पुणे: पुणे शिवाजीनगर भागामध्ये कोर्ट परिसरात बुधवारी (ता. २५) भरदिवसा सहा जणांच्या टोळक्याने खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीवर गोळीबार आणि कोयत्याने वार केले. मंदार किवळे (वय ३५) या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांचे पंजे तुटल्याची माहिती आहे. तसेच त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबारही करण्यात आला; मात्र गोळी न लागल्याने कोयत्याने हल्ला केला. शिवाजीनगर न्यायालयाबाहेर दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कात्रजमधील शुभम चव्हाण खुनाच्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळेला न्यायालयाने आठवडाभरापूर्वी जामीन मंजूर केला होता. न्यायालयीन तारखांना हजर राहण्याच्या अटीवर त्याला बेल मंजूर झाली होती. या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात आला होता. त्या वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला. एकाने पिस्तूल काढून गोळीबार केला, पण गोळ्या लागल्या नाहीत; तर अन्य हल्लेखोरांनी कोयते बाहेर काढले. जीव वाचविण्यासाठी किवळे पळू लागला. मात्र, हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याला गाठले आणि त्याच्यावर सपासप वार केले. हातांनी वार रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे दोन्ही हाताचे पंजे तुटले, असा थरारक प्रसंग त्याचे वकील शुभांगी परुळेकर यांनी सांगितला.
घटनेची माहिती देताना वकील शुभांगी परुळेकर म्हणाल्या की, "मी चार नंबरच्या गेटमधून बाहेर आले, तेव्हा अचानक धावपळ आणि गोंधळ सुरू असल्याचं मला दिसलं. गोळीबाराचा आवाज ऐकून मी पोलीस कर्मचाऱ्यांना पाहण्यासाठी सांगितलं. त्यानंतर एक कॉन्स्टेबल गेटच्या दिशेने गेला. मात्र, हल्ला सुरू असताना मदतीसाठी कोणीही पुढे गेलं नाही. न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हा हल्ला सुरू होता. हल्लेखोरांकडे पिस्तूल आणि कोयता होता. त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला मंदार रक्तबंबाळ अवस्थेत रस्ता ओलांडून फुटपाथावर येऊन कोसळला. मी पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेसाठी फोन केला; मात्र संपर्क साधण्यात अडचण येत होती. रिक्षाला थांबविण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते." हा हल्ला सर्वांसमक्ष, भर रस्त्यात झाला; मात्र कोणीही किवळेला मदत केली नाही. काही जण मदतीसाठी धावण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात मग्न होते, तर रिक्षाचालकही त्याला रुग्णालयात नेण्यास तयार नव्हते, असे प्रत्यक्षदर्शी वकिलांनी सांगितले. कोर्टातून बाहेर आल्यानंतर माझं आणि त्याचं बोलणं झालं होतं; त्याची पहिलीच तारीख होती. "तू जा," असं मी त्याला म्हटलं आणि तो निघाला, तर मी माझ्या कामाला गेले. त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली.
"न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील परिसराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावर पिस्तूल, कोयत्याने झालेल्या क्रूर हल्ल्यात माझा पक्षकार मंदार किवळे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची मदत करण्यासाठी मी पोलिसांना आवाज दिला, रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न केला, सहकाऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र, कोणतीही मदत न मिळाल्याने अक्षरशः हतबल झाले होते. 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...' असा मी धीर त्याला देत होते. रक्तबंबाळ अवस्थेतील मंदारच्या डोळ्यात जगण्याची धडपड दिसत होती," अशी माहिती वकील शुभांगी परुळेकर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरामध्ये झालेल्या हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं, हे फिर्यादी मंदार किवळे याने फिर्यादीत सविस्तर सांगितले आहे. हल्ल्याचा थरार सांगताना मंदारने हल्लेखोर नेमकं काय म्हणत होते हे स्पष्ट केले आहे. आधी मला "तूच आमच्या शुभमला मारलं ना?" असा प्रश्न दोघांनी विचारला आणि हातात असलेल्या पिस्तुलाने गोळी चालवली; मात्र ती गोळी लागली नाही. त्यावेळी गाडीवर बसलेल्या एकाने "याच्या डोक्यात कोयते टाका" असं म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि त्यानंतर "शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे" असं म्हणत त्यांनी तिथून पळ काढला, अशी माहिती मंदार किवळे याने दिली आहे.
"शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे, आम्हीच कात्रजचे राजे आहोत" असं म्हणत हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला, नंतर कोयत्याने वार केले आणि हल्लेखोर जोरा-जोरात ओरडले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी शुभम नावाने ओरडत कोयते हवेत फिरवले असल्याची माहितीही मंदार किवळे याने फिर्यादीत सांगितली आहे. हल्लेखोर जोरात ओरडत "तूच आमच्या शुभमला मारलं ना?" असं विचारत कोयत्याने सपासप वार करत होते, असे मंदार किवळेने पोलिसांना सांगितले आहे.
शिवाजीनगर कोर्ट हल्ल्यात मंदार किवळेला कोणती गंभीर दुखापत झाली आहे?
गोळीबारातून बचावल्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले आणि वार हातांनी रोखण्याचा प्रयत्न करताना मंदार किवळे याच्या दोन्ही हातांचे पंजे तुटले आहेत.
हल्लेखोर हल्ल्यादरम्यान नेमके काय ओरडत होते?
फिर्यादीनुसार, हल्लेखोरांनी "तूच आमच्या शुभमला मारलं ना?" असे विचारत हल्ला केला आणि "शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे, आम्हीच कात्रजचे राजे आहोत" असे ओरडत कोयते हवेत फिरवले.
घटनेच्या वेळी मदतीबाबत वकील शुभांगी परुळेकर यांनी काय सांगितले?
रक्तबंबाळ मंदार फुटपाथावर कोसळल्यानंतर रुग्णवाहिका व रिक्षासाठी प्रयत्न करूनही मदत मिळाली नाही; काही जण मदतीऐवजी मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात मग्न होते आणि रिक्षाचालकही नेण्यास तयार नव्हते, असे त्यांनी सांगितले.