Chhatrapati Sugar Factory : छत्रपती कारखान्याचा उसाला आता प्रतिटन 3701 रुपयांचा दर; सुरुवातीला 3501 रुपये, तर उर्वरित 200 रुपये दिवाळीत देणार फोटो सौजन्य : चॅट जीपीटी
पुणे

Chhatrapati Sugar Factory : छत्रपती कारखान्याचा उसाला आता प्रतिटन 3701 रुपयांचा दर; सुरुवातीला 3501 रुपये, तर उर्वरित 200 रुपये दिवाळीत देणार

छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी उसाचा दर प्रतिटन 3701 रुपये जाहीर केला आहे. सुरुवातीला 3501 रुपये, तर वाढीव 200 रुपये दिवाळीत दिले जाणार आहेत. कारखान्याने एका दिवसात 9 हजार 564 मेट्रिक टन गाळपाचा विक्रमही केला.

Rakesh Khedekar
  • संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

  • गेटकेनधारकांनाही मिळणार फायदा

  • गाळपातही विक्रमी कामगिरी

Chhatrapati Sugar Factory : छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा देत उसाला प्रतिटन 3701 रुपये सुधारित दर जाहीर केला आहे. यापूर्वी कारखान्याने प्रतिटन 3501 रुपये दर जाहीर केला होता. मात्र, आता त्यामध्ये 200 रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांनी ही माहिती दिली.

या निर्णयानुसार, ऊस उत्पादकांना सुरुवातीला प्रतिटन 3501 रुपये दिले जाणार असून, वाढीव 200 रुपये दिवाळीच्या काळात अदा करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या सुधारित दराचा लाभ कारखान्याच्या सभासद ऊस उत्पादकांसह गेटकेनधारकांनाही मिळणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, राज्यातील उच्चांकी ऊसदर देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांच्या यादीत छत्रपती कारखान्याचे नाव अग्रक्रमाने येण्याची शक्यता आहे.

गाळपातही विक्रमी कामगिरी

दरम्यान, ऊसदरात वाढ करण्याबरोबरच कारखान्याने गाळपातही विक्रमी कामगिरी केली आहे. कारखान्याने एका दिवसात तब्बल 9 हजार 564 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. कारखान्याच्या स्थापनेपासून एका दिवसात झालेले हे सर्वाधिक गाळप ठरले आहे. चालू हंगामात आतापर्यंत कारखान्याने 3 लाख 84 हजार 55 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.

चालू हंगामासाठी कारखान्याने सूक्ष्म नियोजन आणि यंत्रणेतील समन्वयावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे हंगाम सुरू झाल्यापासून कोणताही मोठा तांत्रिक बिघाड न होता गाळप प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. ऊसतोडणी, वाहतूक, गाळप आणि कारखान्यातील यंत्रणेचे योग्य नियोजन केल्याने विक्रमी गाळपाचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.

गाळपात सातत्य राखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

ऊस उत्पादकांना सुधारित दर देण्याचा निर्णय आणि त्याचवेळी गाळपाचा नवा विक्रम या दोन्ही बाबींमुळे छत्रपती कारखान्याने चालू हंगामात आपली कामगिरी ठळकपणे अधोरेखित केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासोबतच कार्यक्षम व्यवस्थापनातून गाळपात सातत्य राखण्याचा कारखाना प्रशासनाचा प्रयत्न या निमित्ताने दिसून येत आहे.

दरम्यान या बैठकीस यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर, संचालक कैलास गावडे, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर,पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, निलेश टिळेकर,संतोष मासाळ, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ.योगेश पाटील, तानाजी शिंदे, हणमंत घोळवे, सत्यवान चव्हाण, कार्यकारी संचालक अशोक जाधव उपस्थित होते.

kamathipura: कामाठीपुरा बदलणार! पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग, नोंदणी केंद्र सुरू

IND vs NZ: आधी संघाला सावरले, मग इतिहास घडवला! ५० व्या कसोटीत Tom Blundellचा धमाका; भारताविरुद्ध झळकावले ऐतिहासिक अर्धशतक

IFFI Gala Premiere : IFFI 2026 मध्ये मराठी चित्रपटाचा डंका; ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

Shevgaon Water Issue : शेवगावच्या हक्काचा एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही! ​ॲड. शिवाजीराव काकडेंचा प्रशासनाला खणखणीत इशारा

Colgate Visible White Purple : जाहिरातींऐवजी आता थेट ड्रामा सिरीज! कोलगेट व्हिजिबल व्हाइट पर्पलची ६ भागांची मायक्रो-ड्रामा सिरीज लाँच