भारत-कतार संबंध नवे शिखर गाठणार; कतारचा भारतात 10 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा निर्णय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) मधील प्रमुख सदस्य कतारने भारतात तब्बल 10 अब्ज डॉलर्स (सुमारे 83,000 कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान या ऐतिहासिक गुंतवणुकीची घोषणा केली. तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात ही गुंतवणूक होणार असून, भारत आणि कतारमधील व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ होणार आहे.
द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
मंगळवारी (18 फेब्रुवारी 2025) झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारत आणि कतारने अनेक महत्त्वाचे करार केले. दोन्ही देशांनी पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार 14 अब्ज डॉलरवरून 28 अब्ज डॉलरपर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. तसेच, भारत-कतार संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : रणसंग्राम ते राज्यकारभार… महाराजांचे ‘हे’ जीवनधडे म्हणजे अमूल्य वारसाच
कतार गुंतवणूक प्राधिकरण भारतात उघडणार कार्यालय
कतार गुंतवणूक प्राधिकरण (QIA) भारतात 2030 पर्यंत आपले स्वतंत्र कार्यालय उघडणार आहे. यामुळे कतारमधील गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठेतील संधी अधिक प्रभावीपणे शोधता येतील आणि व्यापार संबंध अधिक गतिमान होतील.
ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रात मोठे करार
कतारच्या अमीरच्या या दौऱ्यादरम्यान ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रात मोठे करार झाले. भारत आणि कतारमध्ये धोरणात्मक भागीदारी करार झाला असून, यासोबतच दुहेरी कर आकारणी टाळण्याच्या सुधारीत करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे कतारमधील भारतीय व्यावसायिक आणि उद्योगपतींना मोठा फायदा होणार आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी कतारला दिलेल्या भेटीत, 2048 पर्यंत एलएनजी (LNG) आयात वाढवण्यासाठी 78 अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी झाली होती. या करारामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला मोठा हातभार लागला असून, कतारसाठीही ही दीर्घकालीन व्यापारसंधी आहे.
गुप्तचर देवाणघेवाण आणि सुरक्षा सहकार्य वाढणार
व्यापार आणि गुंतवणुकीव्यतिरिक्त, दोन्ही देशांनी सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बाजूंनी गुप्तचर यंत्रणांची देवाणघेवाण, तंत्रज्ञान आणि कायद्याच्या अंमलबजावणीत सहकार्य वाढवणे, तसेच मनी लाँड्रिंग, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्ह्यांवर एकत्रितपणे काम करणे यासंदर्भात सहमती दर्शविली आहे.
युवा आणि क्रीडा क्षेत्रातील भागीदारीला चालना
भारत आणि कतार यांच्यात युवाशक्ती आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठीही सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे युवा कलाकार, खेळाडू आणि तंत्रज्ञांना कतारमध्ये संधी मिळेल, तसेच कतारच्या कंपन्या भारतीय स्टार्टअप आणि नवसंशोधनात गुंतवणूक करू शकतील.
भारत आणि गल्फ देशांमधील वा ढती भागीदारी
कतार हा सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), ओमान आणि कुवेत यानंतर भारतासोबत धोरणात्मक भागीदारी करार करणारा GCC मधील पाचवा देश आहे. या करारांमुळे भारताचे अरब देशांशी संबंध अधिक दृढ होत आहेत, ज्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि मध्य पूर्वेतील व्यापारसंबंधांवर होणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्यांना गुन्हेगाराप्रमाणे बेड्या ठोकण्यात आल्या…’ व्हाईट हाऊसने शेअर केला ‘हा’ हृदयद्रावक व्हिडिओ
नव्या युगाची सुरुवात
या भेटीमुळे भारत-कतार संबंधांना एक नवे वळण मिळाले आहे. मोठ्या गुंतवणुकीसह व्यापार, ऊर्जा, सुरक्षा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भागीदारी दृढ होणार आहे. यामुळे भारताच्या आर्थिक वृद्धीला गती मिळेल आणि कतारसाठीही भारतीय बाजारपेठेत नव्या संधी निर्माण होतील. कतारच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे पाकिस्तानसाठीही हा एक मोठा धक्का असू शकतो, कारण कतार आणि पाकिस्तानचे संबंध पूर्वीपेक्षा कमी होत चालले आहेत. भारताने आखाती देशांसोबत वाढत्या संबंधांमुळे जागतिक पातळीवर आपले आर्थिक आणि धोरणात्मक स्थान आणखी मजबूत केले आहे.