोप फ्रान्सिस यांचे 22 एप्रिल 2025 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. यावेळी 26 एप्रिल रोजी पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला व्हॅटिकनच्या पीटर्स स्क्वेअरमध्ये उपस्थित राहिले होते. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानंतर, कार्डिनल्स 7 मे रोजी पुढचया पोपसाठी उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरु करतील.