खरीप हंगाम संपला अन् हाताला काम उरले नाही
चंद्रपूरमधील मजुरांचे तेलंगणाकडे स्थलांतर
शेतीची कामे संपताच मजुरांची भटकंती सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर आणि पोंभुर्णा या धान उत्पादक तालुक्यांमध्ये खरीप हंगाम संपताच शेतमजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. धान कापणी, मळणी आणि इतर शेतीकामे आटोपल्यानंतर गावात हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागत असून, अनेकांनी थेट तेलंगणातील मिरची उत्पादक भागांकडे धाव घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
धान उत्पादक पट्टयात खरीप हंगाम हा शेतमजुरांसाठी रोजगाराचा प्रमुख आधार असतो. रोवणीपासून निंदणी, कापणी आणि मळणीपर्यंतच्या कामांमुळे अनेक कुटुंबांना चार ते पाच महिने स्थानिक पातळीवर रोजगार मिळतो. मात्र, हंगाम संपल्यानंतर शेतीची कामे कमी होतात. परिणामी, ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम उरत नाही. (फोटो सौजन्य – AI Created)
दुसरीकडे, वाढती महागाई, मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि दैनंदिन गरजा यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत अनेक मजूर कुटुंबांनी रोजगारासाठी स्थलांतराचा मार्ग स्वीकारला आहे. विशेषतः तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातील विविध भागांत मिरची तोडणीचा हंगाम सुरू होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर तेथे जाण्यास प्राधान्य देत आहेत. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबेही गाव सोडत असल्याचे चित्र दिसत आहे. मिरची तोडणीच्या कामातून काही महिन्यांचा रोजगार मिळत असल्याने मजुरांसाठी हा एक पर्याय ठरत आहे. मात्र, परराज्यात जाऊन काम करावे लागत असल्याने प्रवासाचा खर्च, राहण्याची व्यवस्था, जेवण आणि आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागतो.
ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध होणे अपेक्षित असताना अनेक गावांमध्ये मजुरांना कामाची प्रतीक्षा करावी लागत आहे. गावातच रोजगार उपलब्ध झाल्यास परराज्यात जाण्याची वेळ येणार नाही, अशी भावना मजूर व्यक्त करीत आहेत. ग्रामपंचायतींनी रोजगार हमीची कामे सुरू करावीत, तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
धान कापणी आणि मळणीची कामे संपल्यानंतर गावात रोजगार मिळत नाही. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा भागवायच्या असतात. त्यामुळे नाइलाजाने तेलंगाणात मिरची तोडणीसाठी जावे लागते. गावातच वर्षभर काम मिळाले तर परराज्यात जाण्याची वेळ येणार नाही.-वर्षा वासेकर, महिला शेतमजूर, ता. मूल
खरीप हंगामात शेतीची कामे मिळतात; मात्र त्यानंतर दोन-तीन महिने हाताला काम नसते. रोजगार हमीची कामेही नियमित मिळत नाहीत, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तेलंगणात जाऊन मजुरी करावी लागते. शासनाने गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा. - सुभाष शेंडे, मजूर, ता. सिंदेवाही