एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) ओळखलेल्या जाहिरात नियमांच्या उल्लंघनांमध्ये डिजिटल माध्यमांचे प्रमाण ९८ टक्के होते, ज्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे वर्चस्व वाढत असलेल्या जाहिरात क्षेत्रात ग्राहक संरक्षणाची आव्हाने अधिक गंभीर होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. आज प्रसिद्ध झालेल्या एएससीआयच्या २०२६-२७ च्या सहामाही तक्रार अहवालानुसार, एएससीआय संहितेच्या उल्लंघनांमध्ये एकट्या मेटाचे प्रमाण ७३.४ टक्के होते.
या सहा महिन्यांच्या कालावधीत, एएससीआयने संभाव्य उल्लंघनांसाठी २,३०८ जाहिरातींशी संबंधित ३,९५१ तक्रारींचा आढावा घेतला. तपासण्यात आलेल्या जाहिरातींपैकी ९४ टक्के जाहिरातींमध्ये बदल करणे आवश्यक होते, ७२ टक्के जाहिराती अप्रामाणिक दाव्यांद्वारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आढळल्या आणि ३० टक्के जाहिराती हानीकारक उत्पादनांना किंवा असुरक्षित परिस्थितींना प्रोत्साहन देणाऱ्या होत्या.
एएससीआयच्या सक्रिय देखरेखीद्वारे ८५ टक्के उल्लंघने ओळखली गेली, ज्यामधून ग्राहकांनी तक्रार करण्यापूर्वी जाहिरातींमधील धोके ओळखण्यासाठी सर्व्हायलन्सचे वाढते महत्त्व निदर्शनास येते.
एएससीआयच्या हस्तक्षेपानंतर जाहिरातदारांकडून होणारे ऐच्छिक अनुपालन मजबूत राहिले आहे. स्व-नियमनासाठी (सेल्फ-रेग्युलेशन) हे उल्लेखनीय सत्यापन आहे. अनुपालनाची पातळी आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ८० टक्क्यांवरून २०२४-२५ मध्ये ८३ टक्के आणि २०२५-२६ मध्ये ८६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, तसेच एप्रिल-सप्टेंबर २०२६ दरम्यान ८६ टक्क्यांवर स्थिर राहिली आहे.
या कालावधीत, जाहिरात स्व-नियमनामध्ये जनतेचा सहभाग वाढला आहे. सार्वजनिक तक्रारींमध्ये २० टक्के वाढ झाली आहे, जी एप्रिल-सप्टेंबर २०२४-२५ मधील १,१२४ तक्रारींवरून २०२६-२७ च्या याच कालावधीत १,३४७ वर पोहोचली आहे. सध्याच्या अहवाल कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ८४ टक्के तक्रारी एएससीआयच्या टीएआरए प्लॅटफॉर्मद्वारे आल्या आहेत. यामधून एएससीआयची भूमिका, तसेच स्वतःच्या हक्कांबद्दल जनतेमध्ये वाढलेली जागरूकता दिसून येते.
एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान, मेटा प्लॅटफॉर्म्सवरील १,५६३ जाहिरातींनी एएससीआय संहितेचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. यापैकी ९० टक्के जाहिराती ऑरगॅनिक ब्रँड कंटेंटऐवजी महसूल मिळवून देणाऱ्या प्रायोजित (स्पॉन्सर्ड) जाहिराती होत्या, आणि यातील ४१ टक्के जाहिराती अशा श्रेणींमधील होत्या, जिथे जाहिरात करण्यास मनाई आहे. यातील मोठा हिस्सा ऑफशोअर आणि बेकायदेशीर बेटिंगशी संबंधित होता, ज्यावर कारवाई करण्यासाठी नियामक संस्था, तसेच मेटाकडे तक्रार नोंदवण्यात आली. ऑनलाइन पैशांच्या खेळांवर बंदी घालणारा ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन कायदा, २०२५ लागू झाल्यानंतरही या जाहिराती सुरूच असल्याने हे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत.
एकूण, प्रतिबंधित किंवा निषिद्ध जाहिरातींशी संबंधित ६३३ केसेस शासनाकडे पाठवण्यात आल्या. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होता:
५९० बेकायदेशीर बेटिंग आणि जुगाराच्या जाहिराती.
औषधी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत २८ केसेस.
मद्याशी संबंधित ६ केसेस.
नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या तरतुदींशी संबंधित ४ केसेस.
इतर बाबींशी संबंधित ५ केसेस.
तेलंगणा रेरासोबत केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत (एमओयू), रेरा कायद्याच्या उल्लंघनाबद्दल ३३३ रिअल इस्टेट जाहिराती टीजीरेराकडे पाठवण्यात आल्या.
याव्यतिरिक्त, नियमांचे सातत्याने पालन न केल्याबद्दल इतर १३६ जाहिराती संबंधित नियामक प्राधिकरणांकडे पाठवण्यात आल्या. बेटिंग श्रेणीमध्ये, ५९० केसेसपैकी ९९ टक्के केसेस सक्रिय सर्व्हायलन्सद्वारे शोधून काढल्या गेल्या आणि यातील ९८ टक्के केसेस प्रायोजित जाहिरातींच्या होत्या. एएससीआयने योग्य कारवाईसाठी या जाहिरातींची माहिती आय४सी आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाला कळवली आहे.
ऑफशोअर आणि बेकायदेशीर बेटिंगनंतर सर्वाधिक उल्लंघने खालील क्षेत्रांमध्ये नोंदवली गेली:
पर्सनल केअर: ४५६
रिअॅल्टी: ३६०
अन्न आणि पेये: ३१२
इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स: ९५
आरोग्यसेवा: ८२
शिक्षण: ६८
या कालावधीत झालेल्या जाहिरात नियमांच्या उल्लंघनांमध्ये या सात श्रेणींचे प्रमाण ९० टक्के होते. इन्फ्लुएन्सरशी संबंधित उल्लंघनांसाठी तपासलेल्या ६५९ जाहिरातींपैकी ९५ टक्के जाहिरातींमध्ये सुधारणा करणे आवश्यक ठरले. हे प्रमाण पर्सनल केअर श्रेणीमध्ये सर्वाधिक ठळकपणे दिसून आले, जिथे इन्फ्लुएन्सरशी संबंधित २६३ उल्लंघने नोंदवली गेली. या श्रेणीमध्ये त्वचा आणि केसांमध्ये होणाऱ्या बदलांचे अतिशयोक्तीपूर्ण व निराधार दावे, सुरक्षितता आणि घटकांबाबत दिशाभूल करणारे दावे, तसेच पर्यावरणाबाबत निराधार दावे यांसारख्या समस्याही निदर्शनास आल्या.
अन्न आणि पेये क्षेत्रातील ३१२ उल्लंघनांपैकी ७४ टक्के उल्लंघने न्यूट्रास्युटिकल उत्पादनांशी संबंधित होती. एएससीआयच्या निदर्शनास आले की, पीसीओडी, अॅनिमिया, कर्करोगाचा धोका आणि हृदयाचे आरोग्य यांसारख्या आजारांबाबत दावे, तसेच पुरेशा पुराव्याशिवाय वेगाने वजन कमी करण्याचे दावे केले जात होते. या श्रेणीतही इन्फ्लुएन्सरकडून माहिती उघड न करणे ही चिंतेची बाब राहिली आहे आणि अशी १८१ उल्लंघने नोंदवली गेली.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स श्रेणीतील उल्लंघनांची संख्या ७५ होती, जी प्रामुख्याने मोबाईल फोनच्या लाँचशी संबंधित होती. हा अहवाल एकदा उल्लंघन निदर्शनास आल्यानंतर जाहिरातदारांकडून मिळणारा प्रतिसादही उत्तम असल्याचे दर्शवतो: ८३.५ टक्के इन्फ्लुएन्सर जाहिरातींवर कोणताही आक्षेप घेतला गेला नाही आणि अशा जाहिरातींमध्ये सरासरी सहा कामकाजाच्या दिवसांत सुधारणा करण्यात आली.
एएससीआयच्या सीईओ आणि सेक्रेटरी जनरल मनिषा कपूर म्हणाल्या, “जाहिरात क्षेत्राला डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वेग आणि व्याप्ती यांमुळे नवे स्वरूप मिळत आहे, त्यामुळे बदलत्या वातावरणाशी सुसंगत राहून ग्राहक संरक्षण सुनिश्चित करणे महत्त्वाचे ठरले आहे. आमच्या निष्कर्षांमधून निदर्शनास येते की, दिशाभूल करणारे दावे, अपुरी माहिती आणि कायद्याने प्रतिबंधित केलेल्या उत्पादनांच्या जाहिराती ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. गेल्या चार वर्षांत ऐच्छिक अनुपालनाचा दर सातत्याने वाढत आहे, ज्यामधून जाहिरातदारांमधील अधिक जबाबदार वृत्ती दिसून येते. पण, उल्लंघनांचे मोठे प्रमाण पाहता संपूर्ण परिसंस्थेमध्ये सातत्यपूर्ण दक्षता आणि जबाबदारीची गरज दिसून येते.”
अधिक प्रबळ सक्रिय देखरेखीसोबत एएससीआयने तक्रार निवारणाचा वेग सुधारणे सुरूच ठेवले आहे. औपचारिकरित्या तपासलेल्या तक्रारींच्या निवारणाचा सरासरी कालावधी आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ३० दिवसांच्या तुलनेत एप्रिल-सप्टेंबर २०२६ दरम्यान १५ दिवसांवर आला आहे. जाहिरातदारांनी आक्षेप न घेतलेल्या केसेसचे प्रमाणही सातत्याने वाढले आहे, जे आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ४९ टक्क्यांवरून एप्रिल-सप्टेंबर २०२६ दरम्यान ७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. अशा केसेस निकाली काढण्याचा सरासरी कालावधी ८ दिवसांचा आहे.