'Right... Mrs सुशीला कार्की...; PM मोदींनी नावाआधी वापरलेल्या या शब्दाचा अर्थ तरी काय?(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal News in Marathi : काठमांडू : नेपाळमध्ये ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती. यामुळे देशात ८ सप्टेंबर रोजी Gen Z ने तीव्र आंंदोलन छेडले होते. या आंदोलनाने हिंसक रुप घेतले होते. यामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. यामुळे केपी ओली शर्मा यांना पंतप्रधान पदाचा राजीनामाही द्यावा लागला. तसेच सरकारमधील इतर अनेक मंत्र्यांना मारहाण झाली आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.
यानंतर अंतरिम सरकारची स्थापनेची सुरुवात होऊ लागली. यासाठी सुशीला कार्की, कुलमन घिसिंग, काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांची नावे समोर आली होती. दरम्यान सुशीला कार्की यांची निवड अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली. सुशीला कार्की या नेपाळच्या माजी पहिल्या महिला सर न्यायाधीश होत्या. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशीला कार्की यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांनी नेपाळळच्या शांततेसाठी भारताकडून पाठिंबा दर्शवला होता. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, “नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल माननीय सुशीला कार्की यांचे हार्दिक अभिनंदन. भारत नेपाळच्या बंधूभगिनींच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.”
पंतप्रधान मोदींनी ही पोस्ट इंग्रजीत केली होती. यामध्ये त्यांनी सुशीला कार्की यांच्या नावासमोर Right असा शब्द लिहिला होता. सध्या सोशल मीडियावर असा शब्द का लिहिण्यात आल्या यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी इंग्रजीमध्ये लिहिले होते की, ” I extend my best wishes to Right Hon. Mrs. Sushila Karki …”
I extend my best wishes to Right Hon. Mrs. Sushila Karki on assuming office as the Prime Minister of the Interim Government of Nepal. India remains firmly committed to the peace, progress and prosperity of the people of Nepal.
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2025
काय आहे Right Hon. चा अर्थ ?
मिळालेल्या माहितीनुसार, सुशीला कार्की यांच्या नावापूर्वी Right Hounourable लिहिले होते. याच्या जागी Rt.Hon. असेही लिहिता येते. ही एक सन्मानीय औपचारिक पदवी आहे. ब्रिटिश काळामध्ये या पदवीचा वापर उच्च अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी वापरला जात होता. ही पदवी नेपाळच्या पंतप्रधानांसाठी देखील वापरली जाते. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे ही पदवी नेपाळचे लोक उच्च अधिकाऱ्यांचा सन्मान करताना वापरतात. नेपाळमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची वसाहत नव्हती, तरीही हा शब्द तिथे वापरला जातो.
नेपाळमधील सद्य परिस्थिती
सध्या नेपाळमध्ये सामान्य जीवन हळूहळू सुरळित होत असून हिंसाचाराची आग थंड होत चालली आहे. अंतरिम मंत्रीमंडळाचा विस्तार सुशीला कार्की यांनी सुरु केला असून कुलमन घिसिंग, ओमप्रकाश अर्याल आणि रामेश्वर खनाल या तीन नेत्यांना सामील करण्यात आले आहे. परंतु याच वेळी नेपाळच्या सुदान गुरंग यांच्या नेतृत्वाखाली कार्की यांच्याविरोधातही आवाज उठवण्यात आला आहे कारण त्यांनी मंत्रीमंडळात नेत्यांची निवड करताना जनरेशन-झेडच्या भूमिकेचा विचार केला नाही.