१९ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर असगरभाई वोरांच्या नावे झाली जमीन
सातबाऱ्यावर भोगवटादार म्हणून नोंद!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालमित्राने सप्टेंबरमध्ये घेतली होती भेट
विजय काते, भाईंदर : तब्बल १९ वर्षांच्या कायदेशीर आणि प्रशासकीय संघर्षानंतर मिरारोड येथील मौजे नवघर परिसरातील २ हजार ८१० चौ.मी. जमिनीवर असगरभाई वोरा यांचा हक्क महसूल विभागाच्या नोंदीत पुन्हा प्रस्थापित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालमित्र असलेल्या असगरभाई वोरा यांची भोगवटादार म्हणून सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याचा फेरफार महसूल विभागाने २७ नोव्हेंबर रोजी मंजूर केला. या निर्णयामुळे २००७ मध्ये सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यात आलेले वोरांचे नाव तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा नोंदवण्यात आले आहे.(Land Ownership Dispute)
मिरारोडच्या इंद्रलोक फेज-६ परिसरातील मौजे नवघर येथील सर्वे क्रमांक १८५/६ मधील २ हजार ८१० चौ.मी. जमीन असगरभाई आणि दाऊद वोरा यांनी १९८९ मध्ये रीतसर नोंदणीकृत खरेदी कराराद्वारे विकत घेतली होती. त्यानंतर २००७ मध्ये सातबारा उताऱ्यावर दोघांची नावे फेरफाराद्वारे नोंदवण्यात आली. मात्र, त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात पॉल अंतोनी फर्नांडिस यांच्या वारस तपासाचे आदेश झाले असताना, वारस तपास करण्याऐवजी वोरा यांची सातबारा उताऱ्यावरील नोंदच रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे, १९८९ च्या खरेदी करारनाम्यावर जमीन विक्रीसाठी पॉल यांचीही संमती आणि स्वाक्षरी होती.
दरम्यान, २०१४ मध्ये मेरवीन जोसेफ फर्नांडिस यांनी पॉल आणि रोझ फर्नांडिस यांचे आपण एकमेव वारस असल्याचा दावा करत न्यायालयातून वारस हक्क प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर जमिनीच्या ५० टक्के हिस्स्यावर त्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यात आले. पुढे २०१९ मध्ये मेरवीन फर्नांडिस, मुकेश पारेख आणि संदीप पराडकर यांच्या सहमतीने हा हिस्सा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीने खरेदी केला. या कंपनीला महानगरपालिकेकडून दोन वेळा बांधकाम परवानगीही देण्यात आली होती. मात्र, वोरा यांच्या तक्रारीनंतर दोन्ही वेळा बांधकाम परवानग्या रद्द करण्यात आल्या.
दुसरीकडे, स्वयं बिल्डरचे भागीदार लालजीभाई गोविंदभाई सोळंकी यांनी २०११ मध्ये नोंदणीकृत कराराद्वारे जमिनीचा ५० टक्के हिस्सा खरेदी केल्याचा दावा केला होता. मात्र, या व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्रात खाडाखोड करण्यात आल्याचा आरोप पुढे आला. मूळ जमीनमालक लोबो कुटुंबीयांनीही वोरा यांच्या बाजूने साक्ष देत संबंधित कुलमुखत्यारपत्र सर्वे क्रमांक १८६/१३ या दुसऱ्या जमिनीसाठी असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार झाल्याप्रकरणी शासनाच्या वतीने २०१५ मध्ये स्वयं बिल्डर व अन्य संबंधितांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासकीय, न्यायालयीन आणि राजकीय स्तरावर पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने असगरभाई वोरा यांनी सप्टेंबर महिन्यात मुंबईत आलेले आपले बालमित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. या भेटीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकरणाला वेग आला. त्यानंतर ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीने जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करण्याची आणि बांधकाम परवानगी रद्द करण्याची भूमिका जाहीर केली. महानगरपालिकेने संबंधित बांधकाम परवानगीसह मंजूर केलेला टीडीआरदेखील रद्द केला. मात्र, जमिनीचा प्रत्यक्ष ताबा अद्याप वोरांना मिळालेला नव्हता.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडेही या प्रकरणी तक्रारी करण्यात आल्या होत्या. महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावर वोरांचे नाव पुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. नवघर तलाठ्यांकडून हरकती मागवण्यात आल्यानंतर स्वयं बिल्डर आणि मुकेश पारेख यांनी वोरांच्या नावनोंदणीला विरोध केला. याप्रकरणी अपर तहसीलदारांसमोर १३ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान तब्बल दहा वेळा सुनावणी झाली.
अखेर २५ नोव्हेंबर रोजी अपर तहसीलदारांनी २७ पानी आदेश पारित करत स्वयं बिल्डर आणि मुकेश पारेख यांच्या हरकती फेटाळून लावल्या.
१९८९ मधील नोंदणीकृत खरेदी करारनामा हा वोरांच्या बाजूने असलेला पहिला वैध दस्तऐवज असून, तो आजपर्यंत कोणत्याही न्यायालयाने रद्द केलेला नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण आदेशात नोंदवण्यात आले. भारतीय नोंदणी कायद्यानुसार या दस्तऐवजाला विधिग्राह्य मानत वोरांच्या अर्जानुसार सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवण्याचा फेरफार २७ नोव्हेंबर रोजी मंजूर करण्यात आला. ९ वर्षांच्या संघर्षानंतर महसूल अभिलेखात नाव पुन्हा नोंदले गेले असले, तरी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळवण्याचे आव्हान अद्याप कायम आहे. त्यामुळे सातबाऱ्यावरील या नोंदीनंतर पुढे प्रत्यक्ष ताब्याबाबत काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.