मुंबई - शिवसेना गृहमंत्र्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. अशातच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Mimister Dilip Valase Patil) यांनी आज मुख्यमंत्र्याचीसुद्धा (CM Uddhav Thackeray)भेट घेतली होती. यावरूनही अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र याबाबत स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असल्याचं वृत्त चुकीचं आणि विपर्यास करणारं असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. यात म्हटलं आहे की, गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी गृहखात्याने अधिक सक्षम होण्याची गरज व्यक्त करून गृहखात्यावर बोट ठेवलं आहे. त्यामुळे गृहखात्याच्या कामकाजावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही पक्षातील या बेबनावाच्या चर्चा सुरू असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत तासभर चर्चा झाली. भाजप नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, राऊत यांनी गृहमंत्रालयाला सक्षम बनण्याचा सल्ला दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मात्र, या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) उत्तम काम करत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांची पाठराखण केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. येणाऱ्या काळात भाजप नेत्यांवर कारवाई करण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले का अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.