इलेक्ट्रिक बसमुळे एसटी आर्थिक संकटात; प्रतिकिलोमीटर २० ते २५ रुपये अनुदान द्या, अन्यथा प्रकल्प बंद करा!  
महाराष्ट्र

MSRTC Electric Bus Project: इलेक्ट्रिक बसमुळे एसटी आर्थिक संकटात; प्रतिकिलोमीटर २० ते २५ रुपये अनुदान द्या, अन्यथा प्रकल्प बंद करा!

MSRTC Electric Bus Project: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस प्रकल्पामुळे ऑक्टोबर २०२६ पर्यंत १६८ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने एसटीला प्रतिकिलोमीटर २० ते २५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

श्वेता झगडे
  • एसटीच्या इलेक्ट्रिक बस प्रकल्पामुळे १६८ कोटींचा तोटा

  • गुजरात-यूपीनुसार महाराष्ट्रालाही अनुदान द्या

  • कर्मचारी काँग्रेसची मागणी

MSRTC Electric Bus Project: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस प्रकल्पावरून आता कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. इलेक्ट्रिक बसच्या संचालनामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, ऑक्टोबर २०२६ पर्यंत हा तोटा १६८ कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे गुजरात आणि उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने एसटीला प्रतिकिलोमीटर २० ते २५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. (MSRTC Electric Bus Project)

या मागणीसाठी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक बस प्रकल्पामुळे होणारा आर्थिक तोटा सरकारने भरून द्यावा किंवा हा प्रकल्प बंद करावा, अशी भूमिका संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी गुरुवारी मांडली.

प्रतिकिलोमीटर १६ रुपयांचा तोटा

एसटीच्या इलेक्ट्रिक बसमुळे सरासरी प्रतिकिलोमीटर १६ रुपयांचा तोटा होत असल्याचे बरगे यांनी सांगितले. ऑक्टोबर २०२६ पर्यंत या प्रकल्पामुळे एसटीचे १६८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा संघटनेचा दावा आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रिक बसचे संचालन आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडून प्रतिकिलोमीटर सरासरी २० ते २५ रुपये आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र सरकारनेही त्याच धर्तीवर आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणावरच प्रश्नचिन्ह

केंद्र आणि राज्य सरकारकडून पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र सरकारचेही २०४७ पर्यंत रस्त्यांवर पर्यावरणपूरक वाहने आणण्याचे धोरण आहे. मात्र, इलेक्ट्रिक बसच्या संचालनामुळे होणारा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी व्यवहार्यता तफावत निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे असताना सरकार स्वतःच्याच धोरणापासून मागे हटत असल्याचा आरोप श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

बस पुरवठ्याचे उद्दिष्टही अपूर्ण

१३ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाण्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी मे २०२५ पर्यंत १,२८८ इलेक्ट्रिक बस आणि मे २०२६ पर्यंत एकूण ५,१५० इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.

मात्र, नोव्हेंबर २०२६ पर्यंत एसटीच्या ताफ्यात केवळ १,३०० इलेक्ट्रिक बस दाखल झाल्याचे बरगे यांनी सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बस पुरवठादार कंपनीसोबत बैठक घेऊन सुधारित वेळापत्रक निश्चित केले होते. तरीही अपेक्षित संख्येने बसचा पुरवठा झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम?

इलेक्ट्रिक बस प्रकल्पामुळे एसटीच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून, दैनंदिन कामकाजासाठी निधीची कमतरता भासत असल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि वेतनवाढीच्या फरकाच्या देयकांवरही होत असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सरकारने इलेक्ट्रिक बस प्रकल्प रद्द करून एसटी महामंडळाला स्वमालकीच्या बस खरेदी करण्याची परवानगी द्यावी किंवा या प्रकल्पामुळे झालेल्या संपूर्ण आर्थिक नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारने या मागणीवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बस प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेचा आणि एसटीच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांना गती; स्थायी समितीच्या बैठकीत विविध प्रस्तावांवर शिक्कामोर्तब

OPEC : अमेरिका 'ओपेक'ला संपवून टाकणार? तेल उत्पादक देशांमध्ये मोठी उलथापालथ; पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होणार परिणाम

Tariff: 'भारताने राजनैतिक चर्चा करावी, मात्र...'; नव्या टॅरिफ युद्धावरून डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भाष्य

Gig Workers Social Security Pension : डिसेंबरमध्ये होणार मोठी घोषणा!15 लाख डिलिव्हरी बॉय, कॅब ड्रायव्हर्सना मिळणार गिफ्ट

Mohammad Siraj : विश्वास ठेवणं कठिण, तरी त्याला पुन्हा बाहेर केलं; सिराजला जागा न मिळल्यानं माजी भारतीय क्रिकेटर्स नाराज