आर्णी : तालुक्यातील कवठा बाजार येथे पैनगंगा नदीचे पात्र आहे. त्यातून अवैध वाळूची तस्करी होत असल्याची माहिती आर्णीचे तहसीलदार परसराम भोसले यांना मिळाली. तर, तहसीलदारांसह काही अधिकारी तेथे गेले असता तलाठ्याला धक्काबुकी केली असल्याची घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. या सर्व प्रकरणाची माहिती आर्णी पोलिसांना देण्यात आली आहे.
तहसीलदार भोसले हे मिळालेल्या अवैध वाळूतस्करीच्या गोपनीय माहितीच्या आधारे नदीपात्रात पोहोचले. त्यावेळी, त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी मयूर मस्के, तलाठी अमोल पुरी, प्रकाश राऊत, सोनुने, सचिन मेश्राम हे सगळे होते. त्यांना नदीत चार ट्रॅक्टर अवैध वाळू भरतांना आढळून आलेत. आर्णी महसूल विभागाचा ताफा बघून तीन ट्रॅक्टरसह व्यक्ती पळून गेलेत. तर, घटनास्थळी एक ट्रॅक्टर त्यांच्या हाती लागला. ट्रॅक्टरचालक सुनील गोविंदराव घाळवट (रा. टाकळी ता. माहूर जि. नांदेड) याला पकडून महसूल विभागाचे कर्मचारी आपले कार्य करू लागले.
त्यावेळी, सुनील घाळवट याने अचानक धक्काबुक्की करीत पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तर, त्याने गावातील साथीदारांना इशाऱ्याने बोलाविले तेव्हा पांडुरंग घुले, विनायक मुसळे, दत्ता घुले, जीवन कांदे व इतर पाच ते सात जण लगेच तेथे आले. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिली की, ’ट्रॅक्टर कसे घेऊन जातात, ते आम्ही पाहतो’, आणि त्यांच्याशी अरेरावी करत धक्काबुक्की केली. तर, त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे कवठा बाजार येथील तलाठी सचिन मनोहर मेश्राम यांनी आर्णी पोलिस ठाण्यात सांगितले आहे. त्यावरून वरील सर्व संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हाची नोंद केली आहे. याबाबतचा पुढील तपास आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.