(फोटो सौजन्य-सोशल मिडिया) 
Entertainment

Deepak Kejriwal: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण? CINTAA कार्यालयातील घटनेने खळबळ

Deepak Kejriwal: ज्येष्ठ अभिनेते दीपक काजरी केजरीवाल यांनी CINTAA कार्यालयात मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. उपासना सिंह यांनी संपूर्ण घटनेची दुसरी बाजू सांगितली.

अमृता यादव

Deepak Kejriwal: हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते दीपक काजरी केजरीवाल सध्या एका वादामुळे चर्चेत आले आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ‘जाने भी दो यारो’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘परदेस’ आणि ‘मेट्रो...इन दिनों’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, मुंबईतील सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनच्या (CINTAA) कार्यालयात घडलेल्या एका घटनेमुळे मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मारहाणीचे आरोप-प्रत्यारोप झाले असून पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

CINTAA कार्यालयात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी दीपक काजरी केजरीवाल मुंबईतील CINTAA कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांना प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला कार्यालयात जाण्यापासून का रोखले जात आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर तेथील उपस्थित लोकांशी त्यांचा वाद झाला.

केजरीवाल यांच्या आरोपानुसार, हा वाद वाढल्यानंतर काही सहकारी सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि या घटनेत ते जखमी झाले. यानंतर त्यांनी संबंधित प्रकरणी तक्रार दाखल केली. मात्र, या घटनेबाबत CINTAA पदाधिकाऱ्यांनी वेगळीच बाजू मांडली आहे.

उपासना सिंह यांनी सांगितली घटनेची दुसरी बाजू

CINTAA च्या अध्यक्षा आणि अभिनेत्री उपासना सिंह यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, केजरीवाल यांचे सदस्यत्व आधीच रद्द करण्यात आले होते. तरीही सुरक्षा रक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केला असतानाही ते वरच्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये सुरू असलेल्या बैठकीत जबरदस्तीने शिरले.

उपासना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आत आल्यानंतर केजरीवाल यांनी उपस्थितांशी अपमानास्पद भाषेत बोलण्यास सुरुवात केली. यावेळी ज्येष्ठ अभिनेते दीपक पराशर यांनाही धक्का बसल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचेही उपासना यांनी सांगितले.

“त्यांच्या कोपराचा माझ्या नाकाला जोरात मार लागला”

या घटनेदरम्यान आपल्यालाही दुखापत झाल्याचा दावा उपासना सिंह यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, “मी त्यांना शांतपणे कॉन्फरन्स रूममधून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, ते ऐकण्यास तयार नव्हते. मी त्यांना बाहेर नेत असताना त्यांनी अचानक हात फिरवला आणि त्यांच्या कोपराचा माझ्या नाकाला जोरात मार लागला.”

या घटनेनंतर आपले नाक सुजल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच दीपक पराशर यांना तातडीने रुग्णालयात न्यावे लागल्याचा दावा केला. केजरीवाल यांनी ही घटना चुकून घडल्याचे सांगितल्याचेही उपासना यांनी नमूद केले.

CINTAA ने केजरीवाल यांचे सदस्यत्व केले रद्द

उपासना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेच्या समितीने सर्वांच्या संमतीने केजरीवाल यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना आजीवन निलंबित केले आहे. तरीही ते वारंवार कार्यालयात येऊन वाद घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या की, केजरीवाल यांच्याकडून महिला आणि कार्यकारिणी समितीच्या सदस्यांशी अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वी २६ जानेवारीच्या कार्यक्रमातही त्यांनी महिलांशी गैरवर्तन केले आणि ॲशट्रे फेकल्याचा आरोप उपासना यांनी केला. अशा घटनांनंतर ते लेखी किंवा व्हिडिओद्वारे माफी मागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांच्याकडून यापूर्वीही कार्यालयात वाद घातला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. वारंवार विनंती करूनही ते कार्यालयातून बाहेर पडत नसल्याने पोलिसांना बोलवावे लागल्याचे उपासना सिंह यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. दीपक काजरी केजरीवाल यांनी मारहाणीचा आरोप केला आहे, तर उपासना सिंह यांनी त्यांचे आरोप फेटाळत केजरीवाल यांच्या वर्तनाबाबत गंभीर दावे केले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही बाजूंच्या दाव्यांची पडताळणी केली जात आहे.

बोरांसाठी चिमुरडीवर क्रूरतेचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची चक्रे फिरली...

जुन्या WhatsApp DP ला म्हणा बाय-बाय! AI बनवणार तुमचा नवा स्टायलिश लूक

Kabaddi Tournament : अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत; स्पर्श फाउंडेशन, स्वस्तिक मंडळाची विजयी आगेकूच

FUEL Social Stock Exchange: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! 'फ्युएल'च्या माध्यमातून शिष्यवृत्ती आणि मोफत MBA ची घोषणा

चक दे इंडिया! भारताच्या वाघिणींचा 'विजयी चौकार'; चीनला लोळवत चौथ्यांदा पटकावला Asian Champions Trophy चा किताब