शेतीप्रधान म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यातही अकुशल रोजगारांना मोठे उद्योगच नसल्याने मिळेल ते काम करूनच आपली उपजिवीका भागवावी लागते. यावर्षी नापिकी, दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतून मिळणारे अपुरे उत्पन्न यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना आता शेजारील जिल्ह्यात रोजगारासाठी आसरा घ्यावा लागत आहे. रोजगाराच्या शोधात ग्रामीण तरुणांची वर्धा, देवळी, नागपूर, अमरावती येथे सुरू असलेली धावपळ जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणत आहे. यवतमाळ जिल्ह्यात रेमंड हा एकमेव मोठा उद्योग आहे. तसेच त्यानंतर दोन चार सुतगिरण्या व साखर कारखाने येथे मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल मनुष्यबळ आहे. या व्यक्तीरिक्त रोजगाराचा सर्व भार लघू व मध्यम उद्योगावरच आहे. (फोटो सौजन्य – AI)
जिल्ह्यात २०२४-२५ नुसार १२ हजार १०८ सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योग सुरू आहेत. यातून जवळपास ७१ हजार ६६४ जणांना रोजगार मिळाला आहे. यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ८० उद्योग असून, त्यातून ३४ हजार ९०० जणांना त्याखालोखाल पुसद तालुक्यात एक हजार ९२ उद्योगांतून पाच हजार ५६३ जणांना, तर वणी तालुक्यात ९३५ उद्योगांतून पाच हजार ६९५ जणांना रोजगार मिळत आहे. ही आकडेवारी जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराच्या तुलनेत रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याचेही दिसून येते.
यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भाग हा ग्रामीण मध्ये येतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. मात्र, अनियमित पाऊस, पावसातील दीर्घ खंड, वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. यावर्षी आलेल्या दुष्काळी परिस्थितीने ऐन ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात शेतीची कामे संपल्यागत आहे. शेतीचा हातचा पैसा संपल्याने तरूणांना आता रोजगारासाठी बाहेर पडावे लागत आहे. मात्र जिल्ह्यात दोन चार वगळता मोठे उद्योग केंद्र नसल्याने बाहेरील जिल्ह्याचा आसरा घ्यावा लागत आहे. काही तरुण बांधकाम, खासगी कंपन्या, कारखाने, हॉटेल व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी स्थलांतर करतात.
ग्रामिण भागात अकुशल मंजुरांची प्रचंड संख्या आहे. सध्या शेतीची कामे संपल्याने पाच ते सहा महिने रोजगारासाठी वर्धा, देवळी, नागपूर या जिल्ह्यात जात आहे. नागपूरात हॉटेल व्यावसायात अनेक तरुण आहे. तर देवळी येथील स्टील प्लॉटमध्येही नजीकच्या कळंब, राळेगाव येथील तरुण रोजगाराच्या निमित्ताने येथे जात आहे.