बाळाच्या जन्मानंतर त्याच्या रडण्याचा पहिला आवाज ऐकला की सगळ्यांनाच एक प्रकारचा दिलासा मिळतो. मात्र, बाळ बाहेरून पूर्णपणे निरोगी दिसत असले तरी त्याला काही आरोग्यविषयक समस्या असू शकतात, ज्या लगेच लक्षात येत नाहीत. त्यामुळे जन्मानंतरचे पहिले 48 ते 72 तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात बाळाची योग्य तपासणी आणि आवश्यक चाचण्या केल्यास गंभीर नुकसान होण्यापूर्वीच आरोग्याच्या समस्या ओळखता येऊ शकतात. विशेषतः मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत चाचण्यांच्या रिपोर्टचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे गरजेचे असते. कारण बाळ किती आठवड्यांचे असताना जन्माला आले आहे, त्याला दूध किती आणि कसे दिले जात आहे आणि त्याच्यावर कोणते उपचार सुरू आहेत, या गोष्टींमुळे चाचण्यांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. याविषयी डॉ. वर्षा बिर्ला, एमडी डीएनबी बायोकेमिस्ट्री, प्रादेशिक गुणवत्ता प्रमुख, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
आरोग्याच्या समस्या लवकर ओळखणे आणि त्यानुसार वेळेत उपचार सुरू करणे, याला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. नवजात बाळांची स्क्रीनिंग चाचणी करून अशा समस्या शोधल्या जातात, ज्यांसाठी पुढील तपासण्यांची गरज असू शकते. स्क्रीनिंगमध्ये काही समस्या आढळल्यास त्याची खात्री करण्यासाठी अधिक तपासण्या केल्या जातात.
नवजात बाळांच्या रक्ताच्या ठिपक्यांची तपासणी (Newborn Blood-spot Screening) ही एक महत्त्वाची चाचणी आहे. यामध्ये बाळाच्या टाचेतून थोडेसे रक्त घेतले जाते आणि एका विशिष्ट फिल्टर पेपर कार्डवर त्याचे ठिपके लावले जातात. साधारणपणे बाळाच्या जन्मानंतर 24 ते 48 तासांच्या दरम्यान ही चाचणी केली जाते.
या स्क्रीनिंगमध्ये जन्मजात थायरॉईड हार्मोनची कमतरता (Congenital Hypothyroidism), जन्मजात अॅड्रिनल ग्रंथींचे विकार (Congenital Adrenal Hyperplasia), G6PD ची कमतरता, हिमोग्लोबिनशी संबंधित विकार (Hemoglobinopathies) आणि काही आनुवंशिक चयापचयाशी संबंधित विकार (Inherited Metabolic/Organic Acid Disorders) यांची तपासणी केली जाऊ शकते. या चाचणीचा निकाल असामान्य आल्यास पुढील तपासण्या आणि खात्री करण्यासाठीच्या चाचण्या लवकरात लवकर करणे आवश्यक असते.
फक्त कोणती चाचणी केली जाते हेच महत्त्वाचे नसते, तर रक्ताचा नमुना योग्य पद्धतीने घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. रक्ताचे ठिपके योग्य प्रकारे घेतले पाहिजेत, ते लगेच वाळवले पाहिजेत आणि त्यानंतर प्रयोगशाळेत पाठवले पाहिजेत. बाळाचे अचूक वय आणि त्याला दिलेल्या उपचारांची माहिती प्रयोगशाळेला असणे गरजेचे आहे. बाळावर लवकरात लवकर उपचार सुरू करता यावेत आणि त्याच्या अवयवांना पुढील नुकसान होऊ नये, यासाठी डॉक्टर आणि प्रयोगशाळा यांच्यात योग्य समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण असणे आवश्यक आहे.
ज्या नवजात बाळांना रक्तातील साखर कमी होण्याचा (Low Blood Glucose) धोका असतो, त्यांच्यासाठी जन्मानंतरच्या पहिल्या काही तासांपासूनच रक्तातील ग्लुकोजची तपासणी सुरू केली जाते. यामध्ये मुदतपूर्व जन्मलेली बाळे, जन्माच्या वेळी अपेक्षेपेक्षा खूप मोठी किंवा लहान असलेली बाळे आणि ज्या मातांना मधुमेह आहे, अशा मातांच्या पोटी जन्मलेली बाळे यांचा समावेश होतो. काही वेळा बाळामध्ये रक्तातील साखर कमी झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा वेळी तपासणीच्या निकालानुसार बाळाला दूध देण्याबाबत आवश्यक मदत आणि उपचार ठरवले जातात. कोणत्या बाळांची तपासणी करावी आणि किती काळ त्यांच्यावर लक्ष ठेवावे, याबाबत एकच ठरावीक नियम सर्व ठिकाणी लागू असेलच असे नाही. मात्र, निरोगी आणि पूर्ण दिवस भरून जन्मलेल्या प्रत्येक बाळाची वारंवार ग्लुकोज तपासणी करण्याची गरज नसते.
केवळ बाळाच्या त्वचेचा रंग पाहून कावीळ किती गंभीर आहे, हे ठरवता येत नाही. बाळाला कावीळ झाली आहे का आणि तिची तीव्रता किती आहे, हे तपासण्यासाठी त्वचेवर ठेवून तपासणी करणारे उपकरण किंवा रक्ताची चाचणी वापरली जाते. काही परिस्थितींमध्ये रक्ताची तपासणी करणे आवश्यक असते.
बाळाच्या जन्मानंतर 24 ते 48 तासांच्या दरम्यान किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी बिलिरुबिनची तपासणी करण्याची शिफारस केली जाते. 35 आठवडे किंवा त्यानंतर जन्मलेल्या बाळांमध्ये जन्मानंतर 24 ते 48 तासांच्या दरम्यान किंवा डिस्चार्जपूर्वी ही तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. या तपासणीचे रिपोर्ट समजून घेताना बाळाचे वय किती तासांचे आहे, ते किती आठवड्यांचे असताना जन्माला आले आहे आणि इतर कोणते घटक आहेत, यांचाही विचार केला जातो. अधिक मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसाठी नवजात शिशू विभागातील (Neonatal Unit) वेगळ्या तपासणी पद्धती आणि नियम लागू असू शकतात.
पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximetry) या उपकरणाच्या मदतीने बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासली जाते. तसेच जन्मजात हृदयविकारांपैकी काही महत्त्वाचे विकार ओळखण्यासही या तपासणीची मदत होते. ज्या बाळांसाठी ही तपासणी आवश्यक आहे, त्यांच्यामध्ये साधारणपणे जन्मानंतर 24 तासांनी किंवा त्यानंतर ही तपासणी केली जाते. या चाचणीचा निकाल सामान्य नसेल तर पुढील तपासण्या करणे आवश्यक असते. मात्र, निकाल सामान्य आला म्हणजे बाळाला कोणताही हृदयविकार नाही, असे निश्चितपणे म्हणता येत नाही. कारण या तपासणीमधून सर्व प्रकारचे हृदयविकार ओळखता येत नाहीत. बाळाची ऐकण्याची क्षमता तपासण्यासाठी ओटोअकौस्टिक एमिशन्स (Otoacoustic Emissions) आणि ऑटोमेटेड हिअरिंग ब्रेनस्टेम रिस्पॉन्स (Automated Hearing Brainstem Response) या चाचण्या केल्या जातात. शक्यतो बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी या चाचण्या केल्या जातात. साधारणपणे डिस्चार्जनंतर पहिल्या एक महिन्याच्या आत बाळाची ऐकण्याची क्षमता तपासण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते.
बाळाला दूध नीट पिता येत नसेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा शरीराचे तापमान स्थिर राहत नसेल, तर संसर्ग झाला आहे का हे तपासण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागू शकतात. रक्तातील जिवाणूंची उपस्थिती तपासण्यासाठी ब्लड कल्चर (Blood Culture) ही चाचणी केली जाते. इतर काही रक्ताच्या चाचण्याही संसर्गाचे मूल्यांकन करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. मात्र, केवळ या चाचण्यांच्या आधारे बाळाला सेप्सिस (Sepsis) आहे किंवा नाही, हे निश्चित करता येत नाही. गरज असल्यास अँटिबायोटिक्स सुरू करण्यापूर्वी रक्ताचा नमुना घेऊन कल्चर करणे योग्य असते. मात्र, बाळाची प्रकृती गंभीर असल्यास तातडीने उपचार सुरू करण्यास या चाचणीमुळे कोणताही अडथळा येऊ नये. या तपासण्या प्रत्येक नवजात बाळासाठी नियमितपणे केल्या जात नाहीत. बाळाची लक्षणे आणि संसर्गाचा धोका लक्षात घेऊन डॉक्टर या चाचण्या करण्याचा निर्णय घेतात.
फॉलो-अपमुळे स्क्रीनिंगची प्रक्रिया पूर्ण होते बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पालकांना कोणत्या चाचण्या केल्या आहेत, कोणत्या चाचण्यांचे रिपोर्ट अजून येणे बाकी आहे, रिपोर्टबाबत पालकांना कोण माहिती देणार आहे आणि पुन्हा रक्ताचा नमुना देण्याची गरज आहे का, याची स्पष्ट माहिती दिली पाहिजे.रक्ताच्या ठिपक्यांद्वारे केल्या जाणाऱ्या स्क्रीनिंगचे रिपोर्ट येण्यासाठी काही वेळा 72 तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे केवळ रक्ताचा नमुना घेणे म्हणजे स्क्रीनिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असे नाही. वेळेत रिपोर्ट मिळणे, आवश्यक असल्यास खात्री करण्यासाठीच्या चाचण्या करणे आणि त्यानुसार उपचार सुरू करणे या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
भारतात नवजात बाळांची स्क्रीनिंग चाचणी हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मात्र, देशातील अनेक भागांमध्ये अजूनही या चाचण्यांची अंमलबजावणी मर्यादित आणि असमान स्वरूपात होत आहे. जन्मजात आणि आनुवंशिक आजार वेळेत ओळखता यावेत, योग्य वेळी उपचार सुरू करता यावेत आणि टाळता येण्यासारखे आजार, अपंगत्व तसेच मृत्यू यांचे प्रमाण कमी करता यावे, यासाठी प्रत्येक नवजात बाळाची सार्वत्रिक स्क्रीनिंग (Universal Newborn Screening) करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.