फोटो सौजन्य AI  फोटो सौजन्य AI
नागपूर

Nagpur News : खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार लगाम; हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय आस्थापना विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार वैद्यकीय आस्थापना विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित कायद्यानुसार आपत्कालीन उपचार, तीन भाषांमध्ये दरपत्रक, रुग्णांना वैद्यकीय कागदपत्रे आणि जिल्हास्तरावर रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Chaitanya Pisal
  • आपत्कालीन उपचार नाकारता येणार नाहीत; रुग्णांना मिळणार कायदेशीर अधिकार

  • रुग्णालयांमध्ये तीन भाषांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक

  • प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र प्राधिकरण; नियम मोडणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

राज्यातील खासगी रुग्णालयांकडून होणारी मनमानी आणि रुग्णांची आर्थिक लूट रोखण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. रुग्णांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी वैद्यकीय आस्थापना कायदा विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडून मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हा कायदा लागू झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयांना पैशांची मागणी न करता रुग्णावर तातडीने प्राथमिक उपचार करणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे राज्यातील खासगी आरोग्यसेवेवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

आपत्कालीन उपचार नाकारता येणार नाहीत; रुग्णांना मिळणार कायदेशीर अधिकार

प्रस्तावित कायद्यानुसार कोणत्याही रुग्णालयाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची मागणी करून प्राथमिक उपचार रोखता येणार नाहीत. रुग्णांना त्यांच्या आजाराचे निदान, उपचारांची पद्धत, अपेक्षित खर्च आणि उपचारांशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवण्याचा अधिकार असेल. याशिवाय रुग्णांना केसपेपर, वैद्यकीय कागदपत्रे आणि उपचारांचा तपशील मिळवता येणार आहे.

उपचारांबाबत दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मत घेण्याचाही अधिकार या कायद्याद्वारे निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना उपचारांबाबत अधिक पारदर्शकता मिळण्याची अपेक्षा आहे.

रुग्णालयांमध्ये तीन भाषांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक

प्रस्तावित विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदींनुसार प्रत्येक रुग्णालयाला उपचार, वैद्यकीय तपासण्या आणि इतर सेवांचे दरपत्रक प्रदर्शित करावे लागणार आहे. हे दरपत्रक मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल. तसेच रुग्णालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरही दरपत्रक प्रसिद्ध करावे लागणार आहे.

अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, योग आणि निसर्गोपचार पद्धतींशी संबंधित खासगी, धर्मादाय आणि स्वायत्त रुग्णालयांचा या कायद्याच्या कक्षेत समावेश असेल. नर्सिंग होम, क्लिनिक, डे-केअर सेंटर, निदान केंद्रे आणि पॅथॉलॉजी प्रयोगशाळांनाही नियम लागू होतील.

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र प्राधिकरण; नियम मोडणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नोंदणी प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या प्राधिकरणाला रुग्णालयांची नोंदणी रद्द करणे, निलंबित करणे आणि आर्थिक दंड ठोठावण्याचे अधिकार असतील. राज्यातील आरोग्यसेवेचे नियमन करण्यासाठी राज्य वैद्यकीय आस्थापना परिषदेचीही स्थापना करण्यात येणार आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यापूर्वी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले होते. मात्र, काही तरतुदींवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद झाल्याने ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले. समितीने विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. आता हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Sheikh Hasina : शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार? दिल्लीतून ढाक्याला जाण्यासाठी केली सरकारी विमानाची मागणी

Bisleri Success Story : 'बिसलेरी' कसा बनला भारतातील सर्वात मोठा ब्रँड? अवघ्या 4 लाखांत खरेदी केलेली कंपनी आज अब्जावधींची; काय आहे कमाल कहाणी ?

WhatsApp Tips: खासगी चॅट्सच्या प्रायव्हसीबाबत चिंता? असे सेट करा फिंगरप्रिंट लॉक, सोपी आहे प्रोसेस

Virar Papadkhind Dam : 'पापडखिंड'ची सुरक्षा वाऱ्यावर! लोकप्रतिनिधी, आयुक्तांसमोर पाण्यात छठपूजा; धरणात दुचाकी - रिक्षा धुण्याचे प्रकार वाढले

WhatsApp Web वापरणाऱ्यांनो सावधान! अनोळखी डिव्हाइसवर लॉगिन केल्यास होऊ शकते मोठे नुकसान, गृह मंत्रालयाने दिला इशारा