1982 मध्ये रिलीज झालेलं 'आज शनिबार' गाणं GTA 6 मध्ये झळकलं.
रूपा बिस्वास यांचा 'डिस्को जॅझ' अल्बम ठरला होता फ्लॉप.
मुलाला जुन्या रेकॉर्ड्स सापडल्यानंतर गाण्याला मिळाली नवी ओळख.
कधी कधी आपण केलेली मेहनत लगेच कामी येत नाही. त्याचं फळ मिळायला कित्येक वर्षं पण लागतात. बंगाली गायिका रूपा बिस्वास यांच्या बाबतीत नेमकं हेच झालं. त्यांचं एक गाणं रिलीज झाल्यावर फारसं गाजलं नाही, त्यानंतर त्यांनी हळूहळू संगीतापासून स्वतःला लांब केलं. आज, तेच बंगाली गाणं जगभरातल्या गेमर्समध्ये चर्चेचा विषय बनलं.
गायिका रूपा बिस्वास यांनी गायलेलं 'आज शनिबार' हे बंगाली गाणं आता खूप चर्चेत आलं. 1982 मध्ये रेकॉर्ड केलेलं हे गाणं आता 'ग्रँड थेफ्ट ऑटो 6' (GTA 6) या व्हिडिओ गेमच्या म्युझिकमध्ये बघायला मिळतं. या जगप्रसिद्ध गेममध्ये गाडी चालवताना जेव्हा खेळाडू रेडिओ स्टेशन बदलतात, तेव्हा त्यांना चार दशकांहून जास्त जुनं गाणं ऐकू येतं. या बंगाली गाण्याला गेमच्या वर्ल्डवाइड FM रेडिओ स्टेशनवर जागा मिळाली आहे, जगभरातल्या वेगवेगळ्या संगीत आणि कलाकारांना हे रेडिओ स्टेशन एक व्यासपीठ देतं. त्यामुळेच, रूपा बिस्वास यांचा आवाज आता अशा आंतरराष्ट्रीय लोकांपर्यंत पोहोचतोय, ज्यांनी कधी बंगाली संगीत ऐकण्याचा विचारही केला नसेल.
आज शनिबार' हे जवळपास आठ मिनिटांचं गाणं आहे. त्याचं म्युझिक अगदी सुरुवातीपासूनच एक वेगळंच वातावरण बनवतं. यात फास्ट डिस्को ताल आहे, पण ती लय फक्त पाश्चात्य डिस्को संगीताची कॉपी नाही. भारतीय शास्त्रीय वाद्यं आणि पाश्चात्य संगीताचं वेगळं मिश्रण हे त्याचं खासपण आहे.
सरोदचा आवाज, तबल्याचे ताल, इलेक्ट्रिक गिटार आणि बेस एकत्र येऊन असं संगीत तयार झालंय. हे म्युझिक एकीकडे 80 च्या दशकातल्या डिस्कोची आठवण करून देतं, तर दुसरीकडे एक भारतीय संगीत म्हणून आपली स्वतःची ओळख टिकवून ठेवतं.
रूपा बिस्वास या कोलकाता इथल्या एक गायिका आहेत. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती, त्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीताचं ट्रेनिंग पण घेतलं होतं. 1981 आणि 1982 च्या सुमारास, त्या आपल्या भावाला भेटायला कॅनडाला गेल्या होत्या. तिथे त्यांना कॅलगरी विद्यापीठातल्या एका कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली.
त्या कार्यक्रमात फेमस सरोद वादक आशिष खान आणि त्यांचे भाऊ प्रणेश खान हे पण होते. रूपा यांच्या आवाजाने खुश होऊन, त्यांनी तिच्यासोबत एका म्युझिक प्रोजेक्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला. अल्बमच्या म्युझिक आणि अरेंजमेंटमध्ये आशिष खान यांनी महत्वाची भूमिका बजावली. अशाप्रकारे, 'आज शनिबार' या गाण्यासह तीन गाणी आणि एक वाद्यसंगीताचा ट्रॅक असलेला 'डिस्को जॅझ' हा अल्बम तयार झाला.
हा रूपाचा पहिला आणि एकमेव अल्बम ठरला. त्या काळात भारतात डिस्कोचा मोठा ट्रेंड होता. बप्पी लाहिरींच्या संगीतापासून ते मिथुन चक्रवर्तींच्या 'डिस्को डान्सर' या सिनेमापर्यंत हा ट्रेंड खूप गाजला, पण रूपाचा अल्बम त्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यात फेल ठरला.'डिस्को जॅझ' 1982 मध्ये रिलीज झाला, पण त्याला वाटलं तसं यश मिळालं नाही. त्याच्या फारच कमी प्रती विकल्या गेल्या आणि रूपाला वाटलेली ओळख मिळाली नाही.
हळूहळू, ती संगीत जगतापासून लांब गेली. तिच्या जुन्या रेकॉर्ड्स घरातल्या एका ट्रंकेत पडून होत्या. कित्येक वर्षांनंतर, तिचा मुलगा, देबायन सेन याला साफसफाई करताना त्या रेकॉर्ड सापडल्या. त्यावर आपल्या आईचा जुना फोटो बघून त्याला कळलं की, त्याच्या आईने एकेकाळी एक अल्बम काढला होता. इथूनच गायिकेची दुसरी इनिंग सुरू झाली.
हे गाणं जुन्या रेकॉर्ड्सच्या शोधात असलेल्या लोकांपर्यंत आणि परदेशी डीजेंपर्यंत पोहोचू लागलं. स्वीडिश डीजे अल्बियन व्हेनेबल्सने ते आपल्या सेट्समध्ये वाजवलं. कॅनेडियन म्युझिशियन आणि डीजे डॅन स्नेथनेही त्याचा आपल्या डीजे सेट्स आणि रेडिओमध्ये समावेश केला. 2016 मध्ये, या गाण्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्यात आला.
2019 मध्ये, अमेरिकन संगीत लेबल नुमेरो ग्रुपने मूळ अॅनालॉग रेकॉर्डिंगमधून रिमास्टर करून "डिस्को जॅझ" अधिकृतपणे परत रिलीज केला. अशाप्रकारे, मार्केटमध्ये त्यावेळी कधीही लोकप्रियता न मिळवलेला एक अल्बम आंतरराष्ट्रीय संगीत कलेक्टर्समध्ये एक फेमस अल्बम बनलाय.