पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास; भरती परीक्षांसाठी सरकारचा कठोर ॲक्शन प्लॅन  पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास; भरती परीक्षांसाठी सरकारचा कठोर ॲक्शन प्लॅन
महाराष्ट्र

Maharashtra Recruitment Exam: पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास; भरती परीक्षांसाठी सरकारचा कठोर ॲक्शन प्लॅन

Maharashtra Recruitment Exam: महाराष्ट्रातील भरती परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये संघटित पेपरफुटी प्रकरणांत दोषींना ७ ते १० वर्षे कारावास, किमान १० कोटी रुपये दंड आणि मालमत्ता जप्तीची शिफारस करण्यात आली आहे. MPSC उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क परतावा, आधार आधारित नोंदणी आणि परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक सुधारणा करण्याचाही प्रस्ताव आहे.

श्वेता झगडे
  • पेपर फोडणाऱ्यांना १० कोटींचा दंड

  • १० वर्षे कारावास

  • भरती प्रक्रियेत मोठे बदल होणार

Maharashtra Recruitment Exam: राज्यातील सरकारी भरती परीक्षांमध्ये होणारी पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासोबतच परीक्षेच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने या आराखड्यात महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. यानुसार पेपरफुटीच्या संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांपर्यंत कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे.(Maharashtra Recruitment Exam)

पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड

भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीचे प्रकार घडवून आणणाऱ्या टोळ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे. संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती तसेच संस्थांना ७ ते १० वर्षे कारावास आणि किमान १० कोटी रुपये दंडाची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही सुचवण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्तींनाही कठोर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. अशा प्रकरणांमध्ये ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची शिफारस आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थांना ५ कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यासह आठ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव आहे.

विशेष तपास पथक आणि जलदगती न्यायालये

पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणांचा तपास अधिक प्रभावी आणि वेगाने व्हावा, यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांचा तपास थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. याशिवाय पेपरफुटी आणि भरती परीक्षांमधील गैरप्रकारांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या प्रलंबित असलेली प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यावरही भर देण्यात आला आहे.

MPSC उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क परताव्याची शिफारस

या कृती आराखड्यात केवळ गैरप्रकार करणाऱ्यांवरील कारवाईच नव्हे, तर प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणाऱ्या तरतुदींचाही समावेश आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेबाबत उमेदवाराने नोंदवलेली हरकत योग्य ठरल्यास त्याने भरलेले हरकत शुल्कही परत देण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल.

ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे परीक्षा वेळापत्रक

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियोजन करता यावे, यासाठी पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत जाहीर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षांच्या संभाव्य तारखा आधीच समजतील आणि अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होईल. परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक सुधारणा करण्यासाठी आधार आधारित एकवेळ नोंदणी सुविधा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. यामुळे उमेदवारांची ओळख पडताळणी आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होईल.

MPSC मुख्यालयापासून परीक्षा केंद्रांपर्यंत त्रिस्तरीय नियंत्रण व्यवस्था

परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी MPSC मुख्यालय, जिल्हा स्तर आणि परीक्षा केंद्रांवर त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे परीक्षा प्रक्रियेवर विविध स्तरांवर देखरेख ठेवता येईल. तसेच संशयास्पद हालचाली आणि गैरप्रकार वेळीच ओळखून त्यावर तातडीने कारवाई करणे शक्य होईल. एकूणच, पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांपासून परीक्षा प्रक्रियेत सहभागी संस्थांपर्यंत सर्वांवर कठोर कारवाई करण्याचा या कृती आराखड्याचा उद्देश आहे. या शिफारसींची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक; गाडी झाली पलटी

भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार; भारत शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करणार

JEE NEET Update: कोचिंग क्लासेसना बसणार चाप! पुन्हा एकदा १२ वीच्या मार्क्सवर ठरणार विद्यार्थ्यांची रँक?

मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर Prasad Oakची Bollywoodमध्ये झेप! हिंदी सिनेमात करणार दमदार एन्ट्री; चित्रपटाचं नाव काय?

Jio चा धमाका! कंपनीने लाँच केली Happy New Year Offer... अनलिमिटेड 4G आणि 5G डेटासह मिळणार धमाकेदार फायदे