ब्लॉग

व्हीव्हीपॅट चिठ्ठीच्या मोजणीचे प्रकरण

ज्ञानेश्वर मोरे

किती मतचिठ्ठ्यांची पडताळणी ईव्हीएमधील मतांशी करावी म्हणजे यंत्रणेच्या विश्वासऱ्हतेवरचे प्रश्नचिन्ह दूर होईल याची विचारणा स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया या सरकारी स्वायत्त संस्थेला न्यायालयाने केली होती. दोन टक्के उपकरणांची पूर्ण पडताळणी केल्यास निकालाची 99 टक्के अचुकता मान्य करता येईल असा सल्ला यासंस्थेने दिला. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका बूथवरील व्हीव्हीपॅटची मोजणी कऱण्याची पद्धत निवडणूक आयोगाने स्वीकारली होती, पण जर सर्व 55 लाख उपकरणांतील सर्व सत्तर एक कोटी मतचिठ्ठ्या प्रत्यक्षात मोजायचे म्हटले तर ते किती मोठे व गुंतागुंतीचे काम होणार याची कल्पनाच केलेली बरी... !!

घड्याळाचे काटे मागे फिरवता येत नाहीत म्हणतात. पण अलिकडे “इंडिया” आघाडीने नेमका तोच उपद्व्याप सुरु केला आहे. 1990 पूर्वीची निवडणूक पद्धती पुन्हा आणली पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने वाटते. त्यांचे, म्हणजे राहुल गांधींची काँग्रेस, मार्कसवादी आणि कम्युनिस्ट हे दोन्ही डावे पक्ष, समाजवादी पार्टी, उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी तसेच त्यांचे “इंडिया” आघाडीतील अन्य घटक पक्ष यांनी अशी मागणी लावून धरलेली आहे की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनला जोडलेल्या व्हीव्हीपॅट डब्यातील सर्व मतचिठ्ठ्यांची प्रत्यक्षात मोजणी झालीच पाहिजे. तसे झाले तर शिक्का मारून मतपत्रिका पेटीत टाकण्याच्या १९९० पूर्वीच्या निवडणुकां सारखीच स्थिती पैदा होणार आहे. आधुनिक सुविधांचा लाभ घेतानाही बुरसटलेली जुनी मानसिकता यातून स्पष्ट होते.

थोडक्यात काय तर, ईव्हीएमचा वापर बंद करा आणि पुन्हा एकदा मतपत्रिका, मतपेट्या, मतपेट्यांची पळावपळवी, त्यातून निवडणुकीतील हेराफेरी या साऱ्या वातावरणाकडे परत चला, असेच विरोधी पक्षांना म्हणावेसे वाटते आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ईव्हीएम व मतचिठ्ठ्यांशी निगडित आणखी एका याचिकेवरील सुनावणी पूर्ण केली आहे आणि निकाल राखून ठेवला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वसंसेवी संस्थेच्यावतीने प्रशांत भूषण यांनी निवडणुकीची पारदर्शकता अधिक वाढावी यासाठी तसेच जनतेचा शंभर टक्के विश्वास प्राप्त होण्यासाठी सर्वच व्हीव्हीपॅट यंत्रात जमणाऱ्या, देशातली सर्व मतदारांच्या मतचिठ्ठ्यांची शंभर टक्के पडताळणी ईव्हीएम मधील मतगणने बरोबर व्हायला हवी अशी याचिका २०२३ मध्ये दाखल केली होती.

तीच मागणी “इंडि” आघाडीने उचलून धरलेली आहे. भाजपाचा विजय हा केवळ ईव्हीएममुळेच होतो आहे, अशी मांडणी राहुल गांधींपासून संजय राऊतांपर्यंत सारे छोटे-मोठे नेते आणि त्यांचे चेले-चपाटे करतच असतात. ज्येष्ठ वकील भूषण यांच्या याचिकेमुळे त्यांना जोर चढला आहे. अर्थात भूषण यांच्या प्रामाणिकपणा विषयी अजिबात शंका घेण्याचे कारण नाही. कारण लोकशाही अधिक जिवंत व सळसळती राहिली पाहिजे त्यात कणताही दोष असू नये यासाठी त्यांची एडीआर ही संस्था सातत्याने गेली पंचवीस तीस वर्षे झगडत आहे. अनेक माजी प्रशासकीय अधिकारी, काही आयआयटीत शिकलेले तरूण,

काही उद्योजक अशा जागरुक नागरिकांनी दिल्लीमध्ये सुमारे तीन दशकांपूर्वी या संस्थेची स्थापना केली.

एडीआरच्या माणद्यांतून संसदीय प्रणालीवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम या मंडळींनी सातत्याने केले आहे. खासदार कोण असावेत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली गेली पाहिजे, पदावर असताना गुन्हे केले तर खासदारकी आमदारकी रद्द झाली पाहिजे, खासदाराची व आमदाराची सांपत्तिक स्थिती तपासली गेली पाहिजे, पदाच्या पाच वर्षांच्या अवधीत त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली हे जनतेला कळायला हवे, इत्यादी...

अनेक मागण्या व त्यासाठी न्यायालयांमध्ये याचिका दाखल करून तिथे आलेल्या निकालांच्या आधारे संसदेत कायदे बदलून वा निवडणूक आयोगाकडे पाठ पुरावा करून निवडणूक सुधारणा लागू करून घेण्याचे श्रेय एडीआरच्या अथक प्रयत्नांना जाते. त्यांनीच दाखल केलेल्या २०१९ मधील एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याने निवडणूक रोखे म्हणजेच गुप्त पद्धतीने राजकीय पक्षांना करोडो रुपयांची देणगी देण्याची पद्धती रद्द झाली. आता प्रत्येकच राजकीय पक्षाला कमी अधिक प्रमाणात, कदाचित संशयास्पद उद्योजकांकडून अशा गुप्त पद्धतीने शेकडो करोडो रुपयांच्या देणग्या कशा मिळाल्या हेही सत्य जनतेसमोर आले. त्यामुळे इथून तिथून सारेच राजकीय पक्ष हे सारखेच आहेत आणि राजकीय हमामात सारेच नंगे आहेत हेही सत्य जनतेसमोर प्रकट झाले.

त्यामुळेच प्रशांत भूषण अथवा एडीआर यांच्या ताज्या याचिकेबद्दल कट-कारस्थाना सारखी शंका घेण्यास अजिबात वाव नाही. पण त्यातील हेतु शुद्ध असता तरी ती मागणी विद्मयान ईव्हीएम व्यवस्थेचे बारा वाजवणारी ठरणार आहे, हेही सर्वोच्च न्यायालयापुढे गेल्या दोन तीन आठवड्यात त्या याचिकेची जी सुनावणी झाली त्यातून स्पष्ट झाले आहे.

न्या संजीव खन्ना आणि न्या दीपंकर दत्ता यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना बजावले की घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न करू नका, तसेच जुन्या मतपत्रिकेवर शिक्का मारण्याच्या पद्धतीकडे जाण्याची सूचनाही न्यायालयाने फेटाळून लावली. एडीआरचे कार्यकर्ते व त्यांचे वकील यांच्या काही प्रामाणिक शंका असतीलही, पण त्यांच्या याचिकेचा वापर करून ईव्हीमच्या नावाने बोटे मोडणाऱ्या राजकीय पक्षांचा व नेत्यांचा हेतु शुद्ध नक्कीच नाही. त्यांना या मुद्द्याचा वापर करून राजकारणच करायचे आहे हे स्पष्ट आहे.

याच ईव्हीएमचा वापर करून 2004 मध्ये व 2009 मध्ये भाजपाचा दणदणित पराभव करून सोनिया गांधींच्या नेतृत्वातील यूपीए संयुक्त पुरोगामी आघाडीने सरकारे स्थापन केली. डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात या दोन्ही सरकारांनी पूर्ण दहा वर्षे राज्य केले. जेंव्हा भाजपा केंद्रात विरोधी बाकांवर होता आणि थोड्या राज्यांत भाजपाची सरकारे होती तेंव्हा 2014 मध्ये भाजपाचा दणदणित विजय झाला. तेंव्हा जी ईव्हीएम वापरली गेली होती तीच व तशाच पद्धतीची निवडणूक यंत्रे त्याच निवडणूक आयोगाच्या देशव्यापी यंत्रणेने विविध राज्यंच्या निवडणुकात 2014 ते 2019 या दरम्यान वापरली. त्यात अनेक राज्यांत भाजपाचा दणकून पराभव करून काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांनी सरकारेही स्थापन केली.

हे सारे सोयीस्कररीत्या विसरून आपल्या 2019 च्या पराभवाचे खापर मुक्या बिचाऱ्या ईव्हीएमवर फोडण्याचे काम भाजपेतर विरोधी पक्षानी जोरात सुरु केले. 2014 नंतरच्या पाच वर्षांनंतर मोदींच्या कारभाराच्या विरोधात जनमत जाईल, अँटी इनकंबन्सी असणार हा विरोधकांचा होरा साफ चुकला. उलट, मोदींचे प्रचंड वाढलेले बहुमत, भाजपाने अनेक मतदार संघांमध्ये घेतेलली पन्नास टक्केंपेक्षा अधिकची मते, जवळपास 200 मतदारसंघातील भाजपा व रालोआच्या उमेदवारांना मिळालेले तीन लाखांपेक्षा अधिकचे मताधिक्य अशा सर्व बाबी भारतात कधीच न दिसलेली प्रो-इन्कंबन्सी लाट होती हे दाखवत होत्या. ते सत्य स्वीकारणे विरोधकांना जड जात होते.

सहाजिकच ईव्हीएमवर खापर फोडणे सुरु झाले. ईव्हीएमध्ये गडबडी झाल्या, कुठेलेही बटण दाबले तरी कमळालाच मत पडते अशा अफवा व अपप्रचार 2019 नंतर जोरात सुरु झाला. भारताने 1978 च्या सुमारास देशतील मतदान पद्धतीती मूलभूत सुधारणा करायचे ठरवले. कारण त्या आधीच्या अनेक निवडणुकात विशेषतः बिहार व उत्तर प्रदेशात, मध्यप्रदेश, राजस्थानातील डाकुग्रस्त भागात, ओरिसा, बंगाल व महाराष्ट्राच्या नक्षल प्रभावित विभागात मतदानाचे प्रमाण अत्यल्प झाले होते.

मतदान केंद्रे गुंडांनी ताब्यात घेणे, मतपेट्या पळवून निकाल बदलणे असले प्रकार देशाच्या अनेक भागात घडत होते. त्याला आळा घालण्याचे सुरक्षा व्यवस्थेचे काम सोपे कऱण्यासाठी, मतपत्रिके ऐवजी इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर केला पहिजे, असा मतप्रवाह प्रशासनात तयार झाला. त्या अनुषंगाने मुंबई आयआयटीमधील प्राध्यापकांनी सध्या आपण जे वापरतो त्या पूर्ण देशी बनावटीच्या मतदान यंत्राचे आरेखन व नमुना यंत्राची निर्मिती केली. सर्व राजकीय पक्षांच्या समोर झालेल्या विविध चाचण्यात त्याला मान्यताही मिळाली. त्या नंतर प्रायोगिक तत्वावर यंत्रे तयार झाली.

पुढच्या पंधरा वर्षात टप्प्या टप्प्याने निवडणूक यंत्रांचा वापर सुरु झाला. हरणारे राजकीय पक्ष व नेते हे नेहमीच ईव्हीएमच्या विरोधात तक्रारी करत असतात. 2009 च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यनंतर किरीट सोमय्यांसारखे नेते ईव्हीएममध्ये हेराफेरी होऊ शकते हे दाखवत फिरत होते. त्या संदर्भात अनेक याचिकाही उच्च व सर्वोच्च न्यायालयात झाल्या. सुब्रमण्याम स्वामी, चंद्राबाबू नायडूंच्या यचिकांवरही सुनावण्या झाल्या. ईव्हीएममध्ये हॅकिंगसारखे काही होऊ शकत नाही हे अनेकदा न्यायालयातही सिद्ध झाले. याचे साधे कारण म्हणजे हे यंत्र कोणत्याही प्रकारे कोणत्याही नेटवर्कला जोडलेले नसतं. अमेरिकेत व युरोपात वापरली जाणारी यंत्रे ही इंटरनेटशी जोडलेली होती. त्यातून हेराफेरी, हॅकिंग शक्य होते. पण आपली यंत्रे ही स्वायत्त, सेटॅंड अलोन पद्धतीची, आहेत.

शिवाय देशभरात यंदाच्या निवडणुकीत 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जातो आहे. तिथे हॅकिंग वा गडबडी कऱणे कोणालाही शक्य नाही ही बाब निर्विविदापणाने अनेकदा सिद्ध झाली आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने जाहीर आवाहन केले होते की कोणाही व्यक्ती संस्था वा राजकीय पक्षाने यावे व आयोगाच्या यंत्रांत, ते न उघडता, संगणकाच्या माणद्यांतून हवेतर, फेरफार करून दाखवावा. ते आव्हान कोणीही स्वीकारले नाही. सर्वोच्च न्यायालयातही कोणीही हॅकर कशाही प्रकारच्या हॅकिंग तंत्राने ईव्हीएम यंत्रात फेरफार करून दाखवू शकला नाही. नंतर न्यायालयाने त्या प्रकारच्या सर्व याचिका निकाली काढल्या.

तरीही काहींच्या मनाता शंका कशंका तरळतच होत्या. तेंव्हा मग ईव्हीएम विषयी जनतेच्या मतनात कोणतीच शंका राहू नये यासाठी मतदाराचे नाव, मतदार क्रमांक तसेच त्याने कोणत्या चिन्हाचे बटण दाबले ते त्याला मतदान केंद्रात मत बटण दाबल्याबरोबर कळले पाहिजे अशी सोय करण्याचे निर्देश 2010 मध्ये न्यायालयाने दिले. ईव्हीएमला जोडलेल्या प्रिंटरसारख्या यंत्रात ती माहिती दिसेल व ती चिठ्ठी यंत्राला जोडलेल्या पेटीत पडेल अशी यंत्रणा विकसित झाली. त्याचे नाव व्होटर व्हेरिफायेबल पेपर ट्रेल व्हीव्हीपॅट.

त्याचा वापर 2013 पासून टप्प्या टप्प्याने केला गेला. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदाराला त्याचे मत दिसू शकेल अशी व्होटर व्हेरिफायेबल पेपर ट्रेल उपकरणे म्हणजेच व्हीव्हीपॅट यंत्रे मोठ्या प्रमाणात वापरली गेली. आणि 2019 च्या तसेच आता 2024 च्या निवडणुकीत ती प्रत्येक मतदाराची मतचिठ्ठी तयार केली जात आहे. याच मतचिठ्ठ्यांची गणना व ईव्हीएमच्या मतां बरोबरची शंभर टक्के पडताळणी करण्या बाबतच्या याचिकेवर अलिकडे सुनावणी पार पडली. किती मतचिठ्ठ्यांची पडताळणी ईव्हीएमधील मतांशी करावी म्हणजे यंत्रणेच्या विश्वासऱ्हतेवरचे प्रश्नचिन्ह दूर होईल याची विचारणा स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया या सरकारी स्वायत्त संस्थेला न्यायालयाने केली होती.

दोन टक्के उपकरणांची पूर्ण पडताळणी केल्यास निकालाची 99 टक्के अचुकता मान्य करता येईल असा सल्ला या संस्थेने दिला. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका बूथवरील व्हीव्हीपॅटची मोजणी कऱण्याची पद्धत निवडणूक आयोगाने स्वीकारली होती. पण न्यायालयाने ही संख्या वाढवून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही पाच बूथची पडताळणी कऱण्याचे

आदेश दिले. ती पडताळणी कऱण्यासाठी निकाल जाहीर होण्यासाठी पाच तासांचा अधिकचा वेळ लागतो असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. जर सर्व 55 लाख व्हीव्हीपॅटची पडताळणी करायची तर निकालाची प्रक्रिया पाच ते सहा दिवस सुरु राहील असे आयोगाने सांगितले आहे. प्रशांत भूषण यांच्या याचिकवरील सुनावणी संपली आहे.

प्रत्यक्षात राखून ठेवलेला निकाल काय येईल व कधी येईल हे सांगणे कठीण आहे. पण जर सर्व मतचिठ्ठ्या मोजणे इष्ट आहे असे न्यायालयाचे मत झाले असेल तर 2024 च्या निवडणुकीचे निकाल 4 जून

ऐवजी आणखी आठवडाभर लांबवावे लागतील... !!

- अनिकेत जोशी

Japanese Couple Viral Video : घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा प्रेम जुळले! जपानी जोडप्याने लखनौमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न

Tarali Project Controversy: तारळी प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सयाजी शिंदेंनी उघडला कायदेशीर लढ्याचा मोर्चा!

FSSAI Action Against Bisleri: बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

Lions Viral Video : आजूबाजूला सिंहच सिंह, तरीही बाईकस्वार बिनधास्त पुढे; झांबियातील थरारक व्हिडिओ व्हायरल

PM Modi Balen Shah Meet: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना पीएम मोदींची मोठी भेट! IIT कॅपसबाबत घेतला 'हा' मोठा ऐतिहासिक निर्णय