६५० खाटांचे रुग्णालय, पण सुविधा अपुऱ्या!
चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या स्थलांतराला पाणी अडथळा
चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजची नवी इमारत ११ वर्षांपासून प्रतीक्षेत
चंद्रपूर: जिल्ह्याला मोठ्या प्रयत्नांनंतर मिळालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अकरा वर्षांचा कालावधी उलटूनही स्वतःच्या नवीन इमारतीत स्थलांतर करता आलेले नाही. बल्लारपूर बायपास मार्गावरील १०० एकर जागेवर उभारण्यात आलेल्या सहा मजली इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असले, तरी पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे स्थलांतराचा प्रश्न कायम आहे. परिणामी, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा कारभार आजही अपुऱ्या जागेतूनच सुरू आहे. दरवर्षी अडीच ते तीन लाख रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असताना उपलब्ध सुविधांवर मोठा ताण पडत आहे.
चंद्रपूर हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. कोळसा, वीज, सिमेंट, कागद, पोलाद आणि स्पंज आयर्न यांसारख्या मोठ्या उद्योगांसह अनेक मध्यम व लघुउद्योग येथे कार्यरत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनांची वाहतूक, वाढते रस्ते अपघात तसेच प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची गरज आहे. मात्र, गंभीर रुग्णांना आजही पुढील उपचारांसाठी नागपूर किंवा हैदराबाद येथे जावे लागते. ही गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने २०१५ मध्ये चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी बल्लारपूर बायपास मार्गावर १०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. (फोटो सौजन्य – AI Created)
नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह महाविद्यालय सुरू करण्यात आले. यासाठी रामनगर येथील महिला रुग्णालय आणि क्षयरोग रुग्णालय परिसरातील इमारतींचा वापर करण्यात आला. मात्र, अकरा वर्षांनंतरही तात्पुरत्या व्यवस्थेतून कायमस्वरूपी इमारतीत जाण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. उपलब्ध माहितीनुसार, रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दरवर्षी अडीच ते तीन लाख रुग्ण तपासणीसाठी येतात. तर ६० हजारांहून अधिक रुग्णांना दरवर्षी दाखल करून उपचार द्यावे लागतात. एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अपुरी जागा, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची कमतरता आणि पायाभूत सुविधांवरील मर्यादा यांचा परिणाम आरोग्यसेवेवर होत आहे.
औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ बांधकाम पूर्ण करून चालणार नाही, तर पाणीपुरवठा, वीज, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक मनुष्यबळ आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
बल्लारपूर बायपास परिसरात सुमारे १ लाख ३२ हजार १०३ चौरस मीटर क्षेत्रफळावर सहा मजली नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प अकरा वर्षांनंतरही पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी नवीन परिसरात पुरेशा पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने स्थलांतर रखडले आहे. त्यामुळे कोट्यवधींची इमारत उभी असतानाही तिचा प्रत्यक्ष वापर सुरू होऊ शकलेला नाही.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचा परिसर आणि इमारती वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्यात आल्या. पूर्वी ३५० खाटांची क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर ६५० खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाले. आरोग्य संचालनालयाच्या अखत्यारीतील हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे हस्तांतरित करण्यात आले. मात्र, वाढती रुग्णसंख्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आणि उपचारांची गरज पाहता सध्याची जागा व उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत आहेत.