कल्याण - कल्याण पश्चिमेत टावरीपाडा येथे घरगुती सिलिंडरमधून (Domestic Cylinder) वायू गळती (Gas Leakage) झाल्याची घटना घडली. यावेळी लागलेल्या आगीत एका इमारतीतील फ्लॅटमधील दोन जखमी झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली.
टावरीपाडा (Tawripada) येथे सर्वोदय हाईट या इमारतीमधील पहिल्या माळ्यावर फ्लॅटमध्ये वायू गळतीमुळे लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या. संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास दुर्घटना घडली. सुखविंदर कौर आणि कलवंत कौर अशी जखमी महिलांची नाव असून दोघी सासू-सूना आहेत. विशेष म्हणजे या आगीच्या घटनेत माजी फोर्स वन कमांडोने (Force One Commando) दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे (Incomparable Bravery) घरातील सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा जीव वाचला आहे.
मुंबई पोलीस दलातील माजी फोर्स वन कमांडो दीपक नाथा घरत हे मुलाला घरी घेऊन चालले होते. आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आग लागलेल्या घराकडे मदतीसाठी धाव घेतली. तसेच, या इमारतीच्या रंगकामासाठी रस्त्यालगत बांधलेल्या स्टेजिंगच्या सहाय्याने ते वर चढून गेले आणि आग लागलेल्या घराच्या बाल्कनीतून अडकलेल्यांना बाहेर काढले. यावेळी घरत यांना परिसरातील नागरिकांनीही मदत केली. दरम्यान या दुर्घटनेत सहा महिन्यांच्या बाळाला काहीही इजा झाली नसली तरी दोन्ही महिला काही प्रमाणात भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. तरस गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी वायू गळती थांबवली.