(फोटो सौजन्य-सोशल मीडिया) 
Entertainment

Mrudgandha Awards 2026 : ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; पं. सुरेश तळवलकरांसह दिग्गज कलाकारांचा गौरव

Mrudgandha Awards 2026 :ठाण्यात पार पडलेल्या १६व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहात पं. सुरेश तळवलकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमृता सुभाष, संदेश कुलकर्णींसह मान्यवरांचा गौरव.

अमृता यादव

Mrudgandha Awards 2026: ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे १६वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ सोहळा दिमाखात पार पडला. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना प्रदान करण्यात आला. यासोबतच लोककला, छायाचित्रण, पत्रकारिता, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.

‘गुरुकृपेशिवाय साधनेला अर्थ नाही’; पं. सुरेश तळवलकर यांनी सांगितले गुरूंचे महत्त्व

जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर पं. सुरेश तळवलकर यांनी संगीत क्षेत्रातील गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “पुरस्काराने मन आनंदित होतं, नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. अशा वेळी गुरूंची आठवण येणं स्वाभाविक आहे. गुरुकृपेशिवाय साधनेला अर्थ नाही आणि संगीत क्षेत्रात गुरूंचं स्थान अनन्यसाधारण आहे.”

पुढे संगीताच्या चार महत्त्वाच्या स्तंभांविषयी बोलताना त्यांनी शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला यांचा उल्लेख केला. “शास्त्र समजावलं जातं, तंत्र शिकवलं जातं, विद्या दिली जाते; पण कला संस्कारित करते. संगीताचं ज्ञान बाहेरून आत येत नाही, ते अनुभूतीतून आत्मसात होतं. अनुभूती साधनेशिवाय, साधना संस्कारांशिवाय आणि संस्कार गुरूशिवाय शक्य नाहीत,” असे त्यांनी सांगितले.

अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांचाही सन्मान

‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ अंतर्गत विविध क्षेत्रांतील योगदानासाठी मान्यवरांना गौरवण्यात आले. लोककला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा, छायाचित्रण आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी पद्मश्री सुधारक ओलवे, अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रासाठी संदेश कुलकर्णी, अभिनय क्षेत्रासाठी अभिनेत्री अमृता सुभाष आणि नवोन्मेष प्रतिभा विभागात गायक चैतन्य देवढे (माऊली) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमृता सुभाष यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “मला आणि संदेशला एकत्रितपणे मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. आज हा पुरस्कार स्वीकारताना बाबांची खूप आठवण येतेय. विठ्ठल उमप यांच्या सच्च्या सुरातून, त्यांच्या कामातून आणि आठवणींतून आजही आम्ही खूप काही शिकत आहोत. त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणं, ही भावना शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी खूप खास आहे.”

संदेश कुलकर्णी यांनीही या सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “हा प्रेमाचा सोहळा आहे. यात सहभागी होता आलं, याचा खूप आनंद आहे. उत्तम कलाकारांसोबत पुरस्कार स्वीकारण्याची आणि या सुंदर सोहळ्याचा भाग होण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. हा पुरस्कार पुढील प्रवासात आणखी चांगलं काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल.”

चैतन्य देवढे यांनी व्यक्त केली कृतज्ञता

गायक चैतन्य देवढे (माऊली) यांनी पुरस्कार स्वीकारताना विठ्ठलाचा आशीर्वाद लाभल्याची भावना व्यक्त केली. या सन्मानामुळे आनंद आणि नवी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार लाखमोलाचा असल्याची भावना सर्व पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली.

सांगीतिक कार्यक्रमातून लोकशाहीर विठ्ठल उमप यांना मानवंदना

पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे, अरुण पेदे वेसावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बहारदार कलाविष्कार सादर करत लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सांगीतिक मानवंदना अर्पण केली. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले आकर्षक मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

लोककलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संगीत नाटक अकादमी आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘मृद्गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते.

यावेळी प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले, “बाबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचा वारसा पुढे नेताना आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आजवर ६५ मान्यवरांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली. या मान्यवरांचा सन्मान करताना आम्हालाही सन्मानित झाल्यासारखं वाटतं.”

Nagpur News : पॅरामेडिकल शिक्षण घेतले, रोजगाराची हमी कधी ? प्रादेशिक पॅरामेडिकल संस्था अनेक वर्षांपासून रखडली

Hague Conference : दुसऱ्या महायुद्धातील 'ते' विषारी बॉम्ब आजही चीनसाठी जीवघेणे; हेगमध्ये 40 देशांसमोर चीनने उघडली जपानविरुद्ध आघाडी

Sambhajinagar ZP News : संभाजीनगर जिल्हा परिषदेला २१५ कोटींचा निधी; डिसेंबरपासून विकासकामांना सुरुवात

Health news: गर्भवती महिला आणि नव्या पालकांचा ‘गुगल डॉक्टर’वर वाढता विश्वास, तज्ज्ञांच्या सल्ल्या घेण्यास टाळाटाळ

Kalyan News: आई रागावली म्हणून सहा वर्षांचा रोशन घरातून निघाला; लोकल पकडून थेट खडवली गाठली, १० तासांनी पोलिसांनी शोधले!