जयकुमार गोरेंचा देसाईंना थेट टोला
जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराचा इशारा
महायुती धर्म न पाळल्याचा आरोप
Satara News: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आणि पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील शाब्दिक संघर्ष सुरूच आहे. ‘मी लढणारा आहे, रडणारा नाही. युती केली नसती तर अर्जुन काळे यांच्याप्रमाणे आमचेही सात संचालक निवडून आले असते, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही,’ असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना लगावला. तसेच जिल्हा बँकेतील सॉफ्टवेअर आणि लॅपटॉप खरेदीतील कथित गैरव्यवहार बाहेर काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर मंत्री गोरे यांनी ‘दम होता तर समोरासमोर लढायचे होते,’ असे वक्तव्य केले होते. त्यावर पालकमंत्री देसाई यांनीही जिल्हास्तरावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सात संचालक निवडून आल्याचे सांगत आपली भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री गोरे म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक झाली आहे. आता वाद घालायला आम्हाला वेळ नाही. मी इतका छोटा नाही. माझ्यात लढण्याची धमक आहे. जी परिस्थिती निर्माण झाली ती मी स्वीकारली आहे. मला लढायची सवय आहे आणि लढूनच मी बरेच काही मिळवले आहे.
निवडणुकीदरम्यान माझ्या नेतृत्वाने ज्या सूचना केल्या, त्यांची मी अंमलबजावणी केली. नेतृत्वाने थांबण्यास सांगितले तेव्हा थांबलो आणि महायुती करण्यास सांगितले तेव्हा युती केली. मात्र, युती केली नसती तर अर्जुन काळे यांच्याप्रमाणे आमचे सात संचालक निवडून आले असते, असा दावा त्यांनी केला. देसाई हे त्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या सात जागा निवडून आल्याचे सांगत आहेत. मात्र, महायुतीचा धर्म न पाळता अर्जुन काळे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे शंभूराज देसाई यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला शोभते का? असा सवालही मंत्री गोरे यांनी उपस्थित केला.
जिल्हा बँक आता आपल्या ताब्यात असून, बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. बँकेत यापूर्वी कोणते गैरव्यवहार झाले आहेत, ते बाहेर काढले जातील. १०० कोटी रुपयांचे सॉफ्टवेअर नेमके कुठे आहे आणि १०० कोटी रुपयांची लॅपटॉप खरेदी नेमकी कशी झाली, याची माहिती घेतली जाईल. बँकेतील अनेक बाबींची तपासणी करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोणता टोला लगावला आहे?
"मी लढणारा आहे, रडणारा नाही. महायुती केली नसती तर अर्जुन काळे यांच्याप्रमाणे आमचेही सात संचालक निवडून आले असते, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही," असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाईंना लगावला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत जयकुमार गोरे यांनी कोणता इशारा दिला आहे?
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सॉफ्टवेअर आणि लॅपटॉप खरेदीत झालेला कथित गैरव्यवहार बाहेर काढण्याचा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
अर्जुन काळे यांच्या संदर्भात मंत्री गोरे यांनी काय आरोप केला आहे?
महायुतीचा धर्म न पाळता अर्जुन काळे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि हे शंभूराज देसाई यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला शोभणारे नाही, असा आरोप मंत्री गोरे यांनी केला आहे.