Nashik Conversion Racket: नाशिक महिला पोलिसांचे 'अंडरकव्हर' ऑपरेशन; 'ते' आठ दिवस अन् धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश 
क्राईम

Nashik Conversion Racket: नाशिक महिला पोलिसांचे 'अंडरकव्हर' ऑपरेशन; 'ते' आठ दिवस अन् धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश

एका धाडसी तरुणीने पोलीस आयुक्तांकडे कैफियत मांडल्यानंतर या गुन्ह्याचे गांभीर्य समोर आले. त्यानंतर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ महिला पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली.

anuradha sagar
  • नाशिकच्या आयटी कंपनीत नोकरीच्या नावाखाली धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा प्रकार
  • नाशिक महिला पोलिसांचे धाडसी 'अंडरकव्हर ऑपरेशन
  • आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातील तांत्रिक विश्लेषण सुरू

Nashik IT Company Conversion Case: नाशिकच्या आयटी कंपनीत नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. पण या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी चित्रपटालाही मागे टाकेल असे धाडसी 'अंडरकव्हर ऑपरेशन' राबवले आहे. एका पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर, सात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने स्वतःची ओळख लपवून संबंधित कंपनीत नोकरी मिळवली आणि आरोपींच्या पापाचा पाढा पुराव्यासह वाचला.

महिला पोलिसांचे धाडसी मिशन

एका धाडसी तरुणीने पोलीस आयुक्तांकडे कैफियत मांडल्यानंतर या गुन्ह्याचे गांभीर्य समोर आले. त्यानंतर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ महिला पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली. या महिला पोलिसांनी स्वतःची खरी ओळख लपवून सामान्य उमेदवार म्हणून कंपनीत मुलाखत दिली. सलग आठ दिवस या महिला पोलिसांनी तिथे कर्मचारी म्हणून काम केले. मीटिंगमध्ये मुलींवर कसा दबाव टाकला जातो, त्यांचे मानसिक शोषण कसे केले जाते आणि धर्मांतरासाठी कशा प्रकारे प्रवृत्त केले जाते, याचे सर्व तांत्रिक पुरावे पोलिसांनी या काळात जमा केले.

पुराव्यांची साखळी पूर्ण होताच पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला. या प्रकरणी आतापर्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण ९ गुन्हे दाखल झाले असून यात ८ महिलांनी शोषण व धर्मांतराची, तर एका पुरुषाने धर्मांतरासाठी छळ केल्याची तक्रार दिली आहे. तक्रारदारांमध्ये ६ अविवाहित तरुणी आणि २ विवाहित महिलांचा समावेश आहे. पीडित तरुणींनी या त्रासाबाबत कंपनीच्या HR विभागाला वारंवार माहिती दिली होती, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता

नाशिक पोलिसांनी ज्या तत्परतेने 'अंडरकव्हर ऑपरेशन' राबवून हा प्रकार उघडकीस आणला, त्यामुळे एका मोठ्या संघटित गुन्हेगारी रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी नोकरीच्या नावाखाली महाराष्ट्रातील इतर शहरांतही अशाच प्रकारे तरुणींना जाळ्यात ओढले जात आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. तरुणींच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्यीय स्तरावर असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, जप्त केलेल्या मोबाईल आणि तांत्रिक पुराव्यांतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

प्रशासनाची भूमिका: 'प्रकरण अतिशय गंभीर'

या तपासाबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले की, "हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. पोलिसांनी विशेष पथकामार्फत सर्व आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातील तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. प्राथमिक तपासावरून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसत असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत."

पुण्यातून महिला HR ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत कंपनीची HR अश्विनी चैनानी हिला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तिची सलग ४ तास कसून चौकशी करण्यात आली असून, तिला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचा किती सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अटकेत असलेल्या आरोपींपैकी पाच जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. एक आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील एक महिला आरोपी अद्याप फरार असून, पोलीस पथके तिचा कसून शोध घेत आहेत.

Gen Z बदलतेय कॉर्पोरेट जगाची कार्यपद्धती; जाणून घ्या 'या' पिढीची वैशिष्ट्ये

RBI New Rules : आरबीआयचा मोठा निर्णय! बँक खात्यासाठी येणार Emergency Break; कसं बदलणार डिजिटल बँकिंगचे चित्र?

Hyundai Car Price Hike: ह्युंदाईच्या कार महागणार! 1 डिसेंबरपासून किमतीत 8,000 रुपयांपर्यंत वाढ

Nagpur News : महिला पतसंस्थेत २.७३ कोटींचा घोटाळा; ५९ ठेवीदारांची फसवणूक; दाम्पत्यासह १४ जणांवर गुन्हा

New Rules December 2026 : 1 डिसेंबरपासून बदलणार तुमच्या खिशाचे गणित! 7 मोठे नियम लागू; Credit Card पासून गॅसपर्यंत कसा होणार परिणाम?