(फोटो सौजन्य-AI एआय) 
भंडारा

Bhandara News: अन् 'त्या' शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडली, साडेचार एकरांतील धान करपले आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही डोक्यावर… भंडाऱ्यातील शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या 5 दिवसांत घडलेल्या या घटनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

Atharva Rajopadhye
  • धोप येथील शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी पालकमंत्र्यांसमोर 3 ऑक्टोबर रोजी आर्थिक अडचणी मांडल्या होत्या.
  • साडेचार एकरांतील धानपीक पाण्याअभावी करपल्याने शेतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता.
  • शेतकऱ्याच्या मृत्यूने दुष्काळ, सिंचन, पीक नुकसानभरपाई आणि आर्थिक मदतीचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले.

मोहाडी. 'शेतीत पीक नाही, हातात पैसा नाही... मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा?' या विवंचनेत असलेल्या धोप येथील शेतकरी राजेंद्र अमर सपाटे (५५) यांनी काही दिवसांपूर्वी आपली व्यथा थेट पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासमोर मांडली होती. दुष्काळाने साडेचार एकरांतील धान करपले होते. पशुपालनाचा खर्च होता. मुलगा अकोला येथे, तर मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत होती. घरखर्च आणि शिक्षणाचा भार डोक्यावर होता. मदतीची आस होती. आपल्या अडचणी मांडल्यानंतर परिस्थितीत काहीतरी बदल होईल, अशी अपेक्षा असतानाच अवघ्या पाच दिवसांनी गुरूवारी पहाटे त्यांनी जीवन संपविले.

'साहेब, आता आत्महत्या करण्याची वेळ आली...' : ३ ऑक्टोबर. पालकमंत्री डॉ. भोयर यांचा दुष्काळ पाहणी दौरा. परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असताना सपाटे यांनी पुढे येत आपली व्यथा मांडली. साडेचार एकरांतील धान पाण्याअभावी करपले. शेतीत पैसा उरला नाही. जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाढला. दूध उत्पादनही घटले. त्यात मुलगा आणि मुलगी शिक्षणासाठी घरापासून दूर. दरमहा त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पाठवावे लागतात. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, हा प्रश्न त्यांनी मांडला. परिस्थिती अशीच राहिली तर आत्महत्या करण्याची वेळ येईल.

यंदा धानाची लागवड केली; पण पावसाने साथ सोडली. शेतीला पाणी देणाऱ्या तलावात पुरेसा साठा नव्हता. पिकाची वाढ खुंटली आणि उभे धान डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ आली. शेतीचा खर्च मात्र कमी झाला नाही. मशागतीची साधने, मजुरी, खते आणि अन्य निविष्ठांच्या वाढत्या खर्चाने कंबरडे मोडले. शेतीला जोडधंदा असलेल्या पशुपालनातूनही अपेक्षित आधार मिळत नव्हता. अशा परिस्थितीत वर्षभराच्या उत्पन्नाचा आधार असलेले पीक हातातून निसटले. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाचा ताण आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च या सगळ्या चिंता एकवटत गेल्या.

धान करपले... आशा, अपेक्षांवर फेरले पाणी

पहाटे आली काळीज पिळवटून टाकणारी बातमी आजची पहाट धोपकरांसाठी नेहमीसारखी उगवली नाही. सपाटे यांनी शेतातील खासगी विहिरीत उडी घेतल्याची बातमी गावात पसरली आणि काही क्षणांतच गावावर शोककळा पसरली. ज्याने काही दिवसांपूर्वी आपली व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडली होती, तोच शेतकरी आता या जगात नव्हता. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच गावात अस्वस्थता घोधावत आहे.

एक मृत्यू... अनेक प्रश्न : राजेंद्र सपाटे यांच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा समोर आणले आहे. पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत घडलेली ही घटना ग्रामस्थांच्या मनाला चटका लावून गेली आहे. 'शेतकरी बोलतो तेव्हा त्याची व्यथा ऐकली जाण्यापेक्षा त्यावर वेळीच कृती झाली पाहिजे. शासनाने आता पाऊल उचलले नाही, तर अशा घटना थांबणार कशा?' हा सवाल शेतकऱ्यांच्या मनात्त धुमसत आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका