एकंदरीत महाराष्ट्राच्या पश्चिम भागापुरताच शरद पवारांचा पक्ष सीमित राहिला ही वस्तुस्थिती आहे. विदर्भात रा.काँ.ला एकदाच पाच आमदार निवडून आणता आले होते. मराठवाड्यातील बीड भागात जेंव्हा धनंजय मुंडे हे रा.काँ.त आले तेंव्हा थोडा प्रतिसाद मिळत गेला. पण एरवी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली अन् थोड्या प्रमाणात नाशिक इतक्याच भागात पवारांचे आमदार निवडून येत होते. विशेष म्हणजे हे सारे स्वयंभू नेते असून ते शरद पवारांशिवयाही निवडून येऊ शकतात अशा ताकदीचे संस्था सम्राट आहेत. यातील बहुतेक सारे अजितादादा समवेत गेले आहेत. आता शरद पवारांकडे उरलेले डझनभर आमदार पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. वयाने व प्रकृतीने थकलेले शरदराव जुन्या दमाने संघर्ष करू शकतील का हाही मोठाच प्रश्न आहे. अजितदादा पवार निघून जाण्याने शरदरावांचे मोठे राजकीय नुकसान झाले असून पुढची लोकसभा व विधानसभेची निवडणूक त्यांच्या उर्वरीत पक्षासाठी महाकठीण परीक्षा ठरणार आहे.
1999 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले जून 2023 मध्ये झाल्यानंतर अजितदादा पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव तसेच गजराचे घड्याळ हे पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळाले असून उरलेल्या पक्षाचे नाव एनसीपी शरदचंद्र पवार असे निश्चित झाले आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह अद्याप ठरायचे आहे.
गेल्या पंचवीस वर्षातील राजकीय अस्तित्वात स्वतः शरद पवार हे दहा वर्षे केंद्र सरकारमध्ये महत्वाचे मंत्री होते. त्यांचा पक्ष महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्षे सत्तेत राहिला. तत्पूर्वी काँग्रेस नेते या नात्याने शरदराव केंद्रात मंत्री होते व महाराष्ट्रातील कुणालाही मंत्री वा मुख्यमंत्री करू शकत होते. पण शरदरावांना इतकी सत्ता मिळूनही त्यांना स्वबळावर राज्यात कधीच का सरकार स्थापन करता आले नाही ? देवेगौडा व गुजराल यांच्या सारखे मुठभर खासदारांचे नेते हे देशाचे पंतप्रधानपद घेऊ शकले, तशी संधी एखाद्या आघाडी सरकारमध्ये पवारांना का मिळाली नाही ? राज्यात त्यांचा पक्ष कधीच सर्वाधिक आमदारांचा पक्ष होऊ शकला नाही ? या साऱ्याचे कारण हे शरदराव पवारांच्या धरसोडवृत्तीच्या राजकारणाला आणि त्यातून त्यांनी गमावलेल्या राजकीय विश्वासहर्तेला द्यावे लागेल. त्या अर्थाने त्यांचे राजकारण पक्षकारण हे व्यर्थ, विफल ठरले का ? हा प्रश्न सहाजिकच तयार होतो.
नवीन संसदेची स्थापना होईल आणि नवे राज्य सरकार सत्तेत बसेल तेव्हा शरद पवारांच्या आयुष्याची 84 वर्षे पूर्ण होतील. 12 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस मुंबई आणि दिल्लीतील त्यांचे पाठिराखे, कार्यकर्ते, आमदार व नेते हा मोठ्या उत्साहाने व जोरदारपणाने साजरा करत असतात. साधारण वीस वर्षांपूर्वी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने अशी निवडणूक मोहीम चालवली होती की या निवडणुकीत पवारसाहेबांना पंतप्रधान कऱण्यासाठी मतदान करा. 2004 च्या त्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत करूनही शरद पवारंच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला खासदारकीच्या फक्त नऊ जागा मिळवता आल्या. त्यांना रामदास आठवलेंनी पाठिंबा दिला होता असे त्यांचे दहा खासदार महाराष्ट्रातून गेले होते.
शरद पवारांचे नेतृत्व निर्विवादपणाने मोठे आहे. त्यांना राजकीय क्षेत्रात मोठा मान मिळतो. पण त्यांचा पक्ष हा नेहमीच लहान राहिलेला आहे. प्रादेशिक पक्ष आणि त्यातही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातच अस्तित्व दाखवणारा पक्ष अशाच पक्षाचे नेतृत्व शरदराव करत राहिले आहेत.
शरद पवार हे राजकारणात आले ते यशवंतराव चव्हाणांचे चेले म्हणून. त्यांचे व चव्हाणसाहेबांचे संबंध अतिशय दृढ होते. शरदरावांकडे चव्हाण साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले गेले. त्यांनी चव्हाणांच्या पावलावर पाऊल टाकून राजकीय सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात स्वतःचे असे स्थान निर्णाण केले. चव्हाण जसे 1962 मध्ये नेहरुंच्या सरकारमध्ये देशाचे संरक्षण मंत्री बनले तशीच जबाबदारी पवारांना 1991 मध्ये नरसिंहरावांच्या सरकारमध्ये मिळाली होती.
काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस म्हणून शरदराव जेव्हा कार्यरत होते तेव्हा म्हणजे 1970 च्या दशकात त्यांचा मुक्काम पक्षाच्या मुख्यालयात, दादरमधील टिळकभवनात असायचा. पक्षासाठी तळमळीने पडेल ते काम करणारा तरूण असा त्यांचा लौकीक होता. त्यांना 1972 पासून आमदार म्हणून संधी मिळाली. देशात इंदिरा गांधींनी पुकारलेली आणीबाणी व नंतर बदलत गेलेले राजकारण यांनी शरदरावांना प्रथम राज्याचे मुख्यमंत्री बनवले.
1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गंधींच्या काँग्रेसचे दणदणित पराभव झाला आणि समाजवादी, संघवादी रॉईस्ट कम्युनिस्ट अशा विविध विचारांचे नेते एकत्र येऊन जनता दलाची स्थापना झाली. त्याचे महाराष्ट्रातील नेतृत्व करत होते समाजवादी नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि जनसंघाचे उत्तमराव पाटील. आणीबाणीनंतरच्या राज्यातील निवडणुकीत वसंतदादांच्या नेतृत्वातील चव्हाण समर्थक अर्स काँग्रेस व इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील नासिकराव तिरपुडेंची काँग्रेस आय यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले आणि त्यात शरदराव पवार हे कृषीमंत्री बनले.
पण त्या संयुक्त सरकारमध्ये काँग्रेस एसचे आमदार अस्वस्थ होते. तिरपुडे हे पदोपदी चव्हाणसाहेबांचा अवमान करतात व राज्यातील सहकार क्षेत्रात ढवळाढवळ करतात असे आरोप करीत चव्हाणांच्या समर्थक आमदारांनी उठाव केला. त्या बंडाचे नेतृत्व शरदरावंकडे आले. तिथून शरदरावंचा राजकीय प्रवास हा कधी दिल्लीतील काँग्रसेच्या बरोबरीने, कधी विरोधात, कधी जमवून जुळवून घेत असा सुरु राहिला. ते ना धड राज्यातील विरोधी आवाजाचे नेतृत्व करत होते ना ते काँग्रेसमधील एकनिष्ठ गणले जात होते.
1978 ला पवारांनी स्थापन केलेले पुलोदचे सरकार हे जेमतेम दोन वर्षेही टिकले नाही. इंदिरा गांधी 1980ला पुन्हा देशात सत्तेत आल्या. जनता प्रयोग संपुष्टात आला. त्यांनी राज्यातील पुरोगामी आघाडी सरकार बरखास्त करून टाकले. तत्पूर्वी त्यांनी शरदरावांना ऑफर दिली होती की तुमचा काँग्रेस सामाजवादी पक्ष इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन करून टाका. आमदार घेऊन माझ्याकडे या, तुम्हालाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाईल. पण तेंव्हा शरदरावांनी ते ऐकले नाही. त्यांची 1980 ची विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवली आणि सत्तरच्या आसपास आमदार निवडून आणले. पण त्यांचे सुशीलकुमार शिंदेंसारखे दोन डझन सहकारी हे इंदिरा काँग्रेसमध्ये निघून गेले. पवार विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यात कार्यरत राहिले.
पुढची 1985 ची विधानसभेची निवडणूकही त्यांनी स्वळावर लढवली पण पुन्हा ते फक्त 54 आमदार काँग्रेस एसच्य तिकिटावर निवडून आणू शकले. कालांतराने त्यांनी आपला पक्ष राजीव गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. 1988 मध्ये राजीव गांधींनी शंकरराव चव्हाणांना हटवून पवार साहेबांना राज्यात मुख्यमंत्री केले. पण 1990 च्या निवडणुकीत शरदरावांच्या नेतृत्वातील काँग्रेसला विधानसभेत बहुमत मिळवता आले नाही. त्यांना 141 जाग मिळाल्या तर जनता दलाकडे 24 आमदार होते. त्यातील बबनराव ढाकणेंचा गट पवारांनी फोडून काँग्रेसमध्ये घेऊन टाकला आणि सरकार स्थिर केले होते. काही अपक्ष त्यंच्या सोबत राहिले.
पण तेही सरकार पवारांना पूर्ण काळ चालवता आले नाही. ते केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि राज्यात त्यांनी सुधाकरराव नाईकांना आपला माणूस म्हणून खुर्चीत बसवले. अर्थातच सुधाकरराव नाईकही त्यांचे असे नव्हतेच. नाईकांनी नंतरच्या काळात सत्ता सोडताना शरद पवारांना लाखोली वहिली होती. अशा प्रकारे शरदरावांनी जरी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला होता, तरीही त्यांचा एकही कर्यकाळ हा धड पूर्ण होऊ शकला नाही. त्यांचा एकत्रित मुख्यमंत्रीपदाचाही कालावधी हा धड पाच वर्षेही राहिला नाही.
1986 मध्ये राजीव गांधींचे नेतृत्व स्वीकारून शरदराव जरी काँग्रेस नेते बनले तरी त्यांना पक्षाने निष्ठावान मानले नाही. दहाच वर्षांनी 1996-97 पासून त्यांचे व दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे सतत बिनसत राहिले आणि अखेरीस 1999 ला शरदरावांनी सोनिया गांधी या जन्माने विदेशी आहेत त्या भारताचे नेतृत्व करू शकत नाहीत अशी भूमिका घेतली व त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांच्या सोबत तारिक अन्वर आणि पी. ए सगंमा हे नेतेही बाहेर पडले या तिघांचे वर्णन अमर अकबर अँथनी असे केले जात असे. पण संगमा हे पुढच्या काळात पवारांना सोडून काँग्रेसमध्ये परत गेले. तारीक अन्वरही सोडून गेले.
पवारांच्या राष्ट्रीय नेते या प्रतिमेला कायमची घरघर लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पसारा सुरवातीच्या पाच दहा वर्षात महाराष्ट्राबाहेरही तीन चार राज्यात थोडा थोडा वाढला होता खरा, पण एकंदरीत महाराष्ट्राच्या पश्चिम भागापुरताच त्यांचा पक्ष सीमित राहिला ही वस्तुस्थिती आहे. विदर्भात रा.काँ.ला एकदाच पाच आमदार निवडून आणता आले होते. मराठवाड्यातील बीड भागात जेंव्हा धनंजय मुंडे हे रा.काँ.त आले तेंव्हा थोडा प्रतिसाद मिळत गेला. पण एरवी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली अन् थोड्या प्रमाणात नासिक इतक्याच भागात पवारांचे आमदार निवडून येत होते. विशेषम्हणजे हे सारे स्वयंभू नेते असून ते शरदरावांशिवयाही निवडून येऊ शकतात अशा ताकदीचे संस्था संम्राट आहेत. ता तायतील बहुतेक सारे अजितादांसमवेत गेले आहेत आता शरदरावांकडे उरलेले डझनभर आमदार पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. वयाने व प्रकृतीने थकलेले शरदराव जुन्या दमाने संघर्ष करू शकतील का हाही मोठाच प्रश्न आहे. अजितदादा पवार निघून जाण्याने शरदरावांचे मोठे राजकीय नुकसान झाले असून पुढची लोकसभा व विधानसभेची निवडणूक त्यांच्या उर्वरीत पक्षासाठी महाकठीण परीक्षा ठरणार आहे.