नवी मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर 
ठाणे

Navi Mumbai News: नवी मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर; महापालिकेच्या कारभारावर टीका

Navi Mumbai News: नवी मुंबईतील जुन्या सिडकोनिर्मित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. रखडलेल्या प्रक्रियेवरून क्रेडाई एमसीएचआयने पुनर्विकासाचे सर्व अधिकार सिडकोकडे देण्याची मागणी केली असून, किशोर पाटकर यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे.

प्राजक्ता प्रधान
  • नवी मुंबईतील ३० वर्षांहून जुन्या सिडकोनिर्मित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर बनला आहे

  • पुनर्विकासाचे सर्व अधिकार पुन्हा सिडकोकडे सोपवण्याची क्रेडाई एमसीएचआय युथची मागणी आहे

  • संघटनेचे अध्यक्ष सुमित अहलुवालिया यांनी २८ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला पत्र पाठवले

नवी मुंबईतील ३० वर्षांहून अधिक काळ जुन्या झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या सिडकोनिर्मित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला असून, या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संथ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात सर्वच स्तरांतून संतापाचा उद्रेक होत आहे. क्रेडाई एमसीएचआय युथ नवी मुंबई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने थेट राज्याच्या नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पत्र पाठवून पुनर्विकासाचे सर्व अधिकार पुन्हा सिडकोकडे सोपवण्याची आग्रही मागणी केली आहे. या पत्राच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक किशोर पाटकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एक खिडकी योजनेची विकासकांची मागणी

क्रेडाई एमसीएचआय युथचे अध्यक्ष सुमित अहलुवालिया यांनी २८ नोव्हेंबर रोजी शासनाला पाठवलेल्या पत्रात, जुन्या इमारतींची दुरवस्था नागरिकांच्या जीवावर बेतू शकते असा गंभीर इशारा दिला आहे. सध्या पुनर्विकास प्रस्तावांसाठी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका या दोन्ही प्राधिकरणांकडून विविध ना-हरकत प्रमाणपत्रे आणि परवानग्या मिळवाव्या लागतात. या क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे प्रकल्प रखडत असून, सोसायट्या आणि विकासकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे या संभ्रमातून सुटका करण्यासाठी सिडकोलाच 'सक्षम नियोजन प्राधिकरण' म्हणून घोषित करावे, सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना लागू करावी आणि विहित कालमयदित मंजुरी देण्याचे धोरण आखावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी

पुढे बोलताना पाटकर यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाने एक महिन्यापूर्वीच सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, अद्याप महापालिकेकडून एकही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला नाही किंवा साधी बैठकही लावण्यात आलेली नाही. महापालिकेचा संबंधित विभाग पूर्णपणे निष्क्रय झाला असून, जर तुम्हाला काम करायचे नसेल, तर किमान दुसऱ्यांना तरी काम करू द्या, अशा शब्दांत किशोर पाटकर यांनी आपला त्रागा व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अप्पर मुख्य सचिवांकडे या जाचातून नवी मुंबईकरांची तात्काळ मुक्तता करण्याची मागणी पाटकर यांनी व्यक्त केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांची कामे जाणीवपूर्वक होऊ देत नाहीत

या पत्रावर प्रतिक्रिया देताना शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. पाटकर यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले की, यापूर्वीच ६० हून हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांनी 'आम्हाला एनएमएमसी नको, तर सिडकोच हवी' अशी लेखी भूमिका घेतली आहे.

खुद्द भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के आणि स्वत आपणही महासभेत हीच मागणी लावून धरली आहे. आता क्रेडाई एमसीएचआयच्या पत्रातूनही हीच वस्तुस्थिती समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, नवी मुंबईत 'ईझ ऑफ बिझनेस' पूर्णपणे ठप्प झाले आहे. महानगरपालिका प्रशासन प्रचंड दबावाखाली काम करत असून, येथील स्थानिक सत्ताधारी सर्वसामान्य नागरिकांची कामे जाणीवपूर्वक होऊ देत नाहीत, असा थेट आरोप पाटकर यांनी केला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

नवे कपडे घालून लग्नाला निघाले, पण वाटेतच काळाने गाठलं! खराडीच्या रिव्हरडेल चौकात भयंकर अपघात

December Horoscope: डिसेंबरमध्ये या राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा, लक्ष्मी नारायण योगामुळे मिळणार आर्थिक लाभाच्या संधी

कारमधून 'ते' दोघे आले, अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवलं अन् नंतर...; अपहरणाचा थरारक प्रकार समोर

पायात अशक्तपणा, मुंग्या, बधिरपणा जाणवतो? मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव