सातारी स्वॅग, बेधडक स्वभाव आणि कुटुंबासाठी असलेलं हळवं मन… झी मराठीवरील ‘येतेच आता मी नांदायला’ या मालिकेत हर्षद अतकरी एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलग पाच मालिकांनंतर ब्रेक घेण्याचा विचार असतानाच या मालिकेतील व्यक्तिरेखेने मात्र त्याला आकर्षित केलं आणि सर्व चांगलं असल्यामुळे या भूमिकेला नकार द्यायचा प्रश्नच नव्हता असं म्हणतच हर्षद अतकरीने नवराष्ट्रशी संवाद साधायला सुरूवात केली.
सातारी भाषेचा ठसका, रांगडेपणा, बिनधास्त वृत्ती आणि भावनिक बाजू असलेल्या या भूमिकेसाठी हर्षदने नेमकी काय तयारी केली? सेटवर कलाकारांची भट्टी कशी जमली? जाणून घेऊया हर्षद अतकरीशी केलेल्या खास संवादातून.
दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतताना चाहत्यांना तुझ्याकडून काय खास पाहायला मिळणार आहे? यावर हर्षद मनापासून म्हणाला की, ‘ही माझी प्रमुख भूमिका असलेली सहावी मालिका आहे. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. याआधी मी सलग पाच मालिका केल्या होत्या, त्यामुळे आता थोडा ब्रेक घ्यायचा असं ठरवलं होतं. मात्र, मनाला भिडेल अशी भूमिका शोधत होतो.
‘येतेच आता मी नांदायला’मधील पात्र आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं आहे. या भूमिकेत रांगडेपणा आहे, जो मी याआधी कधीच साकारला नव्हता. हे पात्र माझ्यासाठी पाथब्रेकिंग आहे, असं म्हणता येईल. त्यामुळे नकार द्यायचा काही प्रश्नच नव्हता. झी मराठीसह आधी पण कामाच्या संधी आल्या होत्या पण त्यावेळी काही ना काही कारणाने राहून गेलं पण ही संधी मिळाली आणि मला त्याचा खूपच आनंद होत आहे.
‘येतेच आता मी नांदायला’मधील तुझी व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे? ही भूमिका साकारताना नेमकी काय आव्हानं आली? यावर हर्षद अतकरी म्हणाला की, ‘मालिकेतील हा मुलगा मनात येईल ते बेधडक बोलून टाकतो. तो खूप बिनधास्त आहे, स्वतःच्या पद्धतीने जगणारा आहे. त्याच्यात एक प्रकारचा रांगडेपणा आणि स्वॅग आहे. तो प्रॅक्टिकल आहे, जुगाडू आहे आणि अनेकदा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतो. त्याचं बेफिकीर वागणं हेच त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे.’
पुढे हर्षद म्हणाला की, ‘मुळात सातारी ठसका हा खूप वेगळा आहे. तिथले लोक तोंडावर बोलणारे आणि बेधडक असतात. मनात येईल ते बोलून टाकण्याची त्यांची एक शैली आहे. ही भाषा आणि त्यांचा स्वभाव समजून घेणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेचा रांगडेपणा केवळ संवादातून नाही, तर तिच्या वागण्यातून आणि देहबोलीतूनही दाखवण्याचा प्रयत्न केला.’
यानंतर आम्ही हर्षदला विचारलं की, आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका किती वेगळी आहे? कलाकार म्हणून या भूमिकेने तुम्हाला काय नवीन शिकवलं? हर्षद म्हणाला की, ‘याआधी मी अशा प्रकारचा रांगडेपणा असलेली भूमिका केली नव्हती. प्रत्येक पात्राकडून कलाकार म्हणून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. या भूमिकेत प्रॅक्टिकल असणं, बेधडकपणे व्यक्त होणं आणि स्वतःची एक वेगळी शैली जपणं हे महत्त्वाचं आहे. ही भूमिका मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करण्याची संधी देते.
पण या मालिकेचा हिरो हा बिनधास्त आहे, त्याचं कुटुंबाप्रती असलेलं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. ते प्रेम तो कदाचित उघडपणे दाखवत नाही, पण त्याच्या वागण्यातून जाणवतं. त्याचा बेफिकीरपणा हा एका अर्थाने त्याच्यातील सॉफ्टनेसही आहे. भावनांच्या बाबतीत तो हातचं राखून वागतो, पण मनाने तो खूप वेगळा आहे. प्रेक्षकांना त्याचा बिनधास्तपणा आवडेल, पण त्याचं बेफिकीर वागणं काही वेळा खटकूही शकतं.’
प्रोमोमध्ये दिसून आलंय की, मालिकेत आजीबरोबर त्याचे खटके उडत आहेत, त्यामागचं कारण काय आहे? यावर हर्षद म्हणाला की, ‘हे खरं तर बघण्यात मजा येणार आहे पण मी इतकं सांगू शकतो की, आजीच्या आईशी नीट न वागण्यामुळे घरात काही गोष्टींवरून मतभेद होतात. आजीबरोबर त्याचे सतत खटके उडतात. या नात्यातील संवाद, मतभेद आणि घरातील वातावरण यामुळे मालिकेतील कौटुंबिक नाट्य अधिक रंगतदार होताना दिसणार आहे.’
सातारी भाषा, तिचा लहेजा आणि बोलण्याची ढब आत्मसात करण्यासाठी तू नेमकी काय तयारी केली? या प्रश्नावर हर्षदने सांगितलं की, ‘सातारी भाषेचा एक वेगळाच ठसका आहे. त्या भागातील लोक कसे बोलतात, त्यांची देहबोली कशी असते, ते चालतात कसे, त्यांच्या बोलण्यातील बेधडकपणा कसा असतो, याचं निरीक्षण केलं. ७-८ दिवस वाई परिसरात शूटिंग झालं. त्या काळात स्थानिक लोकांशी बोललो, त्यांची भाषा ऐकली आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत समजून घेतली. वाचन आणि निरीक्षणातूनही तयारी केली. या सगळ्याचा भूमिकेसाठी खूप फायदा झाला.
सातारी माणसांचं निरीक्षण करून त्यांच्या स्वभावातील सहजता आणि बेधडकपणा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. ही व्यक्तिरेखा वेगळी असल्यामुळे तिच्यासाठी स्वतःला त्या वातावरणात घेऊन जाणं गरजेचं होतं.
कलाकारांची भट्टी जमली की मालिका अधिक खुलते असं म्हणतात त्यामुळे सेटवर कलाकारांमधील केमिस्ट्री आणि एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? यावर हर्षदने अगदी मनापासून म्हटलं की, ‘या मालिकेतील पात्रं खूप अतरंगी आहेत. संपूर्ण टीमला भेटल्यानंतर मला कास्टिंग खूप छान झाल्याचं जाणवलं. प्रत्येक कलाकाराची स्वतःची एक शैली आहे आणि सगळ्यांची भट्टी छान जमली आहे. सेटवर काम करताना एकमेकांशी जुळून काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे सीन करताना एक वेगळाच उत्साह जाणवतो. माझं कास्टिंग हे शेवटच्या क्षणी झालं असलं तरी संपूर्ण टीम खूप चांगली जुळून आली आहे.
आणि मुळात उषाताईंसोबत काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्या खूप अनुभवी आहेत. सुरुवातीला त्या खूप कडक असल्यासारखं वाटतं, त्यांचा स्वतःचा एक झोन आहे; पण त्या खूपच मस्त आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येते. मी गेली १३ वर्षं काम करतोय, पण त्यांच्यासोबत काम करण्याची संधी याआधी मिळाली नव्हती. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूप शिकण्यासारखा आहे.’
सुचित्रा बांदेकर यांच्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करण्याची ही पहिलीच संधी आहे. अनुभव कसा आहे? यावर हर्षद हसत म्हणाला ‘याचा तर एक मोठा किस्सा आहे, माझी निवड व्हायच्या आधीच या मालिकेचा प्रोमो आला होता. तो प्रोमो मी पाहिला होता आणि प्रेक्षक म्हणून मला हा प्रोमो कमालीचा वाटला होता आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मला फोन आला की, ही भूमिका करशील का? त्यानंतर नकार देण्याचा काहीच प्रश्न नव्हता. इतकी छान कलाकारांची टीम पाहून मला खूप आनंद झाला. वर्कशॉपमध्ये सगळ्यांना भेटल्यानंतर कास्टिंग किती छान झालंय, याची जाणीव झाली. शेवटच्या क्षणी माझी निवड झाली असली तरी सगळ्यांची भट्टी खूप छान जुळून आली आहे.
सोहम प्रॉडक्शनने याआधी खूप चांगल्या मालिका दिल्या आहेत. त्यांच्याबद्दल आधी ऐकलं होतं, पण आता प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काम करतोय. झी आणि सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत काम करताना खूप छान वाटतंय. या मालिकेच्या निमित्ताने अनेक गोष्टी पहिल्यांदाच जुळून आल्या आहेत. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खास आहे.
आता सगळ्यात शेवटी प्रेक्षकांनी ‘येतेच आता मी नांदायला’ ही मालिका का पाहावी असं तुला वाटतं? यावर हर्षदने सांगितलं की, ‘या मालिकेतील पात्रं खूप वेगळी आणि अतरंगी आहेत. कौटुंबिक नाट्य असलं तरी प्रत्येक पात्राची स्वतःची शैली आहे. कथा चांगल्या पद्धतीने लिहिली जात आहे आणि कलाकारांनाही त्यातून खूप छान काम करण्याची संधी मिळते. प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळा अनुभव मिळेल आणि माझीही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडेल अशी खात्री आहे असं सांगत मालिका बघायला विसरू नका असंही अगदी आवर्जून हर्षदने नवराष्ट्रच्या वाचकांना सांगत निरोप घेतला.