World Press Photo of 2025: 'फोटो ऑफ द इयर बॉय' महमूद आणि छायाचित्रकार समरची कहाणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दोहा/गाझा : यंदाच्या ‘वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2025’ हा जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा फोटो पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे एका अशा छायाचित्राला, जो गाझामधील युद्धातील एका निष्पाप मुलाचे जीवन बदलून टाकणारे वास्तव समोर आणतो. हे छायाचित्र काढले आहे गाझा येथील छायाचित्रकार समर अबू अलौफ यांनी, ज्यांनी या फोटोमधून संपूर्ण जगाला युद्धाच्या असह्य वेदना आणि त्याचा निष्पापांवर होणारा परिणाम दाखवून दिला आहे.
या पुरस्कारप्राप्त फोटोमध्ये, ९ वर्षांचा महमूद अजूर शांतपणे कॅमेऱ्याकडे पाहताना दिसतो. पण त्याच्या चेहऱ्याच्या खालच्या बाजूस जे दिसत नाही, ते म्हणजे त्याचे दोन्ही हात, जे त्याने एका इस्रायली हल्ल्यात गमावले आहेत. हा फोटो केवळ एक प्रतिमा नसून, तो हजारो युद्धबळी बालकांच्या दुःखाची प्रतिनिधी किंकाळी आहे.
समरने हा फोटो जून २०२४ मध्ये कतारमधील दोहा शहरात घेतला, जेव्हा महमूद आणि त्याचे कुटुंब उपचारासाठी तिथे राहत होते. दोघेही एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये होते आणि तिथेच समर आणि महमूद यांच्यात एक वेगळीच नात्याची सुरुवात झाली – एक फोटोग्राफर आणि एका दुःखद घटनाग्रस्त बालकाची.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : K2-18b ग्रहावर जीवनाचे संकेत; पृथ्वीपासून 700 ट्रिलियन मैल दूर ‘हेशियन वर्ल्ड’वर एलियन अस्तित्वाची शक्यता!
Thank you to the photo editors at The New York Times @nytimes , and thank you to World Press Photo @WorldPressPhoto . https://t.co/qfJn2JATj8
— Samar Abu Elouf (@samarabuelouf) April 17, 2025
credit : social media
समर अबू अलौफ या स्वयंशिक्षित फोटो पत्रकार आहेत. छायाचित्रणाचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही, त्या २०१० पासून गाझामधील संघर्ष, माणुसकी, आणि दुःखद घटनांचे दस्तऐवजीकरण करत आहेत. २०२१ मध्ये इस्रायल-गाझा युद्धादरम्यान त्यांनी न्यू यॉर्क टाईम्ससाठी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या फोटोने जगभर खळबळ उडवली. विशेषतः महमूदच्या फोटोमुळे त्यांचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचले आणि युद्धातील बालकांचे दुःख जास्त ठळकपणे समोर आले.
समरने यापूर्वीही अनेक पुरस्कार जिंकले आहेत. २०२३ मध्ये पोल्क पुरस्कार जिंकला, ज्यामध्ये एका छायाचित्रात शाळेतील काही मुले आकाशाकडे पाहत होती – वरून बॉम्ब पडत होते. या एका फ्रेममध्ये युद्धाचा तणाव, भीती आणि निरागसतेचा संघर्ष दिसून आला होता. २०२४ मध्ये, त्यांनी ‘अँजा निड्रिंगहॉस करेज इन फोटोजर्नलिझम’ पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार त्यांनी युद्धातील स्त्रिया आणि मुलांच्या वेदनांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या १२ छायाचित्रांच्या मालिकेसाठी मिळवला.
२०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत समरने सांगितले होते की, “गाझामध्ये हे काम सुरू करणे खूप कठीण होते. कोणी प्रोत्साहन दिले नाही, आणि कोणीही आमच्याकडे लक्ष दिले नाही.” पण आज तिचे छायाचित्र जगभरातील नामांकित वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर झळकत आहेत. ‘वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर’ या सर्वोच्च सन्मानासह, समरने फक्त एक पुरस्कारच जिंकलेला नाही, तर जगभरातील लोकांना युद्धाचे कडवे वास्तव दाखवून दिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मोदी सरकारची योजना फायदा घेण्यासाठी सज्ज आहे; इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी, औषधे क्षेत्रात फायदा
‘वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर २०२५’ हा फोटो म्हणजे केवळ एक प्रतिमा नाही, तर तो युद्धात बळी गेलेल्या बालकांच्या हक्कांचा, जगाने दुर्लक्ष केलेल्या वेदनांचा आणि माणुसकीच्या शोधाचा प्रतीक आहे. समर आणि महमूद यांची कहाणी युद्धातील नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर माणुसकीचा प्रकाशकिरण ठरते. समरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, प्रत्येक फ्रेममागे एक व्यथा असते, आणि महमूदच्या फोटोने त्या व्यथेचा आवाज संपूर्ण जगापर्यंत पोहोचवला आहे.