PM Modi-Balen Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना एक ऐतिहासिक भेट दिली आहे. भारत आपल्या शेजारील नेपाळमध्ये आयआयटीचा (IIT) ऑफशोअर कॅम्पस, एक स्टार्टअप इनक्यूबेटर आणि इनोव्हेशन हब स्थापन करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पीएम मोदींनी केली आहे. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे दोन्ही नेत्यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त व्हिजन डॉक्युमेंटअंतर्गत हे मोठे निर्णय घेण्यात आले.
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या पहिल्या दोन दिवसांच्या भारत भेटीवर आलेल्या बालेन शाह यांचे राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत करण्यात आले, त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पीएम मोदी म्हणाले की, नेपाळी तरुणांमध्ये प्रचंड प्रतिभा असून उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. 'विकसित भारत' आणि 'समुन्नत नेपाळ' या ध्येयांतर्गत उभारल्या जाणाऱ्या या संस्थांमुळे नेपाळी तरुणांना त्यांच्याच देशात जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी मिळतील.
नेपाळमध्ये आयआयटी कॅम्पस सुरू करण्यासोबतच, भारतात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांसाठी विशेषतः विधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिष्यवृत्तीच्या संधी वाढवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यापूर्वीपासूनच भारतीय दूतावासामार्फत विविध शाखांमध्ये शिष्यवृत्ती दिल्या जातात.
पूरग्रस्तांसाठी पॅकेज: ऑगस्टमधील महापुरानंतरच्या पुनर्बांधणीसाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी २४,००० कोटी नेपाळी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
नवीन रेल्वे सेवा: अयोध्या धाम ते नेपाळमधील जनकपूर धाम यांना जोडणाऱ्या 'सरयू कमला एक्सप्रेस' या नवीन साप्ताहिक रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
इतर सहकार्य: नेपाळमध्ये क्रिकेट पायाभूत सुविधांचा विकास, खेळाडूंचे प्रशिक्षण आणि 'वेव्स समिट'साठी नेपाळी शिष्टमंडळाला निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, अन्न प्रक्रियेला चालना देण्यासाठी नेपाळमध्ये ॲग्रो इंडस्ट्रियल पार्क विकसित करण्यासाठी भारत सहकार्य करेल.