संग्रहित फोटो 
क्राईम

ट्रेन-ट्रॅव्हल्सने यायचे अन् मोबाईल लांबवायचे; झारखंड- बिहारच्या दोघांना दीड तासात ठोकल्या बेड्या

ट्रेन-ट्रॅव्हल्सने येऊन मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोबाईल फॉरमॅट करून कमी किंमतीत ते विकात होते. याप्रकरणी चोरट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ज्ञानेश्वर मोरे

छत्रपती संभाजीनगर : ट्रेन-ट्रॅव्हल्सने शहरात यायचे, गर्दीची ठिकाणे हेरायची, नागरिकांचे लक्ष विचलित करून मोबाइलवर डल्ला मारायचा व चोरीचा मोबाईल फॉरमॅट करून कमी किंमतीत विकायचा, याप्रकरणी चोरट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच बिहारच्या त्या दोघां चोरट्यांना जवाहरनगर ठाण्याच्या पोलिसांनी दीड तासांत जेरबंद केले आहे. शेख फैय्याज शेख असलम (वय २१, रा. महाराजपूर, मोतीझरणा, ता. तेलझरी, जि. साहेबगंज, झारखंड) आणि नकसूद आलम इदवाह आलम (वय २०, रा. महुचौक, ता. जि. कठियाल, बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून ६५ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

राजेश रामराव सानप (वय ४६, रा. गल्ली क्रं. १२, जयभवानीनगर) हे २१ ऑगस्ट रोजी सकाळी सिग्मा हॉस्पिटलजवळील दर्गा रोडवर भाजीपाला घेत होते. यावेळी दोघांनी त्यांना धक्का देऊन लक्ष विचलित केले आणि त्यांच्या खिशातील २४ हजार ९९९ रुपये किंमतीचा विवो मोबाईल लांबविला. सानप यांच्या फिर्यादीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी दर्गा चौकात दोन संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना पाहताच दोघांनी पळ काढला; मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

दारू पिताना दोघांची ओळख

त्यांच्याकडून तीन चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार जमादार नवतुरे, अंमलदार मारोती गोरे व राजू शिंदे यांनी केली. अटक आरोपी शेख फैय्याज आणि नकसूद आलम हे दोघे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. चोरीच्या उद्देशाने ते वेगवेगळ्या शहरात फिरत असतांना दारू पिताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी सोबत चोरी करण्यास सुरुवात केली.

चोरीचे मिळायचे महिन्याला १५ हजार 

नकसूद हा त्याच्या गावी एका व्यक्तीकडे महिन्याला १५ हजार रुपये पगारावर चोरी करत होता. चोरी केलेले मोबाईल तो पगार देणाऱ्या व्यक्तीला आणून देत होता. मात्र, पगारापेक्षा स्वतः चोरी केल्यास अधिक पैसे मिळतील, या उद्देशाने त्याने स्वतंत्रपणे चोरी सुरू केली. याचदरम्यान फैय्याजशी त्याची ओळख झाली.

मोबाईल फॉरमॅट करून करत होते स्वस्तात विक्री

ट्रेन किंवा ट्रॅव्हल्सने शहरात आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करायचे. चोरीनंतर मोबाईल तात्काळ फॉरमॅट करून तो त्याच शहरात किंवा अन्य शहरात विकायचे. हॉस्पीटलची किंवा अन्य गरज असल्याचे दाखवून ते मोबाईल कमी किमतीत विक्री करत असल्याचे समोर आले आहे. जवाहरनगर हद्दीतील मोबाइल चोरी, दुचाकी चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या - चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! 27 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर, जाणून घ्या

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? राष्ट्रवादीसह आता काँग्रेसमध्येही फोडाफोडी होण्याची शक्यता

IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडची दमदार सुरुवात; निकोल्स-लॅथमच्या जोरावर धावसंख्या 100 पार

Sury Ghar योजनेचा महाराष्ट्रात विक्रम! 9 लाखांहून अधिक घरांवर सोलर पॅनल, 8 लाख लाभार्थ्यांना लाभ